"कृषी कायदे मागे घेण्याचा निर्णय नाईलाजाने, शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होणार"

By ऑनलाइन लोकमत | Published: November 19, 2021 06:30 PM2021-11-19T18:30:03+5:302021-11-19T18:30:31+5:30

"शेतकऱ्याचा मुलगा म्हणून मला वाटते की, तीन कृषी कायद्यांमुळे शेतीमालाला चांगला भाव मिळणार होता आणि शेतकऱ्यांच्या आयुष्यात सूख येणार होते. पण..."

Nilaja's decision to repeal agricultural laws will hurt farmers | "कृषी कायदे मागे घेण्याचा निर्णय नाईलाजाने, शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होणार"

"कृषी कायदे मागे घेण्याचा निर्णय नाईलाजाने, शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होणार"

Next

कोल्हापूर - शेतकऱ्यांच्या आयुष्यात सूख आणि समृद्धी आणणारे तीन कृषी कायदे मागे घेण्याचा निर्णय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नाईलाजाने आणि दुःखाने घेतला आहे. पण त्यामुळे शेतकऱ्यांचे खूप नुकसान होणार आहे, अशी खंत भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत दादा पाटील यांनी शुक्रवारी व्यक्त केली. ते इचलकरंजी येथे पत्रकारांशी बोलत होते.

पाटील म्हणाले, शेतकऱ्याचा मुलगा म्हणून मला असे वाटते की, तीन कृषी कायद्यांमुळे शेतीमालाला चांगला भाव मिळणार होता आणि शेतकऱ्यांच्या आयुष्यात सूख येणार होते. पंजाब, हरियाणा आणि उत्तर प्रदेश या राज्यातील प्रत्येकी छोट्या भागातील शेतकऱ्यांच्या गटांनी या कायद्यांना विरोध केला तरी बाकी संपूर्ण देशात शेतकरी आणि त्यांच्या संघटनांना हे कायदे मान्य होते. एका छोट्या समुहाला कायद्यांचे महत्त्व पटवून देण्यात अपयश आले. एक विशिष्ट गट संपूर्ण देशभर या विषयावरून अस्वस्थता निर्माण करत होता. सर्वोच्च न्यायालयाने खडसावल्यानंतरही या शेतकऱ्यांचे आंदोलन चालूच राहिले. अखेरीस कायदे मागे घेण्याचा निर्णय झाला. पण त्यामुळे शेतकऱ्यांचे फार मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. हे कृषी कायदे शेतकऱ्यांच्या हिताचे कसे आहेत, हे पुन्हा एकदा समजाऊन सांगून ते अंमलात आणावेत.

पाटील म्हणाले, कृषी कायद्यांमुळे शेतकऱ्यांना बाजार समितीसोबतच बाहेर हवे तेथे माल विकण्याचे स्वातंत्र्य मिळणार होते. त्यामुळे स्पर्धा वाढून त्याला चांगला भाव मिळणार असताना त्याला विरोध करण्यासारखे काहीही नव्हते. कंत्राटी शेतीमुळे शेतकऱ्याला चांगला भाव मिळतो व अशी शेती राज्यात अनेक ठिकाणी यापूर्वीच राबविली जात आहे.

खासगीकरणाचा प्रस्ताव म्हणजे कामगारांच्या जखमेवर मीठ चोळणे -
एसटीचे सरकारमध्ये विलीनीकरण करण्यासाठी कामगार आंदोलन करत असताना खासगीकरणाचा प्रस्ताव आणणे म्हणजे कामगारांच्या जखमेवर मीठ चोळणे आहे. सार्वजनिक हितासाठी सरकारनेच एसटी चालवायला हवी आणि जनहितासाठी एसटीचा तोटाही सरकारने सहन करायला हवा, असे ते म्हणाले.

स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून विधान परिषदेवर निवडून द्यायच्या जागांपैकी कोल्हापूरसाठी भाजपने उमेदवार म्हणून अमल महाडिक यांच्या नावाची शिफारस पक्षाच्या केंद्रीय निवडणूक समितीकडे केली आहे. भाजप, ताराराणी आघाडी व जनसुराज्य यांची एकत्रित मते ध्यानात घेत भाजप ही जागा जिंकेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

Web Title: Nilaja's decision to repeal agricultural laws will hurt farmers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.