सत्तारांनी कॅबिनेटपेक्षा मराठवाड्यातील शेतकरी आत्महत्यांकडे लक्ष द्यावे: निलेश राणे
By ऑनलाइन लोकमत | Published: January 4, 2020 02:47 PM2020-01-04T14:47:27+5:302020-01-04T14:48:13+5:30
ज्या मराठवाड्यातून शिवसेनेचे अब्दुल सत्तार निवडून आले आहेत, त्याच मराठवाड्यात गेल्या महिन्याभरात 120 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत.
मुंबई: राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार झाल्यानंतर महाविकास आघाडीमधील शिवसेना, राष्ट्रावादी काँग्रेस आणि काँग्रेस या घटकपक्षामधील अनेक नेत्यांची नाराजी समोर आली होती. दरम्यान, मंत्रिमंडळात स्थान मिळूनही केवळ राज्यमंत्रिपद मिळाल्याने शिवसेना नेते अब्दुल सत्तार यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे. तर याच मुद्यावरून भाजपचे नेते निलेश राणे यांनी महाविकास आघाडी सरकावर टीका केली आहे.
ज्या मराठवाड्यातून शिवसेनेचे अब्दुल सत्तार निवडून आले आहेत, त्याच मराठवाड्यात गेल्या महिन्याभरात 120 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. असे असताना मात्र अब्दुल सत्तार यांनी कॅबिनेट मंत्रीपद मिळाले नाही म्हणून राजीनामा दिला. तर बंगले, मंत्रीपद आणि सत्ता यात मग्न असलेल्या ठाकरे सरकारने महाराष्ट्राच्या जनतेला वाऱ्यावर सोडले असल्याचा आरोप निलेश राणे यांनी केला आहे.
मराठवाड्यातुन शिवसेनेचे अब्दुल सत्तार निवडून आले त्याच मराठवाड्यातील 120 शेतकऱ्यांनी मागील महिन्यात आत्महत्या केल्या. मात्र अब्दुल सत्तारनी कॅबिनेट मंत्रीपद मिळालं नाही म्हणून राजीनामा दिला. या सरकारने बंगले, मंत्रपद आणि सत्ता यात मग्न राहून महाराष्ट्राच्या जनतेला वाऱ्यावर सोडलय.
— Nilesh N Rane (@meNeeleshNRane) January 4, 2020
तर पसंतीचा बंगला मिळावा यासाठी नेत्यांमध्ये सुरु असलेल्या चढाओढीच्या मुद्यावरून सुद्धा त्यांनी सरकावर टीका केली. 'ह्या नंतर योग्य अधिकारी नाही, आमच्या फाईलवर लवकर सही होत नाही, आमच्यावर अन्याय होतोय, आमच्या नेत्याचा अपमान केला जात आहे'. अशा मुद्यांसाठी पक्षश्रेष्ठींकडे नाराजी व्यक्त करणे शिल्लक राहिले असल्याची टीका त्यांनी केली.