भीषण आगीत नऊ गोठे खाक
By admin | Published: January 2, 2016 08:36 AM2016-01-02T08:36:28+5:302016-01-02T08:36:28+5:30
४७८ कोंबड्या, २५ जनावरे मृत्यूमुखी
बुलडाणा : तालुक्यातील पाडळी शिवारात लागलेल्या भीषण आगीत नऊ गोठे जळून खाक होऊन १९ लाखांचे नुकसान झाल्याची घटना ३१ डिसेंबर रोजी रात्री १.३0 वाजता घडली. आगीत शेती साहित्य खाक झाले असून, अनेक जनावरे मृत्युमुखी पडली आहेत. बुलडाणा तालुक्यातील पाडळी शिवारातील गावठाणला लागून असलेल्या परिसरात शेतकर्यांचे गोठे मोठय़ा प्रमाणात आहेत. हे गोठे टीनपत्रे वापरून तयार केले असून, त्यात विद्युत मोटरपंप, स्प्रींकलर, पाइप, लाकडे, शेती उपयोगी अवजारे, स्प्रे पंप इत्यादी शेतीपयोगी साहित्य, विविध प्रकारचे धान्य, तसेच म्हशी, गाई, बैल बांधले होते. ३१ डिसेंबर रोजी रात्री १.३0 वाजता या गोठय़ांना अचानक आग लागली. या आगीमुळे नऊ गोठे खाक झाले. आगीचे लोळ वाढत असल्याचे लक्षात येताच ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली. अग्निशामक दलाने तातडीने घटनास्थळी पोहोचून आग आटोक्यात आणली; मात्र तोपर्यंत नऊ गोठे खाक होऊन त्यात शेती उपयोगी साहित्य, ६५ पोते सोयाबीन, ३१ पोते हरभरे खाक झाले, तर ४७८ कोंबड्या व लहान-मोठे जवळपास २५ जनावरे मृत्यूमुखी पडले.