‘एनआयए’ची धुरा मराठी अधिकाऱ्याकडे, सदानंद दाते यांची महासंचालकपदी नियुक्ती
By ऑनलाइन लोकमत | Published: March 28, 2024 06:22 AM2024-03-28T06:22:06+5:302024-03-28T06:22:50+5:30
१९९०च्या भारतीय पोलिस सेवेचे अधिकारी असलेले सदानंद दाते सध्या महाराष्ट्राच्या दहशतवादविरोधी दलाचे प्रमुख आहेत.
मुंबई : २६ नोव्हेंबर २००८ रोजी मुंबईवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यावेळी कामा रुग्णालयात दहशतवाद्यांशी मुकाबला करणारे भारतीय पोलिस सेवेतील महाराष्ट्र केडरचे अधिकारी सदानंद दाते यांची राष्ट्रीय तपास यंत्रणेच्या (एनआयए) महासंचालकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. ३१ डिसेंबर २०२६पर्यंत या पदावर त्यांची नियुक्ती असेल.
१९९०च्या भारतीय पोलिस सेवेचे अधिकारी असलेले सदानंद दाते सध्या महाराष्ट्राच्या दहशतवादविरोधी दलाचे प्रमुख आहेत. याच पदावरून त्यांची एनआयएमध्ये नियुक्ती करण्यात आली आहे. विशेष म्हणजे, दाते यांच्या बॅचचे व महाराष्ट्र केडरचे भारतीय पोलिस सेवेतील अधिकारी अतुलचंद्र कुलकर्णी सध्या एनआयएमध्ये विशेष महासंचालक आहेत. कुलकर्णी यांच्यानंतर दाते हे महाराष्ट्र केडरमधून एनआयएमध्ये जाणारे दुसरे अधिकारी ठरले आहेत.
कर्तव्यकठोर अधिकारी
पोलिस दलात कर्तव्यकठोर अशी सदानंद दाते यांची प्रतिमा आहे. २०२०मध्ये स्थापन झालेल्या मीरा - भाईंदर पोलिस आयुक्तालयाचे ते पहिले पोलिस आयुक्त होते, तर मुंबईतही त्यांनी कायदा व सुव्यवस्था विभागाचे सह-आयुक्त तसेच गुन्हे शाखेचे सह-आयुक्त म्हणून काम पाहिले आहे.
पुणे विद्यापीठातून अर्थशास्त्रात पदवी प्राप्त केल्यानंतर त्यांनी पीएच. डी. संपादित केली, तसेच कॉस्ट अँड मॅनमेजमेंटचे शिक्षणही पूर्ण केले आहे. आर्थिक गुन्हे शाखेतील त्यांची कामगिरी गाजली होती.
एनडीआरएफची धुरा आनंद यांच्याकडे
राजस्थान कॅडरचे १९९० च्या बॅचचे अधिकारी राजीव कुमार शर्मा यांना पोलिस संशोधन व विकास ब्युरोचे महासंचालक, तर १९९१ च्या बॅचच्या उत्तर प्रदेश कॅडरचे पीयूष आनंद यांचे राष्ट्रीय आपत्ती निवारण दलाच्या (एनडीआरएफ) प्रमुख पदी नियुक्ती केली.