निंबाळकर, गोरे, शहाजीबापू विमानाने नागपूरला; उत्तम जानकर यांची नाराजी दूर होणार
By दीपक शिंदे | Published: April 15, 2024 09:59 PM2024-04-15T21:59:56+5:302024-04-15T22:00:23+5:30
भाजपचे सोलापूर जिल्हा संघटक धैर्यशील मोहिते-पाटील यांनी तुतारी हाती घेतली. आता तेच रणजितसिंह यांच्यापुढे राष्ट्रवादीचे उमेदवार म्हणून उभे ठाकले आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
सातारा : माढा लोकसभेसाठी मोहिते-पाटील आणि उत्तम जानकर एकत्र येण्याची शक्यता वाढली असतानाच खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर, आमदार जयकुमार गोरे, शहाजीबापू पाटील यांनी विमानाने नागपूर गाठले. सोबत जानकर हेही होते. उपमुख्यमंत्री फडणवीस यांची भेट झाल्यानंतर जानकर यांनी सकारात्मक चर्चा झाल्याचे सांगत कार्यकर्त्यांना विचारून निर्णय घेण्याचे जाहीर केले. त्यामुळे भाजपला दिलासा मिळण्याची चिन्हे आहेत.
भाजपचे सोलापूर जिल्हा संघटक धैर्यशील मोहिते-पाटील यांनी तुतारी हाती घेतली. आता तेच रणजितसिंह यांच्यापुढे राष्ट्रवादीचे उमेदवार म्हणून उभे ठाकले आहेत. यामुळे भाजपाची डोकेदुखी वाढली आहे. असे असतानाच माळशिरसमधील उत्तम जानकर हेही वेगळ्या भूमिकेत होते.
माळशिरस तालुक्याच्या राजकारणात मोहिते-पाटील आणि उत्तम जानकर हे राजकीय विरोधक. पण, आताच्या लोकसभा निवडणुकीनिमित्ताने दोघेही एकत्र येण्याची शक्यता बळावली होती. जानकर यांनीही ही बाब पूर्णपणे फेटाळलेली नव्हती. त्यामुळे ही राजकीय समीकरणे जुळली तर भाजप उमेदवार रणजितसिंह यांच्यापुढे अडचणीच वाढणार होत्या. कारण, जानकर यांच्या पाठीमागे एकगठ्ठा मतदान आहे. ही ताकद धैर्यशील मोहिते यांच्या पाठीशी उभी राहिली तर खासदारांसाठी धोक्याची घंटा ठरू शकते. याचा विचार करूनच जानकर यांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न झाला. यासाठी खासदार रणजितसिंह, आमदार जयकुमार गोरे, शहाजीबापू पाटील हे जानकर यांच्याबरोबर विमानाने नागपूरला गेले. तेथे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेण्यात आली. या भेटीत उत्तम जानकर यांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न झाल्याची माहिती मिळत आहे.
माळशिरस तालुक्यातील काही अडचणी होत्या. १० वर्षांतील प्रश्न होते. हे सर्व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमोर मांडण्यात आलेले आहेत. या भेटीत आमची अतिशय सकारात्मक चर्चा झालेली आहे. आता कार्यकर्त्यांबरोबर बैठक घेऊन पुढील निर्णय घेणार आहे, अशी प्रतिक्रिया उत्तम जानकर यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना दिली.
वेळापूरला रात्री बैठक...
माळशिरस तालुक्यातील वेळापूर येथे सोमवारी रात्री उत्तम जानकर यांनी कार्यकर्त्यांची बैठक बोलावली होती. या बैठकीत काय निर्णय होतो यावर माढा लोकसभेचे राजकीय गणित अवलंबून असणार आहे.