पुढील वर्षी ‘नीट’ उर्दूतही!
By admin | Published: April 17, 2017 03:24 AM2017-04-17T03:24:25+5:302017-04-17T03:24:25+5:30
गेल्या काही वर्षांपासून इस्लामीक आॅर्गनायझेशन आॅफ इंडिया (एस.आय.ओ) नीट परीक्षा उर्दू भाषेत देखील घ्यावी यासाठी प्रयत्नशील होते
मुंबई : गेल्या काही वर्षांपासून इस्लामीक आॅर्गनायझेशन आॅफ इंडिया (एस.आय.ओ) नीट परीक्षा उर्दू भाषेत देखील घ्यावी यासाठी प्रयत्नशील होते. अखेर त्यांना न्याय मिळाला असून सर्वोच्च न्यायालयाने पुढील शैक्षणिक वर्षापासून उर्दू भाषेत नीट घेण्याचा निर्णय घेतल्याने राज्यातील हजारो विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला आहे.
केंद्रीय आरोग्य विभागाच्या मंत्रिमंडळातर्फे २०१७-१८ या शैक्षणिक वर्षासाठी घेण्यात येणारी नीट परीक्षा देशातील १० प्रादेशिक भाषांमधून विद्यार्थ्यांना देता येणार आहे. पण, या १० भाषांमध्ये उर्दू भाषेचा समावेश नाही. त्यामुळे उर्दू माध्यमात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांचे नुकसान होणार आहे. उर्दू माध्यमातील हजारो विद्यार्थ्यांचे नुकासान होऊ नये म्हणून ‘एस.आय.ओ’तर्फे सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे. या याचिकेवर सुनावणी करताना सर्वाेच्च न्यायालयाने पुढच्या शैक्षणिक वर्षापासून नीट परीक्षा उर्दू भाषेतही घेता येणार असल्याचा निर्णय दिल्याने विद्यार्थ्यांना दिलासा मिळाल्याचे एस.आय.ओ. दक्षिण महाराष्ट्राचे जनसंपर्क सचिव मोहम्मद अली शेख यांनी सांगितले.
राज्यात एकूण १ हजार १६३ उर्दू माध्यमाची कनिष्ठ महाविद्यालय आहेत. तर, दरवर्षी सरासरी ११ हजार विद्यार्थी विज्ञान शाखेत शिक्षण घेतात. यापैकी बहुतांश विद्यार्थी हे वैद्यकीय अभ्यासक्रमासाठी प्रवेश परीक्षा देण्यास उत्सुक असतात. पण, अनेक विद्यार्थ्यांना उर्दू भाषेचा पर्याय नसल्याने अडचणींचा सामना करावा लागतो. महाराष्ट्रासह कर्नाटक, आंध्रप्रदेश आणि तेलंगणा राज्यातूनही अनेक विद्यार्थी उर्दू भाषेत शिक्षण घेतात. (प्रतिनिधी)