लातुरमध्ये देशमुखविरुद्ध निलंगेकर लढाई
By admin | Published: January 20, 2017 12:09 AM2017-01-20T00:09:52+5:302017-01-20T00:09:52+5:30
लातूर जिल्ह्यात राजकीय पक्षांची आघाडी वा युती झाली अथवा नाही झाली तरी खरी लढाई देशमुखविरुद्ध निलंगेकर अशीच राहाणार आहे.
दत्ता थोरे,
लातूर- लातूर जिल्ह्यात राजकीय पक्षांची आघाडी वा युती झाली अथवा नाही झाली तरी खरी लढाई देशमुखविरुद्ध निलंगेकर अशीच राहाणार आहे. विलासरावांचे धोरले चिरंजीव अमित देशमुख यांच्या पाठोपाठ आता धाकटे चिरंजीव धीरज यांचेही राजकारणात पदार्पण होऊ घातले असून त्यांच्या ‘लाँचिंग’साठी काका दिलीपराव देशमुख यांनी मोर्चेबांधणी केली आहे,
जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद हे खुल्या गटाला असल्याने धीरज देशमुख यांची दावेदारी प्रबळ मानली जात आहे. मात्र, त्यांना रोखण्यासाठी पालकमंत्री संभाजीराव पाटील निलंगेकर यांच्या नेतृत्वाखाली भाजपाने तगडे आव्हान उभे केले आहे.
१९८२ साली लातूर जिल्हा परिषदेची स्थापना झाली. माजी मंत्री आमदार दिलीपराव देशमुख हे पहिले अध्यक्ष. तेव्हापासून आजतागायत जिल्हा परिषदेवर काँग्रेसचेच वर्चस्व राहिले. शिवाय, देशमुखांच्या गढीवरच जि. प. च्या किल्ल्या कायम राहिल्या. सध्या काँग्रेसकडे ३५ जागा आहेत, तर भाजपाकडे आठ, राष्ट्रवादीचे नऊ तर सेनेचे पाच सदस्य आहेत. सेनेला जिल्ह्यात चेहरा नाही. तर राष्ट्रवादी ‘गट’बंबाळ झालीय. त्यामुळे झुंज होईल ती काँग्रेस विरुध्द भाजपातच.
नगरपरिषद निवडणुकांमध्ये काँग्रेसला सर्व ठिकाणी सत्तेच्या भरल्या पंक्तीतून उठावे लागले. आधी लोकसभा, नंतर विधानसभा, नगरपंचायत आणि आता नगरपरिषद या सर्वच ठिकाणांहून जिल्ह्यात काँग्रेसला कुठेही समाधानकारक यश मिळाले नाही. बालेकिल्ल्यात चोहोबाजूंनी अशा पडझडीच्या मौसमात जिल्हा परिषद निवडणुकीचा बिगूल वाजला आहे. लातूर (१०), औसा (९), निलंगा (९), उदगीर (७), आणि अहमदपूर (६) या पाच तालुक्यात ४१ जागा आहेत. पैकी उदगीरसह जळकोटवर भाजपाचे आमदार सुधाकर भालेराव, अमहदपूरमध्ये नुकतेच भाजपात आलेले आमदार विनायक पाटील तर देवणी, शिरुरअनंतपाळ आणि निलंग्यावर खुद्द संभाजीराव पाटील यांचे वर्चस्व आहे.
तर काँग्रेसकडे अमित देशमुख (लातूर) , त्र्यंबक भिसे (लातूर ग्रामीण) व बस्वराज पाटील (औसा) असे राजकीय पाठबळ आहे. शिवाय, या निवडणुकीची सर्व सुत्रे दिलीपराव देशमुख यांनी हाती घेतल्याने त्यांचे ‘मॅनेजमेन्ट’ कौशल्य पणाला लागले आहे. या जिल्ह्याने पूर्वी विलासरावविरुद्ध शिवाजीराव पाटील निलंगेकर असा राजकीय संघर्ष पाहिला आहे. कालांतराने दोन्ही गटात समेट घडून विलासराव व निलंगेकर एकत्र आले. आता दुसऱ्यापिढीत पुन्हा हा संघर्ष उभा ठाकला आहे. विलासरावांचे चिरंजीव धीरज देशमुख यांची जिल्हा परिषदेत एन्ट्री रोखण्यासाठी संभाजीराव निलंगेकर यांनी कंबर कसली आहे.
सुरुवातीला अध्यक्षपद हे महिलेला राखीव होते. परंतु नव्याने झालेल्या सोडतीत ते खुुल्या गटाला आले.
या अदलाबदलीत देशमुख परिवाराला धीरज देशमुख यांच्या ‘पॉलिटिकल लॉचिंग’चे वेध लागले आहेत.