उद्योगनगरीत रात्रीची सुरक्षा रामभरोसे
By admin | Published: April 6, 2017 12:59 AM2017-04-06T00:59:48+5:302017-04-06T00:59:48+5:30
उद्योगनगरीच्या परिसरातील वाकड, ताथवडे, थेरगाव व देहूरोड परिसरात गुन्हेगारी वाढत चालली आहे.
पिंपरी : उद्योगनगरीच्या परिसरातील वाकड, ताथवडे, थेरगाव व देहूरोड परिसरात गुन्हेगारी वाढत चालली आहे. गाड्या फोडणे, दहशत माजविणे, प्राणघातक हल्ले करणे, असे प्रकार सर्रास घडत आहेत. याकडे पोलिसांचे दुर्लक्ष होत असल्याची, नागरिकांची तक्रार आहे. शहरात अनेक ठिकाणी नियम धाब्यावर बसवून अवैध धंदे रात्रभर सुरू असल्याचे चित्र ‘लोकमत’ ने केलेल्या स्टिंग आॅपरेशनमध्ये उघड झाले. त्यामुळे उद्योगनगरीचा परिसर रात्रीच्या वेळी सुरक्षित नसल्याचे उजेडात आले आहे.
>पोलिसांसमोरच अवैध धंदे
बोपखेल : गणेशनगर भागात रात्री दहा नंतरही बीयर शॉपी व चायनीज स्टॉल चालू असतात. गणेशनगर भागातील बीयर शॉपी व त्यामागेच चालू असलेला अवैध विदेशी दारूचा धंदा रात्री उशिरापर्यंत चालू असतो़ तसेच त्याच्या शेजारीच असलेले चायनीज स्टॉल चालू असते़ यामध्ये मद्यपींची गर्दी असते. पोलिसांची गस्त घालणारी गाडी येऊनही काहीच फायदा होत नाही़ पोलिसांसमोरच हे धंदे चालू असतात व त्यांना पोलीस कुठल्याही प्रकारची विचारणा करत नाहीत, असे निदर्शनास आले आहे.
>मध्यरात्रीपर्यंत अवैद्य व्यवसाय
रावेत : रावेत प्राधिकरणाचा हा मुख्य चौक असून, दररोज रात्री या ठिकाणी अनेक व्यावसायिक आपली हातगाडीवरील विविध दुकाने थाटत असतात़ रात्री १०.२५ वा. डॉ. आंबेडकर चौकात आइस्क्रीम, ज्यूस, कच्छी दाभेली, वडापाव, पावभाजी, चायनीज आदी चालू असलेल्या पहावयास मिळतात़ या मार्गावर अनेक टवाळखोर मुले आपल्या दुचाकी जोरात चालवून टावळखोरी करीत असलेले पहावयास मिळाले़
महाविद्यालय परिसरात चायनीज सेंटर
वेळ : रात्री १0.३८ वाजता
धर्मराज चौक ते भोंडवे कॉर्नर या मार्गावर दुतर्फा हातगाडे व्यावसायिकांबरोबरच अनेक हॉटेल्स व इतर दुकाने चालू होती़ ज्यूस सेंटर, चायनीज, भुर्जी, पावभाजी आदी हातगाडीवर सर्व पदार्थांची विक्री चालू होती़ महाविद्यालयीन परिसर असल्यामुळे या परिसरात अनेक
विद्यार्थी, विद्यार्थिनी येथे वास्तव्यास आहेत़ रात्री उशिरापर्यंत ही दुकाने चालू असल्यामुळे येथे तरुण-तरुणींची सतत गर्दी असते. येथे अनेक मद्यधुंद नागरिक आढळले़
आकुर्डी रेल्वे स्टेशन, गुरुद्वारा चौक
वेळ : रात्री ११.१० ते १२.००
या ठिकाणी अनेक हॉटेल्स, खानावळी, चायनीज हातगाडे व हॉटेल्स,पानपट्टी, अंडा भुर्जीची हातगाडे आहेत़ रात्री लोणावळा आणि पुण्याहून येणाऱ्या शेवटच्या लोकलपर्यंत बिनधास्तपणे चालू असतात़ या ठिकाणी असणाऱ्या एका चायनीज हातगाडीवर दुचाकीवरून तीन तरुण आले त्यांनी खिश्यातून दारूची बाटली काढली व हातगाडीवाल्याकडे ग्लासची मागणी केली, त्यांनी लगेच त्यांना ग्लास पुरवले़
