हॅकिंगचे नायजेरिया ‘कनेक्शन’
By Admin | Published: October 16, 2015 04:01 AM2015-10-16T04:01:45+5:302015-10-16T04:01:45+5:30
मोबाईल डेटा हॅक करून, बँक खात्यातून ४९ लाख रुपये काढून घेणाऱ्या टोळीचे कनेक्शन, कोलकातामार्गे थेट नायजेरियात असल्याचे पोलीस तपासात उघड झाले आहे.
राजेश निस्ताने, यवतमाळ
मोबाईल डेटा हॅक करून, बँक खात्यातून ४९ लाख रुपये काढून घेणाऱ्या टोळीचे कनेक्शन, कोलकातामार्गे थेट नायजेरियात असल्याचे पोलीस तपासात उघड झाले आहे. यवतमाळमधील या प्रकारामुळे राज्यात पोलिसांना अॅलर्ट करण्यात आले आहे.
पोलिसांनी या टोळीतील कृष्णकुमार मिश्रा (बिहार), सतीशकुमार यादव (आंध्र प्रदेश), राजा भट्टाचार्य (कोलकाता) यांना अटक केली आहे. त्यांच्याकडे बनावट कागदपत्रे आणि २२ ते २५ एटीएम कार्ड आढळली. मोबाईल-ईमेल-वेबसाईट हॅक करून, आर्थिक फसवणूक करणाऱ्या या टोळीला पोलीस दलात ‘नायजेरियन प्रॉडक्ट’ म्हणून ओळखले जाते.
ही आंतरराष्ट्रीय टोळी कमिशन बेसिसवर स्थानिक गुन्हेगारांना वापरते. आर. के. उर्फ रविकुमार मानकर हा या टोळीचा राज्यातील म्होरक्या आहे. तो वैदर्भीय असून, त्याने मुंबईत बस्तान बसवले आहे. सध्या तो नागपूर कारागृहात आहे. अमजद हासुद्धा या टोळीचा प्रमुख सदस्य आहे. एक मास्टर माइंड कोलकात्यात असून, ‘बॉस’ नायजेरियात आहे. त्याच्या सूचनेनुसारच सोशल साईट हॅक करण्याचे प्रकार चालतात. येथील मॅक मोटर्सचे संचालक प्रियांक चंद्रशेखर देशमुख यांच्या खात्यातून ४९ लाख रुपये १३ आॅक्टोबर रोजी परस्परच दुसऱ्या खात्यात वळते करण्यात आले होते. या प्रकरणी वडगाव रोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे.
मोबाईल डेटा हॅक करून विशेष पासवर्डद्वारे ४९ लाखांची रक्कम हॅकर्सनी एका खात्यात वळती केली. अॅक्सिस बँकेच्या कोलकाता शाखेत दोन महिन्यांपूर्वी हे खाते उघडले होते. त्यानंतर यातील १९ लाखांपैकी बरीच रक्कम आरटीजीएसद्वारे सुरुवातीला तीन खात्यांत वळती करण्यात आली. त्यानंतर त्यातून ती वेगवेगळ्या सहा खात्यांमध्ये व पुन्हा वेगवेगळ्या १२ खात्यांमध्ये तुकड्या-तुकड्यांत वळती करण्यात आली.
>> कृष्णकुमार आणि टोळीला कोलकात्यामधून आॅपरेट केले जात होते. त्यांना नाशिक व यवतमाळमध्ये दोन टार्गेट दिली होती. त्या दोन्ही व्यक्तींची संपूर्ण माहिती पुरविली होती. कृष्णकुमार व साथीदार हावडावरून नाशिकला आले. नाशिकमध्ये यश आले नाही. १३ आॅक्टोबरला अमरावतीत पोहोचले. प्रियांक देशमुख यांच्या नावाची बनावट कागदपत्रे देऊन, त्यांनी वोडाफोनचे नवीन सीमकार्ड खरेदी केले. सेंटरने फारशी शहानिशा न करता, १५ मिनिटांत कार्ड अॅक्टिव्हेट केले.
मास्टर माइंडने प्रियांक यांच्या मोबाईलवरील सर्व डेटा त्या कार्डवर सेव्ह केला. मिळालेल्या माहितीच्या आधारे कृष्णकुमार टोळीने ४९ लाखांची रक्कम ट्रान्सफर केली. अमरावतीमध्ये सोन्याची व इतर खरेदी केली. वेगवेगळ्या बँकांच्या २२ ते २५ एटीएमद्वारे प्रत्येकी ४५ ते ५० हजारांची रक्कम काढली. सुमारे १९ लाख रुपयांची ही फसवणूक झाली. उर्वरित ३० लाखांची रक्कम बँकेने ऐनवेळी लॉक केल्याने सुरक्षित राहिली.