जिहादी दहशतवादी गटांवर NIA ची मोठी कारवाई, अमरावतीतून एका संशयिताला अटक
By ऑनलाइन लोकमत | Published: December 18, 2023 02:55 PM2023-12-18T14:55:54+5:302023-12-18T14:56:12+5:30
NIA Raids Updates: राष्ट्रीय तपास संस्थेने अमरावती जिल्ह्यातील अचलपूरमधून एका विद्यार्थ्याला ताब्यात घेतले आहे.
NIA Raids: कट्टरपंथी जिहादी दहशतवादी गटांचा पर्दाफाश करण्यासाठी राष्ट्रीय तपास संस्थेने (NIA) आज, सोमवारी कर्नाटक आणि महाराष्ट्रासह दक्षिण भारतातील चार राज्यांमध्ये 19 ठिकाणी छापे टाकले. महाराष्ट्रातील अमरावती जिल्ह्यात ही छापेमारी झाली. सोमवारी (18 डिसेंबर) सकाळीच राज्य पोलीस दलाच्या सहकार्याने या छापेमारीला सुरुवात झाली होती.
यावेळी अमरावती जिल्ह्यातील अचलपूरमधून एनआयएच्या पथकाने एका संशयित विद्यार्थ्याला ताब्यात घेतले असून त्याची चौकशी करण्यात येत आहे. ताब्यात घेतलेला तरुण अचलपूर नागपूरमधील महाविद्यालयात शिकतो. मीडिया रिपोर्ट्सनुसार, हा विद्यार्थी सोशल मीडिया, विशेषत: व्हॉट्सअॅप ग्रुपच्या माध्यमातून जिहादी संघटनांच्या संपर्कात होता. हा विद्यार्थीदहशतवादी कारवायांमध्ये सामील असल्याच्या संशयावरुनच एनआयएचे पथक स्थानिक एटीएस आणि जिल्हा पोलिसांच्या पथकासह आज पहाटे 2 वाजता अचलपूरला पोहोचले होते.
National Investigation Agency (NIA) is conducting searches at 19 locations in South India by busting a highly radicalised Jihadi terror group pic.twitter.com/oYnsKJjnaW
— ANI (@ANI) December 18, 2023
एनआयएचे पथक 15 वाहनांच्या ताफ्यासह अचलपूरच्या अकबरी चौक बियाबानी गल्लीत पोहचले आणि या तरुणाला ताब्यात घेण्यात आले. तपास संस्थेने त्याची कसून चौकशी केली. मिळालेल्या माहितीनुसार, ताब्यात घेतलेल्या मुलाचे वडील शिक्षक आहेत. वृत्तसंस्था एएनआयनुसार, तपास एजन्सीला इनपुट मिळाले होते की, काही दहशतवादी गट भारतविरोधी कारवायांमध्ये गुंतले आहेत आणि ते हल्ल्याची योजनाही आखत आहेत. याच इनपुटच्या आधारे एनआयएने विविध ठिकाणी छापेमारी केली.
कर्नाटकातही छापे
एनआयएने एकट्या कर्नाटकात 19 ठिकाणी छापे टाकले आहेत. यापूर्वी 13 डिसेंबर रोजी एनआयएने दहशतवादी कट प्रकरणी बंगळुरुमध्ये 6 जणांना ताब्यात घेतले होते. यानंतरही शोधमोहीम सुरुच आहे. यापूर्वी एनआयएच्या पथकाने पुणे, मीरा रोड, ठाणे आणि कर्नाटकातील बंगळुरुसह अन्य 44 ठिकाणी छापे टाकून संशयितांना ताब्यात घेतले आहे.