ठिकाण : चिंचवड रावेत मार्ग
वेळ : रात्री १२.३० वाजता
या मार्गावर अनेक हॉटेल व्यावसायिक आहेत़ तेथे विना परवाना दारूविक्री राजरोसपणे मध्यरात्रीपर्यंत चालू असते़ केवळ पुढील गेट बंद असल्यासारखे दाखवून इतर मार्गाने ही हॉटेल्स मध्यरात्रीपर्यंत चालू होती़ तसेच या मार्गावर असणारे चायनीज गाड्या, पानटपऱ्या अनेक वेळा मध्यरात्र उलटून गेली तरी बिनधास्तपणे चालू असतात़
>चौकांत बेकायदा हातगाड्या
थेरगाव : हिंजवडी वाकड परिसरातील भूमकर चौक, मारुंजी रोड, सिम्बॉयसिस रोड, वाकड या ठिकाणी रात्री उशिरापर्यंत अवैध व्यवसाय चालू असतात. अनेक पान टपऱ्या, चायनीज सेंटर चालकांनी अवैधरीत्या मद्यप्राशन केंद्रच उघडले आहे. रात्रीच्या वेळेस या हातगाड्या, पान टपऱ्यांवर दारूड्यांचा मेळा भरत असल्याचे चित्र दिसले. पोलिसांच्या डोळ्यांदेखत अवैध धंदे चालत असतानाही, अद्यापपर्यंत एकाही व्यावसायिकाविरुद्ध पोलिसांनी कारवाई केली नाही किंवा त्याला प्रतिबंध घालण्याचा प्रयत्नसुद्धा केला नाही. काही पोलीस कर्मचारीसुद्धा रात्रीच्या वेळी चायनीज सेंटर आणि पान टपरीवर येऊन खाण्याचा आनंद लुटतात. या भागात सर्वच ठिकाणी पोलिसांची रात्रीची गस्त असलेली गाडी फिरकत नाही़
बालकामगार राबतात
वेळ रात्री ११़०० वाजताची एका हातगाडीवर हातगाडी चालक व त्याचे मित्र एकमेकांस शिवराळ भाषेत डिश रस्त्यावर फोडीत पाणी एकमेकांच्या अंगावर ओतीत होते. रस्त्यावर सैरभर धावत होते़ त्यांच्या हातात असलेल्या लहान पिशवीत दारू होती. मुले वयाने अगदी लहान असून, जिथे धंदा करायला परवानगी नाही तिथेच डिश फोडणे, कचरा करणे, दंगा मस्ती करणे हे प्रकार सुरूहोते.
प्राधिकरणात शुकशुकाट
प्राधिकरण येथील पोलीस चौकीत शुकशुकाट पाहायला मिळाला़ एकही पोलीस कर्मचारी पाहायला मिळाला नाही़ एका खोलीचे दार व लाइट बंद होते, तर दुसरे दार अर्धवट उघडे होते. शोधूनही पोलीस कर्मचारी सापडला नाही. शेजारीच काही तरुण दारू पीत बसले होते.
ट्रान्सपोर्टनगरी, निगडी
रात्री साडेअकराच्या सुमारास तरुण आणि तरुणींचे एक टोळके बिनधास्तपणे हातात हात घालून परिसरात भटकत होते़ रस्त्यावर उभ्या असलेल्या ट्रेलरवर चढून सेल्फी काढत, खिदळत कितीतरी वेळ ते भटकत होते. दरम्यान, त्याच सुमारास पोलिसांचे गस्ती पथक वाहन तेथून गेले़ परंतु, त्यांनी कोणालाही हटकले नाही़ यावरून या सर्व कारभाराला पोलिसांची मूक संमती असल्याचे जाणवले. नवीन देहू आळंदी रस्ता वाहतुकीसाठी खुला करण्यात आला असून, टवाळखोर मुलांना हक्काचे ठिकाण झाले आहे.
