महाराष्ट्र निवडणूक 2019: 'मातोश्री' आता सोनिया गांधीच्या निवासस्थानी शिफ्ट: निलेश राणे
By ऑनलाइन लोकमत | Published: November 14, 2019 11:37 AM2019-11-14T11:37:26+5:302019-11-14T11:46:20+5:30
Maharashtra Vidhan Sabha Election 2019 : परत येताना भगवे फेटे नाही तर गांधी टोपी घालून यायचे असा टोला निलेश राणेंनी शिवसेनेला लगावला.
मुंबई : गेल्या पाच दिवसांपासून मुंबईच्या हॉटेल रिट्रीटमध्ये ठेवण्यात आलेल्या शिवसेनेच्या आमदारांना अखेर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंकडून त्यांच्या त्यांच्या मतदारसंघात जाण्यास सांगण्यात आले आहे. मतदारसंघात जाऊन मतदारांच्या संपर्कात राहा, असा आदेश या आमदारांना देण्यात आला. तर याच मुद्यावरून निलेश राणेंनी शिवसेनेवर निशाणा साधला आहे. काँग्रेस बोलवेल तेव्हा गुपचूप परत यायचं. कारण मातोश्री आता १० जनपथ दिल्लीला शिफ्ट झाली असल्याचा त्यांनी सेनेला टोला लगावला आहे.
राज्यात सत्तास्थापनेवरून राजकीय हालचालींना वेग आला आहे. त्यामुळे आमदार फुटू नये या भीतीने शिवसेनेने गेल्या पाच दिवसांपासून आपल्या आमदारांना हॉटेल रिट्रीटमध्ये ठेवलं होतं. मात्र आता त्यांना आपल्या मतदारसंघात जाण्याचे आदेश पक्षाकडून देण्यात आले आहेत. शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे यांनी या आमदारांना हॉटेलमध्ये भेटून ही माहिती दिली आहे.
त्यांनतर निलेश राणेंनी या मुद्यावरून शिवसेनेला खोचक टोला लगावला आहे. शिवसेना आमदारांनी हॉटेल रिट्रीटमध्ये ५ दिवस राहून मोठं राष्ट्रीय कर्तव्य पार पाडलं.मात्र काँग्रेस बोलवेल तेव्हा गुपचूप परत यायचं. कारण मातोश्री आता १० जनपथ दिल्लीला शिफ्ट झाली असून परत येताना भगवे फेटे नाही तर गांधी टोपी घालून यायचे असा टोला निलेश राणेंनी शिवसेनेला लगावला.
वाह!! फार मोठं राष्ट्रीय कर्तव्य पार पाडलं... काँग्रेस बोलवेल तेव्हा गप चूप परत यायचं. मातोश्री आता १० जनपत दिल्लीला शिफ्ट झाली आहे म्हणून परत जर बोलवलं तर भगवे फेटे नाही तर गांधी टोपी घालून या. https://t.co/JcHXnjDcVW
— Nilesh N Rane (@meNeeleshNRane) November 14, 2019
मुंबईच्या हॉटेल रिट्रीटमध्ये ठेवण्यात आलेल्या शिवसेनेच्या आमदारांना मतदारसंघात परतण्याचे आदेश दिले गेले आहेत. तर दुसरीकडे काँग्रेसने सुद्धा जयपूरमध्ये ठवलेले सर्व ४४ आमदार आज मुंबईत परतले आहेत. त्यामुळे त्यांना सुद्धा मतदारसंघात परतण्याचे आदेश मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.