संजय राऊत महाराष्ट्रातील मराठा आंदोलकांना कधी भेटले नाहीत; निलेश राणेंची टीका
By देवेश फडके | Published: February 2, 2021 07:09 PM2021-02-02T19:09:08+5:302021-02-02T19:17:32+5:30
भाजप नेते निलेश राणे यांनी जोरदार टीका केली असून, संजय राऊत एक नंबर ढोंगी असल्याचे म्हटले आहे.
मुंबई : गेल्या दोन महिन्यांपासून दिल्लीच्या विविध सीमांवर केंद्रीय कृषी कायद्यांना विरोध करण्यासाठी शेतकरी आंदोलन करीत आहेत. शिवसेना खासदारांच्या एका शिष्टमंडळाने आज (मंगळवारी) दुपारी दिल्लीच्या गाझीपूर सीमेवर जाऊन शेतकऱ्यांची भेट घेतली. यामध्ये शिवसेना खासदार आणि प्रवक्ते संजय राऊत यांचाही सहभाग होता. यानंतर आता राजकीय वर्तुळात आरोप-प्रत्यारोप होऊ लागले आहेत. भाजप नेते निलेश राणे यांनी यासंदर्भात जोरदार टीका केली असून, संजय राऊत एक नंबर ढोंगी असल्याचे म्हटले आहे.
निलेश राणे यांनी एक ट्विट करत संजय राऊत यांच्यावर निशाणा साधला आहे. निलेश राणेंनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, संजय राऊत जितक्या झटपट दिल्लीतील आंदोलनाच्या ठिकाणी फोटो काढायला गेले तसे कधी मराठा आंदोलकांना भेटले नाहीत. महाराष्ट्रामध्ये कुठल्याही आंदोलनाला संजय राऊत कधी गेले नाहीत. महाराष्ट्रातील आंदोलक नको फक्त महाराष्ट्र हे नाव राजकारण करण्यासाठी पाहिजे. संजय राऊत एक नंबर ढोंगी आहेत, अशा शब्दांत निलेश राणे यांनी सडकून टीका केली आहे.
संज्या राऊत जितका झटपट दिल्ली येथील आंदोलनाच्या ठिकाणी फोटो काढायला गेला तसाच कधी मराठा आंदोलकांना भेटला नाही. महाराष्ट्रामध्ये कुठल्याही आंदोलनाला संज्या कधी गेला नाही, महाराष्ट्रातले आंदोलनकारी नको फक्त महाराष्ट्र हे नाव पाहिजे राजकारण करायला... एक नंबर ढोंगी
— Nilesh N Rane (@meNeeleshNRane) February 2, 2021
शिवसेनेचे शिष्टमंडळ शेतकऱ्यांच्या भेटीला
शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या नेतृत्त्वाखाली शिवसेनेच्या शिष्टमंडळाने आंदोलक शेतकऱ्यांची भेट घेतली. शिवसेना नेत्यांनी गाझीपूर सीमेवरून जाऊन शेतकरी नेते राकेश टिकैत यांच्याशी चर्चा केली. शेतकऱ्यांच्या आंदोलनाला शिवसेनेचा पाठिंबा असल्याचे राऊत यांनी टिकेत यांना यावेळी बोलताना सांगितले.
शिवसेना नेते दिल्लीच्या सीमेवर पोहोचले; शेतकरी नेते टिकैत भेटीबद्दल स्पष्टच बोलले
काय म्हणाले संजय राऊत?
शिवसेनेचे पक्षप्रमुख आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज सकाळी आम्हा सर्व खासदारांना आदेश दिला. आम्ही राकेश टिकैत यांच्याशी चर्चा केली आहे. आमचे शिवसेनेचे सर्व खासदार या ठिकाणी आले. त्यांना जो संदेश द्यायचा होता, तो आम्ही दिला आहे. आम्ही पूर्ण ताकदीनीशी शेतकऱ्यांसोबत उभे आहोत. सरकारने त्यांच्याशी योग्यरित्या चर्चा केली पाहिजे. हा कोणत्याही राज्याचा विषय नाही. हा देशातील शेतकऱ्यांचा विषय आहे. चर्चेत कोणतेही राजकारण येऊ देऊ नये, असे संजय राऊत म्हणाले.
सरकार अन्याय, दहशत करतेय
ज्याप्रकारे सरकारकडून अन्याय, दहशत केली जात आहे, शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे राहणे, पाठबळ देणे आपले कर्तव्य आहे. उद्धव ठाकरे यांचा निरोप, संवेदना घेऊन आपण येथे पोहोचलो आहेत. देशातील प्रत्येक राजकीय पक्षाने येथे येऊन आपल्या भावना व्यक्त करण कर्तव्य आहे. राकेश टिकैत आणि आम्ही आधी दूरध्वनीवरून बोललो होतो. पण प्रत्यक्षात मैदानात येऊन पाठिंबा देणे हे महत्वाचे आहे. यामुळे प्रत्यक्ष रणभूमीवर येऊन पाठिंबा जाहीर केला, असे संजय राऊत यांनी सांगितले.