पुण्यात नायजेरियन तरुणाकडून अंमली पदार्थ जप्त
By admin | Published: January 10, 2017 09:29 PM2017-01-10T21:29:24+5:302017-01-10T21:29:24+5:30
कोकेन व मेफेड्रोन विक्रीसाठी आलेल्या एका नायजेरियन तरुणाला अंमली पदार्थ विरोधी पथकाने लष्कर परिसरात सापळा रचून अटक केली. त्याच्याकडून पोलिसांनी १लाख २५ हजार रुपयांचे
Next
ऑनलाइन लोकमत
पुणे, दि.10 - कोकेन व मेफेड्रोन विक्रीसाठी आलेल्या एका नायजेरियन तरुणाला अंमली पदार्थ विरोधी पथकाने लष्कर परिसरात सापळा रचून अटक केली. त्याच्याकडून पोलिसांनी १लाख २५ हजार रुपयांचे २५ ग्रॅम मेफेड्रोन व १ लाख १० हजार रुपयांचे ११ ग्रॅम कोकेन तसेच एक दुचाकी असा २ लाख ७५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
मायकल औकेये क्लेम (वय २८, रा़ अंधेरी, मुंबई. मुळ नायजेरिया) असे या नायजेरियन तरुणाचे नाव आहे. बंडगार्डन पोलिस ठाण्यात त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एक नायजेरियन तरुण लष्कर परिसरातील एस. जी. एस. मॉलसमोर मोलेदीना रोड येथे कोकेन व मेफेड्रोन विक्रीसाठी येणार असल्याची माहिती अंमली पदार्थ विरोधी पथकाचे सहायक निरीक्षक अजय वाघमारे यांना मिळाली होती. त्यानुसार अंमली पदार्थ विरोधी पथकाच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रतिभा जोशी, स्वाती थोरात व त्यांच्या सहका-यांनी एस.जी.एस. मॉलसमोर सापळा रचून मायकल क्लेम याला ताब्यात घेतले. पोलिसांना त्याच्याजवळ २५ ग्रॅम मेफेड्रोन, ११ ग्रॅम कोकेन व एक दुचाकी मिळून आली. पोलिसांनी त्याच्याजवळील तब्बल पावणेतीन लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.