निलंगेकरांना आरोपी करण्याचा अर्ज फेटाळला
By Admin | Published: April 15, 2016 02:23 AM2016-04-15T02:23:00+5:302016-04-15T02:23:00+5:30
मुंबईत कुलाबा येथील लष्कराची जमीन आदर्श सहकारी गृहनिर्माण सोसायटीस देण्यासंबंधीच्या कथित घोटाळ््यात माजी मुख्यमंत्री शिवाजीराव देशमुख निलंगेकर यांनाही आरोपी करण्याचा
मुंबई : मुंबईत कुलाबा येथील लष्कराची जमीन आदर्श सहकारी गृहनिर्माण सोसायटीस देण्यासंबंधीच्या कथित घोटाळ््यात माजी मुख्यमंत्री शिवाजीराव देशमुख निलंगेकर यांनाही आरोपी करण्याचा आदेश केंद्रीय गुप्तचर संस्थेस (सीबीआय) द्यावा, अशी विनंती करणारा अर्ज मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळला.
ठाणे येथील सामाजिक कार्यकर्ते प्रवीण वाटेगावकर यांनी केलेला हा अर्ज फेटाळताना न्या. साधना जाधव यांनी नमूद केले की, तपास यंत्रणेला अशा प्रकारचा आदेश फक्त न्यायालयाचे द्विसदस्यीय खंडपीठच देऊ शकते. एकल न्यायाधीशास असा आदेश देता येणार नाही. शिवाय, वाटेगावकर यांनी या आधी अशीच विनंती करणारे अर्ज द्विसदस्यीय खंडपीठापुढे दोन वेळा केले होते व दोन्ही वेळा अर्ज मागे घेतल्याने खंडपीठाने ते निकाली काढले होते.
न्या. जाधव यांनी म्हटले की, ‘निलंगेकर यांना आरोपी करण्यासारखा कोणताही पुरावा तपासात समोर आलेला नाही, हिच सीबीआयची भूमिका पूर्वीप्रमाणे आताही कायम आहे. त्यामुळे एकाच प्रकारच्या विनंतीसाठी पक्षकाराने वारंवार अर्ज करीत राहणे, हा न्यायालयाच्या वेळेचा केवळ अपव्ययच नाही, तर तो न्यायालयीन प्रक्रियेचा दुरुपयोगही आहे.’
आदर्श सोसायटीला जमीन देण्यासंबंधीच्या निर्णय प्रक्रियेत निलंगेकर महसूलमंत्री या नात्याने एका टप्प्यात सहभागी होते व त्याच्या बदल्यात त्यांचे जावई डॉ. अरुण ढवळे यांना फ्लॅट देण्यात आला, असा वाटेगावकर यांचा आरोप होता.
यासाठी वाटेगावकर यांनी पहिला अर्ज २०१३ मध्ये केला व द्विसदस्यीय खंडपीठापुढे सुनावणीस आल्यावर तो मागे घेतला. नंतर त्यांनी तसाच अर्ज ‘आदर्श घोटाळा’ चालविणाऱ्या विशेष न्यायालयात केला. असा आदेश आपण देऊ शकत नाही, असे म्हणून विशेष न्यायालयाने अर्ज फेटाळल्यावर वाटेगावकर यांनी पुन्हा उच्च न्यायालयात अर्ज केला व तोही द्विसदस्यीय खंडपीठापुढे मागे घेतला. आताचा अर्ज हा तिसरा होता. (विशेष प्रतिनिधी)
जावयास मात्र केले आरोपी
सरकारी निर्णय प्रक्रियेत अधिकारपदांवरील विविध व्यक्ती आपापली मते/सूचना नोंदवत असतात. त्यास गुन्हेगारी स्वरूपाने पाहता येणार नाही, असे म्हणून सीबीआयने त्यांच्या प्रतिज्ञापत्रात निलंगेकरांना ‘क्लीन चिट’ दिली.
मात्र, ‘आदर्श’ सोसयटीतील बेनामी फ्लॅट खरेदीच्या संदर्भात ४५ आरोपींवर जे पुरवणी आरोपपत्र सादर केले आहे, त्यात कन्हैयालाल गिडवाणी व सुनील गिडवाणी यांच्या मे. जय महाराष्ट्र कन्झ्युमर प्रा. लि.च्या वतीने बेनामी खरेदीदार या नात्याने निलंगेकर यांचे जावई डॉ. अरुण ढवळे यांच्यासह संपत खिडसे यांना आरोपी केले गेले आहे, असे सीबीआयने नमूद केले.