चोख बंदोस्तात 'नीट- २' सुरळीत

By Admin | Published: July 24, 2016 08:28 PM2016-07-24T20:28:18+5:302016-07-24T20:28:18+5:30

नीट-२साठी आखून दिलेले कडक नियम व अटींमुळे रविवारी अनेक विद्यार्थ्यांच्या आशा-आकांक्षांवर विरजण पडले.

'Nice-2' in the right balance | चोख बंदोस्तात 'नीट- २' सुरळीत

चोख बंदोस्तात 'नीट- २' सुरळीत

googlenewsNext

ऑनलाइन लोकमत
औरंगाबाद, दि. 24 - केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने (सीबीएसई) नीट-२साठी आखून दिलेले कडक नियम व अटींमुळे रविवारी अनेक विद्यार्थ्यांच्या आशा-आकांक्षांवर विरजण पडले. औरंगाबादेतील १३ केंद्रांवर पोलिसांच्या कडक बंदोबस्तात जवळपास ९० टक्के विद्यार्थ्यांनीच रविवारी ही परीक्षा दिली.
वैद्यकीय अभ्यासक्रमांसाठी राष्ट्रीय पातळीवर एकच सामायिक प्रवेश परीक्षा (नीट) घेण्याचा आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिल्यानंतर विद्यार्थ्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला. दरम्यान, १ मे रोजी पहिल्या टप्प्याची परीक्षा झाली. गेल्या वर्षी हीच परीक्षा प्री मेडिकल एंट्रन्स टेस्ट म्हणून घेण्यात आली होती. त्यात मोठ्या प्रमाणात गोंधळ झाला होता. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाने ती परीक्षाच रद्द केली होती. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार नॅशनल एंट्रन्स इलिजीबिलीटी टेस्ट अर्थात नीट-२ ही परीक्षा आज २४ जुलै रोजी औरंगाबादेतील १३ केंद्रांवर घेण्यात आली. मराठवाडा, खान्देश, विदर्भाचे काही जिल्हे, पश्चिम महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांतील ५ हजार ९०० विद्यार्थ्यांनी या परीक्षेसाठी नोंदणी केली होती.
दिल्ली येथून सीबीएसईह्णचे २८ अधिकारी रविवारी औरंगाबादेत तळ ठोकून होते. यातील ८ अधिकाऱ्यांच्या पथकांनी सर्व केंद्रांना सतत भेटी दिल्या. परीक्षा केंद्रांवर अभूतपूर्व सुरक्षा व्यवस्था करण्यात आली होती. प्रत्यक्षात सकाळी ९.३० वाजेपासून परीक्षा सुरू होणार असल्यामुळे किमान १ तास अगोदर केंद्रांवर उपस्थित राहण्याची सक्ती विद्यार्थ्यांना करण्यात आली होती. मात्र, बहुतांशी परीक्षा केंद्रे ही शहराबाहेर ह्यसीबीएसई शाळांमध्ये असल्यामुळे बाहेरगावच्या विद्यार्थ्यांना केंद्रांपर्यंत पोहोचण्यास १०-१५ मिनिटे उशीर झाला. त्यामुळे अशा अनेक विद्यार्थ्यांना परीक्षेस बसू देण्यात आले नाही. दुरून आल्यानंतरही परीक्षेपासून मुकावे लागलेल्या विद्यार्थ्यांनी तसेच पालकांनी विनंती केल्यानंतरही त्यांना केंद्रांमध्ये प्रवेश मिळू शकला नाही.

सीबीएसईचे जाचक निर्बंध
सर्व केंद्रांच्या मुख्य प्रवेशद्वारावर मेटल डिटेक्टरमार्फत विद्यार्थ्यांची तपासणी केल्यानंतरच त्यांना प्रवेश देण्यात आला. केंद्रांमध्ये विद्यार्थ्यांना मोबाईल, कॅलक्युलेटर, टोपी, अंगठी, ब्रेसलेट, मनगटी घड्याळ, पादत्राणे, पेन-पेन्सिल नेण्यास मनाई होती. केंद्रामध्येच विद्यार्थ्यांना पेन-पेन्सिल देण्यात आली. या परीक्षेत विद्यार्थ्यांना गणवेश संहिताही लागू करण्यात आलेली होती. माळीवाडा येथील जैन इंटरनॅशनल स्कूलने या परीक्षेत समन्वयकाची भूमिका बजावली. भौतिकशास्त्राचा पेपर कठीण गेल्याचे अनेक विद्यार्थ्यांनी सांगितले.

Web Title: 'Nice-2' in the right balance

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.