‘एनआयए’चे अधिकारी झाले बांधकाम मजूर

By admin | Published: January 29, 2016 01:46 AM2016-01-29T01:46:08+5:302016-01-29T01:46:08+5:30

इसिसचा भारतातील म्होरक्या मुदब्बीर शेखला पकडण्यासाठी, राष्ट्रीय तपास संस्थेच्या (एनआयए) आणि मुंबई दहशतवादविरोधी पथक (एटीएस) च्या अधिकाऱ्यांनी, बिगारी कामगार

NIA officer became the builder | ‘एनआयए’चे अधिकारी झाले बांधकाम मजूर

‘एनआयए’चे अधिकारी झाले बांधकाम मजूर

Next

- जितेंद्र कालेकर, ठाणे
इसिसचा भारतातील म्होरक्या मुदब्बीर शेखला पकडण्यासाठी, राष्ट्रीय तपास संस्थेच्या (एनआयए) आणि मुंबई दहशतवादविरोधी पथक (एटीएस) च्या अधिकाऱ्यांनी, बिगारी कामगार आणि सामान्य मुस्लिमांचे वेश परिधान करून दिवसभर मुंब्रा येथे तळ ठोकला होता. दरम्यान, ‘हवाला’मार्फत मिळालेले आठ लाख रुपये मुदब्बीरने इसिसच्याच कामासाठी वापरल्याची कबुली दिली असून, यापूर्वी खासगी कंपनीची नोकरी सोडताना मिळालेल्या रकमेतून तो घरखर्च भागवायचा, अशी माहिती ‘एनआयए’च्या तपासात उघड झाली आहे.
गेले सहा महिने ज्याच्यावर पाळत होती, त्या मुदब्बीरला पकडण्याचा २१ जानेवारी २०१६ हा दिवस निश्चित झाल्यावर, मुंब्रा येथील अमृतनगर भागात ‘एटीएस’ आणि ‘एनआयए’च्या बड्या अधिकाऱ्यांनी वेशांतर करून तळ ठोकला होता. कोणी बिगारी कामगार होऊन फेरफटका मारत होता, तर कुणी सामान्य मुस्लीम नागरिकाचा वेश करून पानटपरीवर पान खात होता. दिवसभरात मुदब्बीर ज्यावेळी बाहेर पडला, त्यावेळी त्याच्या सर्व हालचाली टिपल्या जात होत्या. तो राहत असलेल्या ‘रेश्मा’ अपार्टमेंटच्या खालीही ‘वॉच’ ठेवला होता.
सायंकाळी ६.३० वाजता तो नमाज पढण्यासाठी बाहेर पडला. ७ वाजता तो परतला. रात्री ८ वाजता त्याने दूध विकत घेतले. दूध घेऊन तो घरात गेल्यानंतर तो घरातच असल्याची पक्की खबर दिल्लीपर्यंत गेली. मुंब्य्रासारखी संवेदनशील वस्ती, यापूर्वी कोम्बिंग आॅपरेशनला आलेले अपयश आणि मुदब्बीर हा इसिससारख्या अतिरेकी संघटनेचा संशयित म्होरक्या असल्यामुळे त्याच्याकडे शस्त्रास्त्र किंवा स्फोटके असण्याची शक्यता असल्याने त्याच्या अटकेची सुसूत्रबद्ध योजना आखण्यात आली. २२ जानेवारीच्या पहाटे २.३० ची वेळ अटकेकरिता निश्चित केली.

हवालाचा पैसा फक्त इसिससाठीच
गोरेगावच्या स्पोर्ट्स इंटरअ‍ॅक्टिव्ह या खासगी कंपनीत वेब डिझायनिंगचे काम करणाऱ्या मुदब्बीरला महिना ६५ हजार पगार होता. तीन वर्षांपूर्वीच इसिसच्या संपर्कात आल्याने त्याचे कामात दुर्लक्ष झाले. कामातील अनेक चुका आणि अनियमिततेमुळे त्याला डिसेंबर २०१२ मध्ये कामावरून काढण्यात आले.
काम सोडताना आणि कामावर असताना त्याच्याकडे ३० लाख एवढी रक्कम जमा झाली होती. त्यातले सहा लाख रुपये त्याने बांद्रा येथील जुल्फीकार सय्यद पूनावाला या रिअल इस्टेटचे काम करणाऱ्या मामाकडे दिले होते. त्याने जमीन विक्रीमध्ये पैसे गुंतविल्याने त्याला १२ लाख रुपये परतही केले होते.
दरम्यान, त्याला हवालामार्फत आठ लाखांची रोकड मिळाली होती. ही रक्कम मात्र तो केवळ इसिसच्या कामासाठीच खर्च करीत होता. त्यातूनच लखनौ आणि मुंबईतील जाण्या-येण्याचा आणि राहण्याचा खर्च, लॅपटॉप खरेदी त्याने केला होता. याशिवाय, ‘इसिस’मध्ये जे भरती झाले, त्यांनाही यातूनच त्याने पैसेही वाटले. सुमारे तीन लाख रुपये लखनौमधील एकाला दिले होते, अशी माहितीही आता ‘एनआयए’च्या तपासात उघड झाली आहे.

असे जाळे फेकायचा मुदब्बीर...
फेसबुकवर ‘इसिस’च्या माध्यमातून एखादी ‘पोस्ट’ ‘अपलोड’ केल्यानंतर ती आधी ‘लाइक’ करायची. नंतर ती त्याच्या मित्रांमध्ये टाकायची. तिला ज्याने ‘लाइक’ केले, त्याच्याशी चॅटिंग करायचे. मग त्याला सीरियातील किंवा अन्यत्र मुस्लीम महिलांवर होणाऱ्या अत्याचाराची क्लिपिंग दाखवायची.
त्यानंतर त्याला इसिसमध्ये येण्यासाठी प्रवृत्त करायचे, असा त्याचा क्रम होता. वेगवेगळ्या देशांमध्ये मुस्लीम महिलांवर होणाऱ्या अत्याचारांचे चित्रण असलेल्या सिडीजही त्याच्याकडून जप्त करण्यात आल्या आहेत.

भरती होणाऱ्यांपुढे दोनच पर्याय
इसिसमध्ये भरती होण्यासाठी जे तयार झाले, त्यांना मुदब्बीरकडून दोन पर्याय दिले जायचे. एक सीरियातील युद्धात सहभागी व्हा किंवा भारतातच राहून इसिसमध्ये काम करण्यासाठी जास्तीत जास्त लोकांना प्रवृत्त करा.

Web Title: NIA officer became the builder

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.