साधी धमकी देण्याची लायकी नाही, मग आदित्यांना झेड सुरक्षा कशाला : निलेश राणे
By ऑनलाइन लोकमत | Published: December 25, 2019 04:40 PM2019-12-25T16:40:30+5:302019-12-25T16:40:50+5:30
ठाकरे लवकरच तोंडावर अपटणार असल्याची टीका सुद्धा राणेंनी यावेळी केली.
मुंबई: महाराष्ट्रात महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाल्यानंतर राज्यातील अनेक व्हीव्हीआयपी लोकांच्या सुरक्षेत बदल करण्यात आले आहेत. शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे चिरंजीव आदित्य ठाकरे यांच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली असून त्यांना झेड दर्जाची सुरक्षा देण्यात आली आहे. तर यावरून भाजपचे नेते निलेश राणेंनी आदित्य ठाकरेंवर टीका केली आहे.
आदित्य ठाकरेंवर टीका करताना राणे म्हणाले की, शिवसेना आमदार आदित्य ठाकरे यांच्यावर एकही केस नाही. आतापर्यंत त्यांना कुणी धमकी दिली नसून कुणाला धमकी देण्याची त्यांची लायकी नाही. असे असताना त्यांना झेड दर्जाची सुरक्षा देण्याची गरज काय? असा प्रश्न निलेश राणेंनी उपस्थित केला.
तर आदित्य ठाकरेंना झेड दर्जाची सुरक्षा देणे म्हणजेच, हा उघडपणे सत्तेचा दुरुपयोग असून हा दुरुपयोग महाराष्ट्राच्या जनतेला पटणारा नाही. त्यामुळे ठाकरे लवकरच तोंडावर अपटणार असल्याची टीका सुद्धा राणेंनी यावेळी केली.
ह्या पेंग्विनच्या अंगावर एकही पोलिस केस नाही, कोणाची धमकी नाही व ह्याने धमकी कोणाला देण्याची ह्याची लायकी सुधा नाही मग Z सुरक्षा कशाला?? हा उघड सत्तेचा दुरोपयोग आहे आणि हा दुरोपयोग महाराष्ट्राच्या जनतेला पटणारा नाही. ठाकरे लवकरच तोंडावर अपटणार. https://t.co/BoTYxSHgeC
— Nilesh N Rane (@meNeeleshNRane) December 25, 2019
तर महाराष्ट्रात 97 व्हीआयपीना सरकारकडून सुरक्षा पुरविण्यात येते. यापैकी 29 व्हीव्हीआयपीच्या सुरक्षेत बदल करण्यात आले आहेत. यामध्ये अनेक लोकांच्या सुरक्षेत घट करण्यात आली आहे. सचिन तेंडुलकरसह उत्तर प्रदेशचे माजी राज्यपाल राम नाईक, वरिष्ठ वकील उज्ज्वल निकम यांची सुरक्षा कमी करण्यात आली आहे.