निलेश कराळे मास्तर विधानसभा निवडणूक लढवण्यास इच्छूक, या दोन मतदारसंघांवर ठोकला दावा
By ऑनलाइन लोकमत | Published: October 20, 2024 02:38 PM2024-10-20T14:38:00+5:302024-10-20T14:38:38+5:30
Maharashtra Assembly Election 2024: वर्धा जिल्ह्यातील वर्धा आणि आर्वी मतदारसंघातून निवडणूक लढण्यास निलेश कराळे (Nilesh Karale) हे इच्छूक आहेत. तसेच येथून लढण्याची संधी मिळावी, अशी मागणी त्यांनी पक्षाकडे केली आहे.
सोशल मीडिया आणि युट्युबवर प्रसिद्ध असलेले कराळे मास्तर अर्थात निलेश कराळे हे विधानसभा निवडणूक लढवण्यासाठी मोर्चेबांधणी करत आहेत. निलेश कराळे यांनी काही महिन्यांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश केला होता. दरम्यान, आता ते वर्धा जिल्ह्यातील वर्धा आणि आर्वी मतदारसंघातून निवडणूक लढण्यास इच्छूक आहेत. तसेच येथून लढण्याची संधी मिळावी, अशी मागणी त्यांनी पक्षाकडे केली आहे.
याबाबत प्रसारमाध्यमांशी बोलताना निलेश कराळे मास्तर यांनी सांगितले की, वर्धा आणि आर्वी विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्याची इच्छा मी व्यक्त केली आहे. हे मतदारसंघ काँग्रेसचे होते. मात्र मागच्या तीन वेळा वर्धा येथे काँग्रेसचा पराभव झालेला आहे. त्यामुळे आमच्या पक्षाने या मतदारसंघावर दावा केला आहे. लोकसभा निवडणुकीत आमच्या पक्षाचे खासदार निवडून आले आहेत. तसेच आर्वी मतदारसंघ हा खासदारसाहेबांचाच आहे, त्यामुळे तो सध्या रिक्त आहे. वर्ध्यामधील हिंगणघाट, वर्धा आणि आर्वी हे तीन मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाने मागितले आहेत. हिंगणघाट शरद पवार गटाकडे आहे. उर्वरित २ मतदारसंघांवरून सध्या वाद सुरू आहे, असे कराळे म्हणाले.
मी वर्धा मतदारसंघातून उमेदवारी मागितली आहे. तसेच आर्वी मतदारसंघामधूनही उमेदवारीसाठी दावा केला आहे. आता दोन पैकी एक मतदासंघ राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाला सुटू शकतो. त्याच्यावर चर्चा सुरू आहे. आता आज संध्याकाळपर्यंत किंवा उद्या सकाळपर्यंत त्यावर निर्णय येऊ शकतो, असे कराळे यांनी सांगितले.
ते पुढे म्हणाले की, सध्या जी हवा वाहत आहे, ती महाविकास आघाडीच्या बाजूने वाहत आहे. तसेच दोन्ही मतदारसंघांमधून राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे उमेदवार निवडून येऊ शकतात, असा विश्वासही निलेश कराळे यांनी व्यक्त केला.