मुलांना कुशीत घेऊन जागावी लागते रात्र, लोक भीतीने शहारले
By ऑनलाइन लोकमत | Published: December 27, 2018 03:05 PM2018-12-27T15:05:33+5:302018-12-27T15:06:17+5:30
ऊसतोड कामगारांच्या वस्तीला पिसाळलेल्या कुत्र्यांचा धोका
- गोपालकृष्ण मांडवकर
सोलापूर : आपलं गाव आणि घर सोडून साखर कारखान्यांच्या सेवेसाठी आलेल्या ऊसतोड मजुरांच्या टोळ्यांना निवाऱ्याच्या नावाखाली जागा मिळाली असली तरी हे मजूर आणि त्यांचे कुटुंबीय मात्र असुरक्षितच आहेत. दार नसणाऱ्या झोपडीत देवावर हवाला ठेवून जगणाऱ्या सोलापुरातील सिद्धेश्वर सहकारी साखर कारखान्यालगतची ऊसतोड मजुरांची वस्ती सध्या पिसाळलेल्या कुत्र्यांच्या भीतीने शहारली आहे. साखर निर्मितीसाठी कारखान्यांना ऊस पोहोचविण्याच्या प्रक्रियेत मोलाची भूमिका पार पाडणाऱ्या या मजुरांच्या आयुष्यातील गोडवा मात्र येथे हरवला आहे.
सिद्धेश्वर सहकारी साखर कारखान्यालगतच्या परिसरात यंदा सुमारे १५० झोपड्या उभ्या आहेत. मागील दोन महिन्यांपासून लातूर, बीड, परभणी या जिल्ह्यांतून आलेले हजारो मजूर आणि त्यांचे कुटुंबीय ऊस मळ्यात पोटासाठी राबत आहेत. सिद्धेश्वर सहकारी साखर कारखान्यालगत असलेल्या टोळ्यांमध्ये बहुतेक बीड जिल्ह्यातील मजुरांचा समावेश आहे. या वस्तीला भेट दिली असता पिसाळलेल्या कुत्र्यांच्या दहशतीचे वास्तव सामोरे आले. विलास भोसले या ऊसतोड मजुराने सांगितलेली आपबिती अंगावर शहारे आणणारी आहे. अंगावर मोठ्या जखमा असलेली तीन ते चार कुत्री या परिसरात रात्री-बेरात्री कधीही येतात. मागील आठवड्यात भल्या पहाटे रानात जाण्याच्या तयारीत असतानाच एक जखमी कुत्रा थेट झोपडीच्या दिशेने आला. वस्तीमधील एका झोपडीत असलेल्या दोन कुत्र्यांपैकी एकाला त्याने चावा घेतला. आठवडाभरापासून ही दहशत येथे आहे. त्यामुळे रात्री मुलांना कुशीत घेऊन जागावे लागते, अशी व्यथा या मजुराने सांगितली. वस्तीलगत असलेल्या झाडीमध्ये अनेक बेवारस कुत्र्यांचा वावर असल्याने शौचविधीला जाणेही धोकादायक झाले आहे. राजेंद्र बाबर, सुमितनाथ शिंदे, त्र्यंबक मुंडे या मजुरांनीही हीच व्यथा मांडली.
वस्तीवरील मजूर दिवसभर उसाच्या मळ्यात असतात. लहान मुलांना कुणाच्या भरवशावर झोपडीत ठेवायचे, ही येथे सर्वांचीच समस्या आहे. नाईलाजाने अनेक जण मुलांना सोबत घेऊनच ऊस तोडीच्या कामाला जातात.
या वस्तीमध्ये ४० बैलगाड्या, ४५ ट्रॅक्टर असलेले शेतमजूर वास्तव्याला आहेत. लहान-मोठ्या मिळून १५० च्या जवळपास झोपड्या असल्या तरी पाण्याची तोकडी व्यवस्था वगळता कोणत्याही सुविधा येथे नाहीत. वस्तीसाठी कारखान्याने चार ठिकाणी मर्क्युरी लाईटचे खांब उभारले आहेत. हाच काय तो या वस्तीला उजेडाचा आधार. वैद्यकीय सेवाही या वस्तीपासून लांब असल्याने रात्री-अपरात्री अडचण आल्यास थेट शहरातच जावे लागते.
पाळणाघराचा सोईस्कर विसर
वस्तीवरील अनेक मुलांना लहान भावंडांचा सांभाळ करावा लागत असल्याने शाळेत जातच नाहीत. अनेक कुटुंबात लहान मुलांना सांभाळणारे कुणी नसल्याने त्यांना शेतमळ्यावर सोबत न्यावे लागते. अशा स्थलांतरित मजुरांच्या मुलांसाठी साखरशाळेच्या धर्तीवर पाळणाघराचीही तरतूद आहे. मात्र त्याचा येथे सर्वांनाच सोईस्करपणे विसर पडला आहे.
दोन दिवसाआड पाणी
च्या वस्तीवर मिळणारे पाणी अशुद्ध आहे. ते सुद्धा दोन दिवसाआड मिळते. ते पिण्यायोग्य नसल्याने जवळच्या सिद्धेश्वर शाळेतून या मजुरांना पाणी आणावे लागते. ते साठविण्याची पुरेशी व्यवस्था नसल्याने ऊसतोडीच्या कामावरून थकून भागून वस्तीला आल्यावर आधी पिण्याच्या पाण्यासाठी हंडा डोक्यावर घेऊन निघावे लागते.