..अन झाले ‘कालिदास’चे नामकरण!

By admin | Published: July 5, 2016 12:49 PM2016-07-05T12:49:42+5:302016-07-05T13:06:39+5:30

‘मेघदूत’सारखे अजरामर महाकाव्य लिहिणाऱ्या महाकवी कालिदासांच्या स्मृतींना आषाढाच्या पहिल्या दिवशी सर्वत्र उजाळा दिला जात असला, तरी नाशिकमध्ये मात्र खास महापालिकेच्या वतीने कालिदास दिन साजरा केला जातो

Nine names like 'Kalidas'! | ..अन झाले ‘कालिदास’चे नामकरण!

..अन झाले ‘कालिदास’चे नामकरण!

Next
>सुदीप गुजराथी
ऑनलाइन लोकमत, नाशिक : 
‘मेघदूत’सारखे अजरामर महाकाव्य लिहिणाऱ्या महाकवी कालिदासांच्या स्मृतींना आषाढाच्या पहिल्या दिवशी सर्वत्र उजाळा दिला जात असला, तरी नाशिकमध्ये मात्र खास महापालिकेच्या वतीने कालिदास दिन साजरा केला जातो. त्याला कारणीभूत आहे ती महाकवी कालिदास कलामंदिर ही वास्तू... कविश्रेष्ठ कुसुमाग्रजांनी या वास्तूला स्वत:चे नाव देणे नाकारून कालिदासांच्या स्मृती जपल्याने नाशिकमध्ये दरवर्षी हा योग जुळून येतो. 
नाशिकमध्ये शालिमार परिसरात महापालिकेच्या वतीने महाकवी कालिदास कलामंदिर ही वास्तू उभारण्यात आली. तत्पूर्वी, सन १९५५-५६ मध्ये याच ठिकाणी तत्कालीन नगरपालिकेच्या वतीने खुले नाट्यगृह बांधण्यात आले. ते काही वर्षे व्यवस्थित चालल्यानंतर पुढे त्याची रया गेली व बंद पडले. डॉ. वसंतराव गुप्ते यांच्यासह काही लोकप्रतिनिधी व रंगकर्मींनी या जागेवर नाट्यगृह उभारण्याचा प्रस्ताव मांडला; मात्र सन १९८२ मध्ये महापालिका अस्तित्वात आल्यानंतर या कामाला गती आली. या वास्तूचे भूमिपूजन महापालिकेचे प्रथम प्रशासक सुधाकर जोशी यांच्या हस्ते झाले, तर रत्नाकर कुलकर्णी यांच्या कारकीर्दीत ते बांधून पूर्ण झाले. त्याच्या बांधकामासाठी १७५ लाख रुपये खर्च आला. गुढीपाडव्याला दि. ३० मार्च १९८७ रोजी तत्कालीन मुख्यमंत्री शंकरराव चव्हाण, ज्येष्ठ रंगकर्मी विजया मेहता यांच्या प्रमुख उपस्थितीत या नाट्यमंदिराचे उद्घाटन झाले. 
दरम्यान, या वास्तूच्या देखरेखीसाठी एक समिती नियुक्त करण्यात आली होती. त्यात कुसुमाग्रज, वसंत कानेटकर, शंकरराव अंधृटकर, हेमंत टकले आदिंचा समावेश होता. तर मधुकर झेंडे हे कलामंदिराचे प्रथम व्यवस्थापक होते. या वास्तूला कोणाचे नाव द्यावे, याविषयी विचारविनिमय सुरू झाला व कुसुमाग्रजांच्या नावावर शिक्कामोर्तबही झाले. कुसुमाग्रजांसारखा प्रतिभावंत कवी व साहित्यिक शहरात असताना, अन्य दुसºया कोणाच्या नावाचा विचारही करण्याची गरज नव्हती; मात्र हा प्रस्ताव ऐकल्यावर तात्यासाहेबांनी तो मोठ्या खुबीने नाकारला. ‘आपण हयात असताना एखाद्या वास्तूला आपले नाव देणे योग्य वाटत नाही. पुढे कोणी कोठे ना कोठे आपले नाव देईलच’, असा पवित्रा त्यांनी घेतला. त्यावर अन्य मान्यवरांनी आपले नाही, तर किमान आपल्या नाटकाचे- ‘नटसम्राट’चे नाव देण्याला तरी मान्यता द्यावी, अशी विनंती केली; मात्र तात्यासाहेबांनी त्यालाही नकार देत महाकवी कालिदासांचे नाव देण्याचा पर्याय सुचवला. त्यामुळे त्यांच्या नावासाठी आग्रही असलेल्या अनेकांचा हिरमोड झाला. कालिदासांसारख्या महान कवीचे नाव देशात अन्यत्र कोठेही दिले जाईल; पण कुसुमाग्रजांचे नाव नाशिकशिवाय अन्य कोठे दिले जाणार, असा प्रश्नही उपस्थित करण्यात आला; मात्र कुसुमाग्रजांनी त्याला बगल देत अत्यंत विनम्रतेने आपल्या नावाच्या प्रस्तावाला नकार कायम ठेवला व अखेर या वास्तूचे ‘महाकवी कालिदास कलामंदिर’ असे नामकरण करण्यात आले.  
दरम्यान, कालिदासांच्या नावाचे कोंदण लाभल्याने आजही दरवर्षी आषाढाच्या पहिल्या दिवशी कालिदास दिनानिमित्त महापालिकेच्या वतीने खास कार्यक्रम आयोजित केला जातो व त्यातून कालिदासांच्या स्मृतीला उजाळा मिळतो. नाट्य परिषद व अन्य संस्थांच्या वतीने नाट्यप्रयोग, काव्यवाचन, नृत्य आदि कार्यक्रम सादर केले जातात. याशिवाय शहरात अन्य संस्थांच्या वतीनेही कालिदास दिनानिमित्त गायन-वादनासह विविध उपक्रम आयोजित केले जातात.  यानिमित्त कवी कालिदासांचे स्मरण होते. अन्य शहरांत हा दिवस केवळ शाळा-महाविद्यालयांपुरताच मर्यादित राहतो. नाशकात मात्र तात्यासाहेबांच्या दूरदृष्टीमुळे महाकवी कालिदास हे येथील सांस्कृतिक क्षेत्रात स्थान कायम ठेवून आहेत.
 
‘ते’ शिल्प पडद्याआड
महाकवी कालिदास लिखित ‘शाकुंतल’ नाटकातील दुष्यंत-शकुंतला या पात्रांचे शिल्प महाकवी कालिदास कलामंदिराच्या समोर असलेल्या विस्तीर्ण पिंपळाच्या झाडाखाली साकारण्यात आले होते. प्रख्यात शिल्पकार मदन गर्गे यांनी ते तयार केले होते; मात्र तीन ते साडेतीन वर्षांपूर्वी हे पिंपळाचे झाड कोसळल्याने त्याखालचे शिल्पही उद्ध्वस्त झाले. त्याची पुनर्उभारणी केली जाणार होती; मात्र त्याला अद्याप मुहूर्त लागू शकलेला नाही.

Web Title: Nine names like 'Kalidas'!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.