पुढच्या वेळी आम्हाला पाडा...!, परिवहनमंत्री रावतेंचा अजब सल्ला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 22, 2017 06:24 AM2017-10-22T06:24:02+5:302017-10-22T06:24:36+5:30
‘तुम्ही आम्हाला निवडून दिलेय तर पुढच्या वेळी पाडा...’ असा सल्ला दस्तूरखुद्द परिवहनमंत्री दिवाकर रावते यांनी त्यांच्या एका कार्यकर्त्याला दिला.
अतुल कुलकर्णी ।
मुंबई : ‘तुम्ही आम्हाला निवडून दिलेय तर पुढच्या वेळी पाडा...’ असा सल्ला दस्तूरखुद्द परिवहनमंत्री दिवाकर रावते यांनी त्यांच्या एका कार्यकर्त्याला दिला. रावतेंच्या या संवादाची ध्वनिफीत व्हायरल झाली असून त्यामुळे शिवसेनेची चांगलीच अडचण झाली आहे.
एसटी कर्मचा-यांनी संप पुकारल्यानंतर शिवसेनेच्या एका कार्यकर्त्याने रावते यांना फोन केला. त्या कार्यकर्त्याने ‘विद्यार्थ्यांच्या परीक्षा चालू असताना संप झाला आहे. विद्यार्थी छतावर लटकून खासगी वाहनाने जात आहेत. त्यांचा अपघात झाल्यास अडचणी होतील. संप कसा मिटवायचा ते तुम्ही ठरवा, तुम्ही मंत्री आहात, संप करणारे आपलेच लोक आहेत. संप मिटवावा म्हणून तर आम्ही तुम्हाला निवडून दिले आहे,’ असे परिवहनमंत्री रावते यांना या कार्यकर्त्याने सांगितले.
त्यावर रावते यांनी ‘त्यांना संपच करायचा आहे, त्यांना आमचे म्हणणे ऐकायचे नाही, मी संप संपवायलाच बसलोय, संपक-यांना मुख्यमंत्र्यांचेही ऐकायचे नाही, त्याला मी काय करू? खासगी गाडीच्या अपघातात लोक मरतात, तर एसटीला अपघात होत नाहीत का? मला लेक्चर देऊ नका. निवडून दिलंय म्हणता, तर पुढच्या वेळी पाडा, चला, आता फार बोललात...’ असे चिडून त्याला बोलताना ऐकायला मिळते.
ही ध्वनिफीत व्हायरल झाली आहे. याआधी एसटी संघटनेच्या नेत्याने रावते यांनी आपल्याला तुरुंगात टाकण्याची धमकी दिल्याची तक्रार शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंकडे केली होती. त्यापाठोपाठ ही क्लिप आल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी रावतेंकडे नाराजी व्यक्त केल्याचे समजते. कार्यकर्ते व पक्षातील नेत्यांशी रावते असेच बोलतात, अशी प्रतिक्रिया शिवसेनेच्या एका नेत्याने दिली आहे.
>वेगळी अपेक्षा ती काय?
बाळासाहेब ठाकरे यांचा सैनिक जनतेशी असे कधीच बोलला नसता. बाळासाहेबांची ती शिकवण नव्हती, मात्र उद्धव ठाकरेंचा कार्यकर्ता जनतेशी उद्धटच बोलणार. त्यांच्याकडून वेगळी अपेक्षा काय असणार?
- अॅड. आशिष शेलार, भाजपाचे मुंबई अध्यक्ष
>अभ्यास चांगला असावा
दिवाकर रावते यांनी १९९५ ते १९९९ मध्ये टँकरमुक्त महाराष्ट्राची घोषणा केली होती. आता ऐन दिवाळीत त्यांनी एसटीमुक्त महाराष्ट्र केला. मंत्र्यांनी जनतेशी कसे बोलावे याविषयी रावतेंचा अभ्यास चांगला असावा..!
- खा. अशोक चव्हाण, प्रदेशाध्यक्ष, काँग्रेस
>दुटप्पी वागणे
सत्तेची मस्ती व मग्रुरी याचे हे उदाहरण आहे. अंगणवाडी सेविकांनी संप केला तेव्हा उद्धव ठाकरे तेथे गेले. त्यांनी सरकारवर टीका केली. मात्र दिवाळीत लाखो लोकांना संकटात टाकणा-या संपाकडे परिवहन विभाग शिवसेनेकडे आहे म्हणून उद्धव यांनी पाठ फिरवली. हे दुटप्पी वागणे आहे. रावतेंची भाषा हे अरेरावीचे व सत्तेचा कैफ चढल्याचे लक्षण आहे.
- सुनील तटकरे, प्रदेशाध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस