NIA: महाराष्ट्रासह पाच राज्यांमध्ये एनआयएच्या धाडी; जालना, छत्रपती संभाजीनगरमधून तिघांना घेतलं ताब्यात
By ऑनलाइन लोकमत | Published: October 5, 2024 11:29 AM2024-10-05T11:29:01+5:302024-10-05T11:33:24+5:30
NIA Raids Update: एनआयए अर्थात राष्ट्रीय तपास यंत्रणेने महाराष्ट्रासह पाच राज्यांमध्ये धाडी टाकल्या. दहशतवादी संघटना जैश-ए-मोहम्मदशी संबंधित संशयितांचा शोध घेण्यासाठी ही कारवाई करण्यात आली. यात काही जणांना ताब्यात घेण्यात आले आहे.
NIA Raids News: जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेच्या नेटवर्कविरोधात एनआयएने देशातील पाच राज्यांत अनेक ठिकाणी धाडी टाकल्या. देशात २२ ठिकाणांवर धाडी टाकण्यात आल्या असून, महाराष्ट्रात एनआयए आणि एटीएसने संयुक्त कारवाई केल्याची माहिती आहे.
एनआयएने कोणत्या राज्यात टाकल्या धाडी?
जैश-ए-मोहम्मद टेरर मॉड्यूल प्रकरणात एनएआयने शनिवारी पहाटे महाराष्ट्र, जम्मू काश्मीर, उत्तर प्रदेश, आसाम आणि दिल्लीतील एकूण २२ ठिकाणी धाडी टाकल्या. लष्कराच्या जवानांवर करण्यात आलेल्या हल्ल्यानंतर जैश-ए-मोहम्मद संघटनेशी संबंधित असलेल्या ठिकाणांवर या धाडी टाकण्यात आल्या आहेत. एनआयएने पहिल्यांदाच इतक्या मोठ्या प्रमाणावर जैश-ए-मोहम्मद संघटनेविरोधात एकाच वेळी देशभरात धाडी टाकल्या.
दिल्लीत रात्रभर झाडाझडती
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, उत्तर पूर्व दिल्लीतील मुस्तफाबाद परिसरात एनआयएने रात्रभर धाडी टाकल्या. दिल्ली पोलीस स्पेशल सेलचे अधिकारीही या कारवाईत होते. झाडाझडतीत संशयास्पद साहित्य जप्त करण्यात आले आहे. अधिकाऱ्यांनी काही लोकांना नोटिसाही बजावल्या आहेत. दोन-तीन लोकांना चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले आहे.
#WATCH | National Investigation Agency (NIA) is conducting raids in J&K, Maharashtra, UP, Assam and Delhi in the case related to activities of the Jaish-e-Mohammed terror outfit group.
— ANI (@ANI) October 5, 2024
(Visuals from Baramulla of Jammu and Kashmir) pic.twitter.com/AX81wphP1h
बारामुल्लामध्ये धाडसत्र
जम्मू काश्मीरमधील बारामुल्ला जिल्ह्यात संगरी परिसरात एनआयएने स्थानिक पोलिसांच्या मदतीने धाडी टाकल्या. विधानसभा निवडणुकीचे मतदान पार पडल्यानंतर एनआयएने दहशतवाद विरोधी कारवाईला गती दिली आहे.
एनआयएने महाराष्ट्रातील तिघांना घेतले ताब्यात
महाराष्ट्रातील काही शहरामध्येही एनआयए आणि एटीएसने संयुक्त कारवाई करत धाडी टाकल्या.
#WATCH | Maharashtra: NIA raids a homeopathy clinic in Malegaon, in a terror conspiracy case.
National Investigation Agency is carrying out searches at 22 locations in five states, including Maharashtra. pic.twitter.com/v0cU7sQLWZ— ANI (@ANI) October 5, 2024
छत्रपती संभाजीनगर, जालना, मालेगाव, नाशिक या ठिकाणी धाडी टाकण्यात आल्या. झाडाझडतीनंतर एनआयएने तीन जणांना चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. त्यांच्याकडून काही सामुग्री जप्त करण्यात आली आहे. जैश-ए-मोहम्मद संघटनेच्या संपर्कात हे तिघे होते, असा संशय आहे. त्यांनी टेरर फंडिंगसाठी मदत केल्याचाही आरोप आहे.
छत्रपती संभाजीनगरमधील आझाद चौक आणि एन ६ या भागातून दोन जणांना, तर जालना शहरातील गांधीनगर भागातून एका व्यक्तीला एनआयएने ताब्यात घेतल्याची प्राथमिक माहिती आहे. एनआयए, एटीएसकडून संशयितांकडील मोबाईल, लॅपटॉपचीही तपासणी केली जाणार आहे.