पुढील दोन दिवसांत मुंबईसह कोकणात मुसळधार?
By admin | Published: June 29, 2017 01:40 AM2017-06-29T01:40:26+5:302017-06-29T01:40:26+5:30
राज्यात सक्रिय झालेला मान्सून बुधवारी मुंबईसह कोकणात धुमशान बरसला. विदर्भासह मध्य महाराष्ट्रातही जोरदार सरी बरसल्या.
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : राज्यात सक्रिय झालेला मान्सून बुधवारी मुंबईसह कोकणात धुमशान बरसला. विदर्भासह मध्य महाराष्ट्रातही जोरदार सरी बरसल्या. पुढील दोन दिवस पावसाचा जोर असाच कायम राहील, असा अंदाज भारतीय हवामानशास्त्र विभागाने वर्तविला आहे.
गेल्या चोवीस तासांत कोकणात सर्वदूर मुसळधार पाऊस झाला. मुंबईसह उपनगरातही दिवसभर जोरधार होती. लोकसेवा विस्कळीत झाल्याने चाकरमान्यांचे हाल झाले. मानखुर्दजवळ बिघाड झाल्याने सकाळी हार्बर लाईनची सेवा काही काळ विस्कळीत झाली होती. सर्वच मार्गावरील लोकल १५ मिनिटे उशीराने धावत होत्या.
मध्य महाराष्ट्रात नाशिक, सांगली, सातारा येथेही जोरदार पाऊस झाला. सातारा जिल्ह्यात चोवीस तासात एकूण १८३.९ मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. महाबळेश्वर तालुका वगळता इतर ठिकाणी पावसाचा जोर ओसरला मात्र, कोयना धरण परिसरात पावसाची रिपरिप सुरू असून पाणीसाठ्यात हळूहळू वाढ होत आहे. विदर्भात नागपूर ११, चंद्रपूर, हिंगणा ३, गोंदिया आणि वर्धा येथे १ मिमी पावसाची नोंद झाली आहे.