गोऱ्हेंचे ‘ते’ विधान मूर्खपणाचे; साहित्य संमेलनाच्या व्यासपीठावरून केलेल्या विधानावर शरद पवार यांनी फटकारले
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 25, 2025 06:12 IST2025-02-25T06:12:19+5:302025-02-25T06:12:38+5:30
कमी कालावधीत चार पक्ष बदललेल्या नीलम गोऱ्हे यांना आमदारकीच्या चार टर्म कशा मिळाल्या, हे सर्वांनाच माहिती आहे.

गोऱ्हेंचे ‘ते’ विधान मूर्खपणाचे; साहित्य संमेलनाच्या व्यासपीठावरून केलेल्या विधानावर शरद पवार यांनी फटकारले
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : शिंदेसेनेच्या नेत्या आणि विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी दिल्लीतील साहित्य संमेलनाच्या व्यासपीठावरून केलेले विधान मूर्खपणाचे होते, त्यावर अधिक भाष्य करण्याची आवश्यकता नाही, अशा शब्दांत ज्येष्ठ नेते आणि अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे स्वागताध्यक्ष शरद पवार यांनी सोमवारी पत्रकार परिषद घेऊन फटकारले.
कमी कालावधीत चार पक्ष बदललेल्या नीलम गोऱ्हे यांना आमदारकीच्या चार टर्म कशा मिळाल्या, हे सर्वांनाच माहिती आहे. गोऱ्हे यांनी प्रकाश आंबेडकरांसोबत काम केले, त्यानंतर त्या राष्ट्रवादीमध्ये आल्या. नंतर त्या ठाकरे यांच्या शिवसेनेत गेल्या. आता त्या शिंदेसेनेत काम करत आहेत. एवढ्या मर्यादित कालावधीत त्यांनी चार पक्ष बदलले. हा अनुभव लक्षात घेता त्यांनी असे भाष्य करायला नको होते, असा टोला पवार यांनी लगावला.
उद्धवसेनेचा टोला तर शिंदेसेनेकडून पाठराखण
उद्धवसेनेचे नेते संजय राऊत यांनी सोमवारीही गोऱ्हे यांचा अत्यंत तिखट शब्दांत समाचार घेतला. ज्या सोन्याच्या ताटात खाल्ले, त्यातच घाण करून गेल्या, असे राऊत म्हणाले.
...तर हा महिलांचा अपमान असून, त्या गाड्या कोणाच्या नावावर आहेत, हे आम्हाला बोलायला लावू नका. आम्ही बोललो तर इज्जत जाईल, असा इशारा देत शिंदेसेनेचे मंत्री संजय शिरसाट यांनी गोऱ्हे यांची पाठराखण केली.
राऊत म्हणाले ते बरोबरच
साहित्य संमेलनाच्या मंचावरून झालेल्या राजकीय चिखलफेकीला शरद पवारही जबाबदार आहेत. त्यामुळे पवारांनी गोऱ्हेंच्या वक्तव्याचा निषेध करावा, अशी मागणी खा. संजय राऊत यांनी केली होती.
त्यावर बोलताना पवार म्हणाले, राऊत म्हणाले ते १०० टक्के बरोबर आहे. मी साहित्य संमेलनाचा स्वागताध्यक्ष होतो. त्यामुळे त्यांना माझ्यावर जबाबदारी टाकायची असेल तर त्यावर माझा काही आक्षेप नाही. मात्र, साहित्य संमेलनाचा वापर हा राजकीय कारणासाठी होतोय, हा आरोप खरा नाही.
नैतिकता आणि मंत्र्यांचा काही संबंध नाही
बीड जिल्ह्यातील मस्साजोग येथील सरपंच देशमुख यांच्या हत्या प्रकरणानंतर ग्रामस्थांच्या आणि राज्यातील लोकांच्या तीव्र भावना पाहिल्यानंतर स्वाभिमान असणारी कुणीही व्यक्ती त्या पदावर अजिबात राहणार नाही.
यापूर्वी काही मंत्र्यांवर आरोप झाल्यानंतर त्यांना पद सोडावे लागले आणि चौकशी झाली होती. परंतु, सध्या आरोप होत असलेल्या मंत्र्यांचा आणि नैतिकतेचा काही संबंध असल्याचे जाणवत नाही, असा टोला पवार यांनी मंत्री धनंजय मुंडे आणि माणिकराव कोकाटे यांना लगावला.
त्या काय म्हणाल्या होत्या?
साहित्य संमेलनाच्या व्यासपीठावरून डॉ. नीलम गोऱ्हे यांनी उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेत दोन मर्सिडीज दिल्या की एक पद मिळत होते, असा आरोप केला होता.
बोलताना मर्यादा पाळा
प्रत्येकाने बोलताना मर्यादा पाळायला हव्यात, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपुरात पत्रकारांना सांगितले.