नववी, अकरावीच्या विद्यार्थ्यांची पुनर्परीक्षा घ्या
By admin | Published: April 16, 2016 02:51 AM2016-04-16T02:51:59+5:302016-04-16T02:51:59+5:30
राज्यातील पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांप्रमाणे नववी आणि अकरावीच्या विद्यार्थ्यांना कौशल्य विकासचा शेरा देऊन पुनर्परीक्षा घेण्याची मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस शिक्षक
मुंबई : राज्यातील पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांप्रमाणे नववी आणि अकरावीच्या विद्यार्थ्यांना कौशल्य विकासचा शेरा देऊन पुनर्परीक्षा घेण्याची मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस शिक्षक सेलचे प्रदेश उपाध्यक्ष महादेव सुळे यांनी शालेय शिक्षण मंत्री विनोद तावडे यांकडे केली आहे. इयत्ता दहावीच्या गुणपत्रिकेवर नापास ऐवजी कौशल्य विकसित असा शेरा करण्याची घोषणा तावडे यांनी केली आहे. त्या पार्श्वभूमीवर मोठ्या प्रमाणात शिक्षण प्रवाहातून बाहेर पडणाऱ्या नववी आणि अकरावीच्या विद्यार्थ्यांसाठी हा प्रयोग करण्याची मागणी सुळे यांनी केली आहे.
राज्यातील शाळा व कनिष्ठ महाविद्यालयातील वार्षिक परीक्षा अंतिम टप्प्यात आहेत. दहावी व बारावीचा निकाल जास्त लागावा म्हणून काही शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालयांत अभ्यासात कमकुवत असलेल्या नववी व अकरावी मधील विद्यार्थ्यांना नापास केले जाते. त्यामुळे नापास झालेली मुले दहावी आणि बारावीसाठी बाहेरून अर्ज करतात. मात्र त्यांतील बहुतांश विद्यार्थी पुन्हा नापास झाल्यावर शिक्षण प्रवाहातून बाहेर पडतात. जर पहिली ते आठवी व दहावीतील विद्यार्थी यांच्या गुणपत्रिकेवरील नापासाचा शेरा हद्दपार झाला आहे, तर नववी व अकरावीच्या विद्यार्थ्यांचीही ताबडतोब पुनर्परीक्षा घेऊन पुढील वर्गात प्रवेश देण्यासाठी सरकारने आदेश देण्याची मागणी सुळे यांनी केली आहे. (प्रतिनिधी)
असे करता येईल नियोजन
१ मेपर्यंत नववी आणि अकरावीच्या विद्यार्थ्यांचा निकाल अपेक्षित असतो. त्यामुळे परीक्षांना नापास झालेल्या विद्यार्थ्यांना अभ्यास करण्यासाठी ४५ दिवसांचा अवधी दिला जाईल. त्यानंतर जूनच्या तिसऱ्या आठवड्यात नापास विद्यार्थ्यांची पुनर्परीक्षा घेण्यात येईल, ज्याचा निकाल परीक्षा झाल्याच्या आठ दिवसांत लावला जाईल. त्यात उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना जुलैच्या पहिल्या आठवड्यापासूनच पुढील इयत्तेसाठी प्रवेश देता येईल. जेणेकरून विद्यार्थ्याचे वर्ष वाया जाणार नाही.