साध्वी प्रज्ञासिंहला एनआयएची क्लीन चिट

By admin | Published: May 14, 2016 03:21 AM2016-05-14T03:21:45+5:302016-05-14T03:21:45+5:30

मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणात राष्ट्रीय तपास यंत्रणेने (एनआयए) शुक्र वारी मुंबईतील न्यायालयात दुसरे आरोपपत्र दाखल केले असून त्यात एनआयएने साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांना क्लीन चिट दिली असून

NIA's clean chit by Sadhvi Pragya Singh | साध्वी प्रज्ञासिंहला एनआयएची क्लीन चिट

साध्वी प्रज्ञासिंहला एनआयएची क्लीन चिट

Next

तुरुंगातून सुटकेचा मार्ग झाला सुकर
मुंबई : मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणात राष्ट्रीय तपास यंत्रणेने (एनआयए) शुक्र वारी मुंबईतील न्यायालयात दुसरे आरोपपत्र दाखल केले असून त्यात एनआयएने साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांना क्लीन चिट दिली असून, कर्नल श्रीकांत पुरोहित यांच्यावरील मकोकातंर्गत आरोप हटवले आहेत. यामुळे प्रज्ञासिंह व पुरोहित यांना मोठा दिलासा मिळाला असून, प्रज्ञासिंहच्या तुरुंगातून सुटकेचा मार्ग सुकर झाला असून, पुरोहितही जामिनावर बाहेर येण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
बॉम्बस्फोटातील प्रज्ञाचा सहभाग स्पष्ट करणारे ठोस पुरावे मिळाले नसल्याचे एनआयएने मागच्या महिन्यात म्हटले होते. नाशिक जिल्ह्याच्या मालेगाव शहरात २९ सप्टेंबर २00८ मध्ये झालेल्या स्फोटप्रकरणी एनआयएने एकूण १४ जणांना आरोपी बनवले होते. यात पुरोहितचाही समावेश होता. बाइकवरील दोन बॉम्बच्या स्फोटांत सात जण ठार झाले होते. महाराष्ट्र दहशवाद विरोधी पथकाचे प्रमुख हेमंत करकरे यांच्या नेतृत्वाखाली सुरु वातीला तपास झाला होता. नंतर हा तपास एनआयएकडे देण्यात आला. पुरोहित आणि प्रज्ञा ठाकूरशिवाय शिवनारायण कालसांगरा, श्याम साहू, रमेश उपाध्याय, समीर कुलकर्णी, अजय, राकेश धावडे, जगदीश म्हात्रे, सुधाकर द्विवेदी, सुधाकर चतुर्वेदी आणि प्रवीण तकालकी यांनाही अटक झाली होती.
यापूर्वीच एनआयएने साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर व पुरोहित यांच्यावर लावण्यात आलेला मकोका हटवण्यासंदर्भात कायदा मंत्रालय आणि अ‍ॅटर्नी जनरल मुकुल रोहतगी यांच्याकडून मत मागितले होते.केंद्रात व राज्यात सत्तापालट झाल्यानंतर राष्ट्रीय तपास यंत्रणेची मालेगाव स्फोटातील आरोपींबाबतची भूमिका सौम्य झाल्याचा आरोप करण्यात आला होता.
हा खटला चालवणाऱ्या सरकारी वकील अ‍ॅड. रोहिणी सालियन यांनीच तशी तक्रार केली होती. आपणावर दबाव येत असल्याची तक्रार करताना त्यांनी एनआयएचे अधीक्षक सुहास वारके यांचे नावही घेतले होते. त्यामुळे हे प्रकरण यापुढेही सौम्यपणे हाताळले जाईल, अशी चर्चा सुरू आहे.
कडव्या हिंदुत्ववादी संघटनांच्या कार्यकर्त्यांबद्दल मवाळ धोरण स्वीकारा असा संदेश एनआयएकडून आल्याचा आरोपही त्यांनी गेल्या वर्षी केला होता. काँग्रेसची टीका
आपल्या परिवारातील मंडळींना सोडून देण्यासाठी भाजपाने आणि मोदी सरकारने हे चालवले आहे. या पद्धतीने आरोपींबाबत सौम्य भूमिका घेण्याचा प्रकार अतिशय चुकीचा आहे.
- दिग्विजयसिंह,
काँग्रेस नेते
>हेमंत करकरे यांच्या तपासावर शंकाएनआयएनच्या आधी तपासाचे काम महाराष्ट्र एटीएसकडे होते आणि हेमंत करकरे यांच्याकडे तपासाची सूत्रे होती. पण नंतर तपास एनआयएकडे गेला. एनआयएने एटीएसच्या तपासाबद्दल शंका उपस्थित केली आहे. तसेच पाकिस्तानी अतिरेक्यांनी केलेल्या मुंबई हल्ल्यात लढताना हुतात्मा झालेल्या स्व. करकरे यांच्याविषयीही प्रश्नचिन्ह उपस्थित केले गेले आहे. हा तपास हेमंत करकरे यांनी सुरू करून प्रज्ञासिंगसह अनेकांना अटक करताच, भाजपा नेत्यांनी त्यांच्यावर जाहीरपणे टीका केली होती. टीका करणाऱ्यांमध्ये लालकृष्ण अडवाणी आणि शिवराजसिंग चौहान हेही होते.
>साक्षी-पुराव्यांच्या मूल्यमापनानुसार प्रज्ञासिंहविरुद्ध खटला चालविण्यासाठी पुरेसे पुरावे नाहीत. कारण साक्षीदाराने दिलेली साक्ष मागे घेतल्याने प्रज्ञाविरुद्ध कायदेशीर मुद्दाच राहत नाही,
असे ‘एनआयए’ने म्हटले आहे.

Web Title: NIA's clean chit by Sadhvi Pragya Singh

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.