विषारी वायुगळतीने नऊ विद्यार्थिनी बेशुद्ध
By admin | Published: December 12, 2014 12:32 AM2014-12-12T00:32:56+5:302014-12-12T00:32:56+5:30
मोहाडी तालुक्यातील करडी (पालोरा) येथील एलोरा पेपर मिल बघण्यासाठी गेलेल्या राष्ट्रीय सेवा योजनेच्या नऊ विद्यार्थिनी क्लोरिन वायु गळतीने बेशुद्ध पडल्या आहेत. ही घटना आज गुरूवारला दुपारच्या
तुमसरात उपचार : एलोरा पेपर मिल येथील घटना
तुमसर : मोहाडी तालुक्यातील करडी (पालोरा) येथील एलोरा पेपर मिल बघण्यासाठी गेलेल्या राष्ट्रीय सेवा योजनेच्या नऊ विद्यार्थिनी क्लोरिन वायु गळतीने बेशुद्ध पडल्या आहेत. ही घटना आज गुरूवारला दुपारच्या सुमारास घडली. त्यांच्यावर तुमसर येथील रुग्णालयात उपचार सुरू आहे.
मोहाडी तालुक्यातील करडी येथील कला, वाणिज्य महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजनेचे शिबिर देव्हाडी येथे सुरू आहे. शिबिरादरम्यान विद्यार्थीनींना करडी येथील ऐलोरा पेपर मिल येथे भेट व कागदनिर्मितीची प्रक्रिया जाणून घेण्यासाठी प्राध्यापकांनी मिल प्रशासनाच्या परवानगीने आज दुपारी नेले होते. यावेळी महाविद्यालयीन विद्यार्थीनी कागद निर्मिती प्रक्रियेची माहिती जाणून घेत होत्या.
विद्यार्थीनी कारखान्यात असल्याने तेथील सर्व मशिन बंद करण्यात आल्या होत्या. मात्र अचानक त्या सुरू झाल्यामुळे क्लोरिन वायुची गळती सुरू झाली. यामुळे महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचा जीव गुदमरू लागला अशात त्यांच्या नाक व डोळ्यातून अश्रू वाहून त्यांना चक्कर येवून नऊ विद्यार्थीनी जमिनीवर कोसळल्या. यात रोहिनी मेश्राम, उषा हलमारे, निशिगंधा धोटे, ज्योति भोयर, शिला गोबाडे, आशा गिजेवार, शिला माटे, पुष्पा राईगीलवार व मोनिका श्यामकुंवर यांचा समावेश आहे. या तरुणी १८ ते २१ वयोगटातील आहेत.
वायू गळती मोठ्या प्रमाणात झाल्याने विद्यार्थीनीमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले. यामुळे त्या सैरावैरा पळू लागल्या. बेशुद्ध झालेल्या विद्यार्थीनींना पेपर मिल प्रशासनाने रुग्णवाहिके द्वारे तुमसर येथील सुभाषचंद्र बोस उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. त्यांच्यावर उपचार सुरू असून वृत्त लिहिपर्यंत नऊही विद्यार्थीनी बेशुद्ध अवस्थेत होत्या.
याप्रकरणी तुमसर पोलिसांनी विद्यार्थीनींचे बयाण नोंदविले आहे. यातील काही विद्यार्थीनींची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना भंडारा किंवा नागपूर येथे उपचारार्थ हलविण्यात येणार असल्याचे वैद्यकीय सुत्रांनी सांगितले. (प्रतिनिधी)