निकिताला जाळले की जळाली?
By admin | Published: October 4, 2015 02:09 AM2015-10-04T02:09:57+5:302015-10-04T02:09:57+5:30
शनिवारी रात्री महाविद्यालयीन विद्यार्थीनी फुटाळा चौपाटीच्या एका हॉटेलसमोर संशयास्पदरित्या जळाल्याने परिसरात खळबळ निर्माण झाली. निकिता विष्णूदास फुलवानी
नागपूर : शनिवारी रात्री महाविद्यालयीन विद्यार्थीनी फुटाळा चौपाटीच्या एका हॉटेलसमोर संशयास्पदरित्या जळाल्याने परिसरात खळबळ निर्माण झाली. निकिता विष्णूदास फुलवानी (वय २२) असे तिचे नाव आहे. निकिता ८० टक्के जळाली असून, तिची प्रकृती गंभीर आहे. तिने स्वत:ला जाळून घेतले की तिला कुणी जाळले, ते स्पष्ट होऊ शकले नाही. त्यामुळे उलटसुलट चर्चेला उधान आले आहे.
निकीता सोमलवारच्या टेक्सटाईल्स सायन्सची विद्यार्थीनी असून, ती सीताबर्डीतील बुटी मार्गावर राहते. तिचे वडील व्यापारी असल्याची माहिती आहे. फुटाळा चौपाटीवर ‘फर्स्ट लव्ह’ नावाचे रेस्टॉरेंट आहे. दोन तीन वर्षांपासून ते बंदच आहे. मध्यरात्रीपर्यंत प्रेमी युगूलांसोबत समाजकंटकांचीही चौपाटी परिसरात मोठी गर्दी असते.
या रेस्टॉरेंटच्या बाजुने रात्री ९.३० च्या सुमारास तरुणीच्या किंकाळ्या ऐकू आल्यामुळे आजुबाजुची मंडळी धावली. जळालेल्या अवस्थेत एक तरुणी हॉटेलजवळ पडून होती. ती वेदनांनी तडफडत होती. त्यामुळे काहींनी अंबाझरी पोलिसांना कळविले. घटनेचे गांभीर्य लक्षात
घेत अंबाझरीचे पीएसआय
पांडूरंगजी बोरगे आपल्या ताफ्यासह घटनास्थळी पोहचले. तोपर्यंत काहींनी तिला वाहनात घालून रुग्णालयात नेण्याची तयारी केली होती. पोलिसांनी नंतर तिला मेडिकलमध्ये नेले. (प्रतिनिधी)
काय घडले नेमके ?
दरम्यान, निकिताला जाळले की ती स्वत:हून जळाली हे स्पष्ट झाले नाही. त्यामुळे उलटसुलट चर्चेला उधान आले आहे. काहींच्या मते निकितासोबत एक तरुण होता. त्यानेच तिला पेटवून दिले आणि पळून गेला, अशी चर्चा घटनास्थळ परिसरात होती. दुसरीकडे निकिताच्या हातात पेट्रोलसारखा द्रवपदार्थ भरलेली बाटली होती. ती एकटीच रेस्टॉरेंटकडे जाताना काहींना दिसली. पोलिसांनी निकिताशी संबंधित व्यक्तींकडे चौकशी केली असता ती सीताबर्डीतील घरून ७.३० वाजता बाहेर पडली. नेहमी प्रमाणे अभ्यासाच्या निमित्ताने मैत्रीणींकडे जात असावी, असे समजून कुटुंबीयांनी फारसे लक्ष दिले नाही. मात्र, रात्री १० च्या सुमारास तिच्या कुटुंबीयांना ही माहिती कळाल्यानंतर हादरलेले फुलवानी कुटुंब लगेच मेडीकलकडे धावले. नेमकी ही घटना कशी घटली, कोणत्या कारणामुळे घडली, ते मध्यरात्रीपर्यंत स्पष्ट झाले नव्हते.