मारहाणप्रकरणी निलेश राणेंवर गुन्हा

By admin | Published: April 27, 2016 06:41 AM2016-04-27T06:41:16+5:302016-04-27T06:41:16+5:30

बेदम मारहाण केल्याप्रकरणी मंगळवारी पहाटे माजी खासदार निलेश राणे यांच्यासह पाचजणांविरुद्ध ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

Nilesh Ranever crime in the murder case | मारहाणप्रकरणी निलेश राणेंवर गुन्हा

मारहाणप्रकरणी निलेश राणेंवर गुन्हा

Next

ठाणे / चिपळूण : रत्नागिरीतील मराठा आरक्षण मेळाव्यास अनुपस्थित राहिल्याबद्दल चिपळूण तालुका काँग्रेस अध्यक्ष संदीप शिवराम सावंत यांचे अपहरण करून त्यांना बेदम मारहाण केल्याप्रकरणी मंगळवारी पहाटे माजी खासदार निलेश राणे यांच्यासह पाचजणांविरुद्ध ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. सावंत यांच्यावर ठाणे सिव्हील रुग्णालयात उपचार सुरू असून हे प्रकरण तात्काळ चिपळूण पोलीस ठाण्यात वर्ग केल्याची माहिती पोलिसांनी दिली.
रविवारी २४ एप्रिल रोजी रत्नागिरीत काँग्रेसच्यावतीने मराठा आरक्षण मेळावा आयोजित करण्यात आला होता. त्याला तालुका अध्यक्ष व माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांचे समर्थक संदीप सावंत जाऊ शकले नव्हते. याच गोष्टीचा राग मनात धरून २४ एप्रिल रोजी रात्री माजी खासदार निलेश राणे आणि तुषार, मनीष, अण्णा आणि कुलदीप खानविलकर हे कार्यक्रम संपल्यानंतर सावंत यांच्या घरी आले. त्यांना खाली बोलवून जबरदस्तीने गाडीत बसवून घेऊन गेले. २५ एप्रिलला त्यांना मुंबई, जोगेश्वरी येथे सोडून देण्यात आले. त्यानंतर सावंत यांनी त्यांचे मावस भाऊ विनायक सुर्वे यांना फोन करून बोलवून घेतले. त्यांनी त्याला सोमवारी रात्री ठाण्यात आणून सिव्हील रुग्णालयात उपचारार्थ दाखल केले. सावंत यांच्या डोक्याला जबर मार लागला असून अंग काळेनिळे झाले आहे, असे सिव्हील रुग्णालयातील डॉक्टरांनी सांगितले. आपल्याला हॉकी स्टीक आणि लाथाबुक्क्यांनी मारहाण करण्यात आल्याची तक्रार जखमी सावंत यांनी ठाणे शहर पोलिसांकडे केली असून अपहरण आणि मारहाणीचा गुन्हा दाखल झाला.
आई आजारी असल्याने संदीप हे कार्यक्रमास गेले नाहीत, असे त्यांच्या पत्नी शिवानी यांनी सांगितले. त्याच रात्री निलेश राणे घरी आले आणि त्यांना नेहमीप्रमाणे घेऊन गेले. म्हणून त्या गोष्टीकडे सावंत कुटुंबीयांनी दुर्लक्ष केले. पंरतु सकाळ झाली तरी संदीप घरी न आल्याने आम्ही काळजीत होतो. त्यांचा मोबाईल घरीच राहिल्याने आमदार नितेश राणे यांना सोमवारी सकाळी ६ वाजता फोन केला. त्यानंतर नारायण राणे यांच्या पत्नी निलमताईंना फोन करून घडलेला प्रकार सांगितला. त्यावर निलमताईंनी तुझा नवरा सुखरूप घरी येईल, त्याला काही होणार नाही, असे आश्वासन दिल्याचे शिवानी म्हणाल्या. हा प्रकार गैरसमजूतीतून झाला असल्याचेही त्या म्हणाल्या. (लोकमत न्यूज नेटवर्क)
>मंगळवारी पहाटे अपहरण आणि मारहाणीप्रकरणी गुन्हा दाखल झाला. तो गुन्हा चिपळूण पोलिसांकडे वर्ग केला. याबाबतची कागदपत्रे तातडीने रवाना करण्यात आली.
- एम.व्ही.धर्माधिकारी, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, ठाणेनगर
>संदीप सावंत याने आपल्याकडे घर बांधण्यासाठी दहा लाख रुपयांची मागणी केली होती. ते त्याला मिळाले नाहीत म्हणून विरोधकांच्या साथीने हा घाणेरडा डाव रचण्यात आला आहे. -निलेश राणे, माजी खासदार

Web Title: Nilesh Ranever crime in the murder case

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.