आयुक्त निंबाळकर यांची जातीवाचक टिप्पणी?
By admin | Published: July 7, 2017 04:13 AM2017-07-07T04:13:01+5:302017-07-07T04:13:01+5:30
महापालिकेतील रिपब्लिकन पार्टी आॅफ इंडियाच्या नेत्यांना दिलेली दालने सील केल्याने याबाबतचा जाब विचारण्यासाठी गेलेले
लोकमत न्यूज नेटवर्क
उल्हासनगर : महापालिकेतील रिपब्लिकन पार्टी आॅफ इंडियाच्या नेत्यांना दिलेली दालने सील केल्याने याबाबतचा जाब विचारण्यासाठी गेलेले रिपाइंचे गटनेते व शहरजिल्हाध्यक्ष भगवान भालेराव आणि महापालिका आयुक्त राजेंद्र निंबाळकर यांच्यात गुरुवारी कडाक्याचे भांडण झाले. संतापाच्या भरात निंबाळकर यांनी हीन दर्जाची जातीवाचक टिप्पणी केल्याने त्यांचा सर्व स्तरातून तीव्र निषेध करण्यात येत आहे. आपली चूक झाल्याचे लक्षात आल्यावर निंबाळकर यांनी दिलगिरी व्यक्त केली असली तरी जातीवाचक वक्तव्यामुळे ते चांगलेच अडचणीत आले आहेत.
उल्हासनगर महापालिकेत प्रथेनुसार प्रत्येक पक्षाच्या गटनेत्याला कार्यालय दिले जाते. रिपाइं (आठवले गट), भारिप, पीआरपी यांच्यासह काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसच्या गटनेत्यांना दालने व सोयीसुविधा पालिकेने पुरवल्या होत्या. मात्र अचानक या पाचही पक्षांची दालने सोमवारी सील करण्यात आली. याप्रकाराने पाचही पक्षांचे नगरसेवक संतप्त झाले. कायद्यानुसार एकूण सदस्य संख्येच्या १० टक्के नगरसेवक निवडून आलेल्या पक्षाच्या गटनेत्यांना दालने उपलब्ध करुन देणे महापालिकेवर बंधनकारक आहे. या पाच पक्षांनी अवैधपणे दालने बळकावल्याने ही कारवाई केल्याचे आयुक्तांचे म्हणणे आहे. गटनेत्यांना दालने देण्यापूर्वी हा नियम आयुक्तांच्या ध्यानात आला नाही का, असा सवाल पीआरपीचे प्रमोद टाले यांनी आयुक्तांना केला.
आयुक्त दोन दिवसांच्या सुट्टीनंतर गुरुवारी पालिकेत उपस्थित असल्याने दुपारी रिपाइंचे भगवान भालेराव त्यांच्याकडे गेले व त्यांनी निंबाळकर यांना दालन सील करण्याबाबत जाब विचारला. शब्दाला शब्द वाढत गेला आणि दोघांत तू तू मै मै झाले. रागाच्या भरात आयुक्तांनी जातीवाचक टिप्पणी केली. यावेळी उपायुक्त संतोष दहेरकर, आयुक्तांचे स्वीय सहाय्यक प्रकाश तरे हेही उपस्थित होते. याचवेळी शिवसेनेचे शहरप्रमुख व नगरसेवक राजेंद्र चौधरी तेथे आले. आपण जातीवाचक टिप्पणी करुन मोठी चूक केल्याचे आयुक्तांच्या लक्षात येताच त्यांनी सर्वांसमक्ष दिलगिरी व्यक्त केली. भालेराव यांनी आयुक्तांचे जातीवाचक उदगार बाहेर येऊन जाहीर करताच सर्वत्र संतप्त प्रतिक्रिया व्यक्त झाल्या.रिपाइंचे भालेराव यांच्यासह असंख्य कार्यकर्ते आयुक्तांना जाब विचारण्यासाठी गेले. त्यावेळी त्यांनी दिलगिरी व्यक्त केली. आयुक्तांच्या दिलगिरीने आंबेडकरी जनतेचे समाधान झाले नाही.
रिपाइंचा निर्णय आज
आयुक्तांनी जातीवाचक टिप्पणी केल्याबाबत भालेराव यांनी पक्षाचे अध्यक्ष व केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्याकडे तक्रार केली. त्यांच्या सूचनेवरुन नेते व कार्यकर्त्यांची बैठक उद्या (शुक्रवारी) आयोजित केल्याची माहिती भालेराव यांनी दिली. आयुक्तां विरोधात आंदोलन करण्याचा निर्णय बैठकीत घेतला जाणार आहे.