महिला सबलीकरणासाठी पुढचे पाऊल
By admin | Published: December 2, 2014 04:42 AM2014-12-02T04:42:30+5:302014-12-02T08:51:33+5:30
असीम कर्तृत्वाचे पंख लावून आकाशाला गवसणी घालणाऱ्या महिलांचा सन्मान आणि महिला सक्षमीकरणाचा जागर करण्यासाठी
पुणे : असीम कर्तृत्वाचे पंख लावून आकाशाला गवसणी घालणाऱ्या महिलांचा सन्मान आणि महिला सक्षमीकरणाचा जागर करण्यासाठी ‘लोकमत माध्यम समूह’च्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या ‘लोकमत वुमेन समिट २०१४’ या राष्ट्रीय परिषदेच्या चौथ्या पर्वाचे उद्घाटन आज (मंगळवारी) होणार आहे. रिपब्लिक आॅफ युगांडाच्या उच्चायुक्त एलिझाबेथ पायलो नापेयोक, केनियाच्या उच्चायुक्त फ्लॉरेन्स इमिसा वेचे, प्रख्यात अभिनेत्री लिसा रे व यूएसके फाउंडेशनच्या संचालिका उषा काकडे प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित राहणार आहेत. ‘लोकमत मीडिया प्रा.लि.’चे चेअरमन खासदार विजय दर्डा अध्यक्षस्थानी असणार आहेत. नगर रस्त्यावरील हॉटेल हयात येथे सकाळी १० ते ६ या वेळेत ही परिषद पार पडणार आहे.
‘सारे आकाश तुमचे...’ ही चौथ्या राष्ट्रीय परिषदेची संकल्पना आहे. महिलांनी पुरुषांच्या मक्तेदारी असलेल्या विविध क्षेत्रांत
आश्वासक पाऊल टाकले.
पण संसाराचे सर्वाधिक ओझे महिलांनाच वाहावे लागते. बदलत्या पुरुषी मानसिकतेतून हे ओझे काहीसे कमी झाले असले, तरी त्यांना संसार आणि नोकरीत मेळ घालताना अनेक आव्हानांना सामोरे जावे लागत आहे. या आव्हानांचा वेध घेण्याचा प्रयत्न या परिषदेत होणार आहे. ‘नोकरदार महिलांसमोरील प्रश्न’ या विषयावर चर्चा होणार आहे.
समाजाचा अर्धा हिस्सा असलेल्या महिलांसाठी ‘सारे आकाश मोकळे’ परिषदेची ही संकल्पना असून, यावर विचारमंथन करण्यासाठी राष्ट्रीय- आंतरराष्ट्रीय स्तरावर नावलौकिक मिळविलेल्या महिला सहभागी होणार आहेत. ‘लोकमत’चे संपादक विजय बाविस्कर, वरिष्ठ महाव्यवस्थापक निनाद देसाई आणि महाव्यवस्थापक मिलन दर्डा निमंत्रक आहेत.
‘अॅक्सिस बँके’च्या सहयोगी उपाध्यक्षा अमृता देवेंद्र फडणवीस, प्रसिद्ध अभिनेत्री रविना टंडन, ‘पेप्सिको’चे (इमर्जिंग मार्केट्स) उपाध्यक्ष व सरव्यवस्थापक सत्यव्रत पेंढारकर, ‘बिल अॅन्ड मेलिंडा गेट्स फाउंडेशन’च्या (भारत) कम्युनिकेशन विभागाच्या उपाध्यक्षा अर्चना व्यास, निवृत्त आयएएस अधिकारी नीला सत्यनारायण, ‘नेटवर्क १८’च्या असोसिएट फीचर एडिटर रीचा अनिरुद्ध, ‘करी नेशन’च्या
संस्थापक संचालिका प्रीती
नायर, ‘अस्तित्व’ या संस्थेच्या संस्थापक व अध्यक्षा व ‘एलजीबीटीं’च्या हक्कांसाठी लढणाऱ्या लक्ष्मीनारायण त्रिपाठी, ‘लोकमत’च्या फीचर एडिटर अपर्णा वेलणकर, सामाजिक व राजकीय विश्लेषक अलका शर्मा या परिषदेत सहभागी होणार आहेत. प्रसिद्ध अभिनेते कबीर बेदी हे परिषदेचे सूत्रसंचालन करणार आहेत.