कचऱ्यापासून खतनिर्मितीसाठी घरातूनच पुढचे पाऊल
By admin | Published: June 19, 2017 05:01 AM2017-06-19T05:01:22+5:302017-06-19T05:01:22+5:30
घरच्या घरी ओल्या व सुक्या कचऱ्याचे वर्गीकरण करून ओल्या कचऱ्यापासून खत तयार करता येते हे दाखवून देणाऱ्या स्वच्छता दूत अपर्णा कवी यांनी
जान्हवी मोर्ये।
लोकमत न्यूज नेटवर्क
डोंबिवली : घरच्या घरी ओल्या व सुक्या कचऱ्याचे वर्गीकरण करून ओल्या कचऱ्यापासून खत तयार करता येते हे दाखवून देणाऱ्या स्वच्छता दूत अपर्णा कवी यांनी आता त्यासाठी सात हजार रुपये खर्चून खत तयार करणारे ‘हाउसहोल्ड कंपोस्ट मशीन’ पुण्यातील कंपनीकडून विकत घेतले आहे. असेच पाऊल सोसायट्यांनी उचलल्यास कल्याण-डोंबिवलीतील कचऱ्याचा प्रश्न बऱ्यापैकी मार्गी लागू शकतो. घरगुती कचरा प्रकल्प सुरू करण्याबरोबरच त्यांनी वर्षभरात ८५ सोसायट्यांमध्ये जागृतीही केली आहे.
एमआयडीसीतील सुदामानगरात राहणाऱ्या कवी यांनी नोव्हेंबर २०१६ पासून कचऱ्याविषयी जागृती सुरू केली आहे. ओला-सुका कचरा वेगळा करणे, घरच्या घरी कचऱ्यापासून खत तयार करण्याबाबत त्यांनी ८५ सोसायट्यांमध्ये जागृती केली. शंकांचे निरसनही केले. त्यांच्या जागृती मोहिमेला पाठिंबा देणारे व्हॉट्सअॅप ग्रुपमधील सदस्य मनोज धारप यांनी कचऱ्यापासून खतनिर्मितीचे यंत्र पुण्यात कुठे मिळते, याची माहिती मिळविली. स्वखर्चातून कवी यांनी कचऱ्यापासून खताचे यंत्र खरेदी केले. या यंत्रात दोन कप्पे आहेत. एका कप्प्यात दररोज ओला कचरा टाकला तर दर १५ दिवसांत त्यात एक किलो खत तयार होते. एक कप्पा भरल्यानंतर तो बंद ठेवून दुसऱ्या कप्प्यात कचरा टाकता येतो. या यंत्रातून दरमहा दोन किलो खत तयार होते. भाज्यांचे देठ, फळांच्या साली, शिळे अन्न मिक्सरमध्ये बारीक करून एका कप्प्यात टाकले की, खत तयार होते. त्यात अधूनमधून थोडेसे खत आणि लाकडाचा भूसा टाकल्यास उत्तम प्रतीचे खत तयार होते. हे यंत्र पर्यावरण पूरक आहे. ‘रोटरी क्लब’कडून लावल्या जाणाऱ्या झाडांना हे खत पुरवण्याचा कवी यांचा मानस आहे. या प्धतीची मोठी यंत्रेही मिळतात. ती मोठ्या सोसायट्या, हॉटेल यांना उपयुक्त ठरू शकतात. कवी यांनी जागृतीमुळे रिजेन्सी व मोहन सृष्टी सारख्या जास्त सदनिकाधारक असलेल्या सोसायट्यांनी मोठे खत निर्मिती करणारे कचरा यंत्र खरेदी करण्याचा मानस व्यक्त केला आहे. या सोसायट्यांच्या कचरा प्रकल्पातून तयार होणारे खत सभासदांच्या घरातील फुलझाडे तसेच सोसायट्यांच्या उद्यानांत वापरले जाईल. कमी क्षमतेच्या यंत्रात टणक कचरा अर्थात नारळांची करवंटी क्र श होत नाही. पण १०० किलो क्षमतेच्या यंत्रात ती होत असल्याचे त्या म्हणाल्या. पालिका ओला आणि सुकया कचऱ्याचे वर्गीकरण करायला सांगते. पण तो कचरा सरसकट एकत्रत करून डम्पिंग ग्राउंडवर टाकते. त्यामुळे वर्गीकरणाचा फायदा होत नाही. त्यामुळे घरी प्रक्रिया करण्यावर कवी यांनी भर दिला.
अशा यंत्रांबाबत कवी यांनी पालिकेकडे पाठपुरावा केला होता. पण त्याला महापालिकेकडून सकारात्मक प्रतिसाद मिळालेला नाही. सोसायट्यांना मशीन देण्यासाठी महापालिकेकडे निधी नसल्याचे सांगून जनजागृती करणाऱ्यांना पाठबळ देण्यापलिकडे अन्य बाबतीत महापालिका हात वरती करते, याविषयी कवी यांनी खंत व्यक्त केली.