पदवी खरी असेल; पण 'हा' माणूस १०० टक्के बोगस, निलेश राणेंची शिवसेनेच्या मंत्र्यावर टीका
By ऑनलाइन लोकमत | Published: January 6, 2020 01:33 PM2020-01-06T13:33:47+5:302020-01-06T14:44:17+5:30
पुण्यातील आरटीआय कार्यकर्ते अभिषेक हरिदास यांनी शिवसेनेच्या या मंत्र्यांच्या पदवीबद्दलची माहिती मिळवली आहे.
मुंबई - महाविकास आघाडी सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार होऊन खातेवाटप झाल्यानंतर आता या सरकारमधील तंत्रशिक्षण मंत्री असलेले उदय सामंत त्यांच्या पदवीवरून अडचणीत आले आहेत. दरम्यान, भाजपा नेते आणि माजी खासदार निलेश राणे यांनी या पदवीवरून उदय सामंत यांना टोला लगावला आहे. कदाचित पदवी खरी असेल, पण हा माणूस 100 टक्के बोगस आहे असे त्यांनी म्हटले आहे.
उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखालील सरकारमध्ये उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री असलेले रत्नागिरीचे आमदार उदय सामंत यांनी ज्ञानेश्वरी विद्यापीठातून घेतलेली पदवी ही खोटी असल्याचा आरोप झाला आहे. त्यानंतर निलेश राणे यांनी ट्विटकरून सामंत यांच्यावर टीका केली आहे. ''पदवी खरी असेल, पण हा माणूस 100 टक्के बोगस आहे,''असे निलेश राणे यांनी म्हटले आहे.
पदवी खरी असेल पण हा माणूस १०० % बोगस आहे. https://t.co/znK8mmjq3H
— Nilesh N Rane (@meNeeleshNRane) January 5, 2020
पुण्यातील आरटीआय कार्यकर्ते अभिषेक हरिदास यांनी सामंत यांच्या पदवीबद्दलची माहिती मिळवली आहे. त्यानंतर विरोधकांनी सामंत यांना लक्ष्य करण्यास सुरुवात केली आहे. दरम्यान, उदय सामंत यांनी हे सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. माझी आणि माजी शिक्षणमंत्री विनोद तावडे यांची चौकशी करा, असे खुले आव्हान त्यांनी दिले आहे. ‘ज्ञानेश्वर विद्यापीठात शिकलो यात मला कमीपणा वाटत नाही’ असेही त्यांनी स्पष्ट केले आहे.
‘1991 मध्ये मनोहर आपटे यांनी ज्ञानेश्वर विद्यापीठाची स्थापन केली. या संस्थेमध्ये प्रॅक्टिकल ज्ञान दिले जायचे. त्याची पदवी दिली जायची, तशी मी घेतली. उद्योजक होण्यासाठी मी पदवी घेतली होती. त्या पदवीच्या आधारे मी शासकीय नोकरी किंवा घर घेतलेले नाही. त्या पदवीचा वापर करून मी कुठलाही शासकीय लाभ घेतलेला नाही’, असा दावा त्यांनी केला. मी मंत्री झाल्यावर अचानक हे प्रकरण चर्चेत आले. माझ्या पदवीचा वाद उकरून एखाद्याला रात्री गोळ्या न घेता शांतपणे झोप येत असेल, तर चांगलेच आहे,'' असा टोलादेखील त्यांनी लगावला आहे.