एमडी तस्करीच्या वादातून नायजेरियनची हत्या
By Admin | Published: September 22, 2016 02:46 AM2016-09-22T02:46:45+5:302016-09-22T02:46:45+5:30
एमडी तस्करीच्या वादातून त्रिकूटाने नायजेरियन नागरिकाची हत्या झाल्याचे पोलिसांनी अटक केलेल्या त्रिकूटाच्या चौकशीत उघड झाले.
मुंबई : एमडी तस्करीच्या वादातून त्रिकूटाने नायजेरियन नागरिकाची हत्या झाल्याचे पोलिसांनी अटक केलेल्या त्रिकूटाच्या चौकशीत उघड झाले. आलम अली शेख, युसुफ अली शेख, अफझल अली शेख अशी अटक आरोपींची नावे आहेत. डोंगरी पोलीस त्यांच्याकडे अधिक तपास करत आहेत.
नायजेरियन नागरिक सॅमसन चीविस्टीयन चिडकवे (२७) १७ सप्टेंबर रोजी आलमला एमडी विकण्यास आला होता. ते दोघे सॅण्डहर्स्ट रोड रेल्वे स्टेशन यार्ड येथे भेटले. दरम्यान, एमडीची टेस्ट केल्यानंतर आलमने एमडी घेण्यास नकार दिला. यातूनच दोघांमध्ये वाद झाले. अशात आलमने युसुफ आणि अफझललाही बोलावून घेतले. त्यांनी धारदार शस्त्रांनी सॅमसनवर हल्ला चढवला. यात सॅमसन गंभीर जखमी झाला. त्याच्यासोबत असलेल्या मित्राने अटकेच्या भीतीने सॅमसनला वाशी येथील शासकीय रुणालयात दाखल केले. त्या वेळी उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. वाशी पोलिसांनी हत्येचा गुन्हा नोंदवत हा गुन्हा पुढील तपासासाठी डोंगरी पोलिसांकडे वर्ग केला. डोंगरी पोलिसांनी बुधवारी या तिघांनाही अटक केली. यापैकी आलम हा अभिलेखावरील आरोपी आहे अशी माहिती पोलीस उपायुक्त मनोज शर्मा यांनी दिली. (प्रतिनिधी)