मधुकरराव पवळे उड्डाण पूल, निगडी
‘फ’ प्रभागाच्या प्रवेश द्वारासमोरच आइस्क्रीमच्या गाड्या सुरू झाल्याने निम्मा रस्ता ग्राहकांनी व बसण्याच्या टेबलांनी व्यापलेला आहे़ ग्रहाक आइस्क्रीम खाण्यात दंग असल्याने रस्त्यावरून मोठे वाहन जात असल्याचे भान कुणाला राहत नाही. रात्री १२ वाजून गेले तरी या गाड्या अशाच सुरू होत्या़ वातावरणातील तापमानामुळे आइस्क्रीम खाणाऱ्यांची संख्या वाढलेली दिसली.
>स्थळ : उद्योगनगर
भोईरनगर चौकातून चिंचवड रेल्वे स्टेशनकडे जाणाऱ्या रस्त्यावर खांबेमळा या भागातील एका घरात खाद्य पदार्थ व तंबाखूजन्य पदार्थांची विक्री सुरू होती. रस्त्यावर अनेक दुचाकी अस्तव्यस्त उभ्या होत्या. १५ ते २० जण येथे सिगारेट ओढत होते. तर काही जण गाडीत बसून मद्यपान करीत होते. रहिवासी भागात असणारा हा व्यवसाय खुले आम सुरू होता. १०़५० ला दुचाकीवर तीन मुली या ठिकाणी आल्या. तिथे उभ्या असणाऱ्या त्यांच्या सहकार्याने त्यांना सिगारेट आणून दिल्या. या मुली बिनधास्तपणे सिगारेट ओढत होत्या.
स्थळ : चापेकर चौक, चिंचवड
सर्व दुकाने बंद झाली होती. मात्र, रस्त्यावर असणाऱ्या हातगाड्यांवर खाद्य पदार्थांची विक्री सुरू होती. पोलीस स्टेशनपासून हाकेच्या अंतरावर असणारे पान शॉप रात्री उशिरापर्यंत सुरू असल्याचे दिसले. मुख्य बाजारपेठेतील जनरल स्टोअर्स रात्री बारापर्यंत सुरू होते. हीच परिस्थिती मोरया गोसावी समाधी मंदिर परिसरात होती. अनेक जण पानाच्या दुकानांसमोर उभे होते. चापेकर चौक परिसरात असणारे वाईन्सशॉप व बार उशिरापर्यंत सुरू होते. या भागात पोलिसांची वर्दळ असूनही कोणतीही कारवाई केली जात नाही.
>स्थळ : चिंचवड रेल्वे स्टेशन
पुणे-मुंबई महामार्गावर चिंचवड रेल्वे स्टेशन परिसरात अनेक हातगाड्यांवर खाद्य पदार्थ विक्री सुरू होती. रस्त्यालगत असणाऱ्या गाड्यांवर मद्यपी खुलेआम दारू पीत होते. त्यांच्यासाठी बसण्याची व्यवस्थाही केली होती. पाच जण हातात दारूचे ग्लास व बाटल्या घेऊन दारू पीत होते. याच्याच बाजूला दोन रिक्षा उभ्या होत्या़ यामध्ये रिक्षाचालक ही दारू पीत असल्याचे दिसले. या वेळी एका प्रवाशाने निगडीकडे जाणार का अशी विचारपूस केली. मात्र, रिक्षाचालकाच्या हातात दारूचा ग्लास पाहून त्याने काढता पाय घेतला.
अहिंसा चौक, चिंचवड
येथील आइस्क्रीम विक्री करणाऱ्या गाडीवर एका पोलिसाने हात केला. त्या वेळी त्या विक्रेत्याने कॅरीबॅगमध्ये दोन ग्लास पार्सल दिले. ही बॅग हातात घेऊन
पोलीस महाशय निघून गेले. या नंतर उशिरापर्यंत येथील गाड्या सुरूच होत्या.
पोलीस हे करतील का?
बीट मार्शल नेमके काय करतात, याची चौकशी
होईल का?
रात्रभर सुरू असणारे धंदे बंद करतील का?
टवाळखोर मुलांना रात्रीचे फिरणे बंद करतील का?