नववी, अकरावीची पुनर्परीक्षा
By admin | Published: June 10, 2016 01:06 AM2016-06-10T01:06:35+5:302016-06-10T01:06:35+5:30
शाळेतील विद्यार्थ्यांकडे शाळेतील शिक्षकांनी केलेल्या दुर्लक्षामुळे तब्बल ५५ विद्यार्थी अकरावीमध्ये अनुत्तीर्ण झाल्याचे समोर आले आहे.
पुणे : येरवडा येथील नेताजी सुभाषचंद्र बोस शाळेतील विद्यार्थ्यांकडे शाळेतील शिक्षकांनी केलेल्या दुर्लक्षामुळे तब्बल ५५ विद्यार्थी अकरावीमध्ये अनुत्तीर्ण झाल्याचे समोर आले आहे. मात्र, शिक्षण विभागाने या विद्यार्थ्यांची पुनर्परीक्षा घेऊन त्यातून उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांना पुढच्या वर्गात पाठविण्याचा निर्णय घेतला आहे. पुढील काळात राज्यातील सर्व विद्यार्थ्यांसाठी हा निर्णय लागू होण्याची शक्यता सूत्रांकडून व्यक्त केली जात आहे.
दहावी - बारावीत नापास होणाऱ्या विद्यार्थ्यांची निकालानंतर एक महिन्यानंतर पुनर्परीक्षा घेतली जात आहे. त्याच पार्श्वभूमीवर नववी व अकरावीत नापास होणाऱ्या विद्यार्थ्यांची पुनर्परीक्षा घेण्याचा विचार शासनस्तरावर सुरू झाला आहे. शिक्षण विभागातर्फे लवकरच याबाबत अध्यादेश काढला जाण्याची शक्यता शिक्षण विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून व्यक्त होत आहे. काही कारणास्तव विद्यार्थी एखाद्या पेपरला गैरहजर राहिल्यास किंवा प्रकल्प, तोंडी परीक्षांचे गुण देण्याचे राहिल्यास संबंधित विद्यार्थ्यांची परीक्षा घेवून त्यांना उत्तीर्ण करण्याचे आदेश शिक्षण अधिकाऱ्यांकडून शाळांना दिले आहेत. त्याचप्रमाणे काही शाळाही स्वत:हून अशा विद्यार्थ्यांच्या परीक्षा घेत आहेत. विद्यार्थी हितासाठी काही निर्णय घेतले जातात. मात्र, नववी व अकरावीमध्ये नापास होणाऱ्या सरसकट सर्व विद्यार्थ्यांची पुनर्परीक्षा घेणे कायद्यात बसते का, असा सवाल उपस्थित केला जात आहे.
काही कारणास्तव परीक्षा न देऊ शकणाऱ्या विद्यार्थ्यांची पुनर्परीक्षा घेता येते. मात्र, नेताजी शाळेतील अकरावीमधील ५५ नापास झालेल्या सर्व विद्यार्थ्यांची परीक्षा घेण्यात आली आहे. शिक्षकांनी या विद्यार्थ्यांची तोंडी परीक्षा न घेता त्यांना शून्य गुण दिले होते. त्यामुळे अनेक विद्यार्थी नापास झाल्याचे बोलले जात आहे.
मात्र, काही विद्यार्थी सर्व परीक्षा देवून ही नापास झाले आहेत. तरीही त्यांची परीक्षा घेतली जात आहे. यावर नेताजी शाळेच्या मुख्याध्यापिका सुरेखा शिवशरण म्हणाल्या, ‘‘शिक्षण विभागाने दिलेल्या सूचनेनुसार नापास झालेल्या सर्व विद्यार्थ्यांची परीक्षा घेतली जात आहे. पालिकेच्या माध्यमिक शिक्षण विभागाकडून परीक्षा घेण्याची परवानगी प्राप्त झाली आहे.’’
नेताजी शाळेतील अनेक विद्यार्थी नापास झाल्याच्या तक्रारी समोर आल्या होत्या. त्यावर पालिकेच्या उपायुक्तांकडून संबंधित विद्यार्थ्यांची पुनर्परीक्षा घेण्याबाबत शिक्षण विभागाने परवानगी घेतली आहे. त्यानुसार शाळेत विद्यार्थ्यांची परीक्षा घेतली जात आहे. दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांची पुनर्परीक्षा घेतली जात असेल तर अकरावीच्या नापास विद्यार्थ्यांची का घेवू नये.
- शिवाजी दौंडकर, माध्यमिक शिक्षणप्रमुख, पुणे महानगरपालिका