उदयनराजेंचा भडका; पवारांसोबतची बैठक अर्ध्यावर सोडून आले, तावातावाने बोलले!
By ऑनलाइन लोकमत | Published: June 15, 2019 03:28 PM2019-06-15T15:28:53+5:302019-06-15T15:44:30+5:30
शरद पवारांची शिष्ठाई निष्फळ ठरली.
मुंबई : नीरा देवघर धरणातील पाणीवाटपावरुन राष्ट्रवादी काँग्रेसचे सातारा येथील खासदार उदयनराजे भोसले आणि विधानपरिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांच्यातील वाद विकोपाला गेला आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी रामराजे निंबाळकर-उदयनराजे यांच्यातील वाद मिटवण्यासाठी मुंबईत बैठक बोलविली होती. मात्र, शरद पवारांची शिष्ठाई निष्फळ ठरली आहे. यावेळी बैठक अर्ध्यावर सोडून उदयनराजे बाहेर आले आणि माध्यमांशी बोलताना त्यांनी पुन्हा रामराजे नाईक निंबाळकर यांच्यावर खालच्या पातळीवर टीका केली.
काय म्हणाले उदयनराजे...
- मी कुणावरही आरोप केलेच नाहीत, आणि करतच नाही.
- ते (रामराजे नाईक निंबाळकर) सभापती आहेत. सुसंस्कृत आहेत. वयाने मोठे आहेत.
- पण शेवटी कसं आहे, काहीही बोलायचं, कोण खपवून घेणार?
- चक्रम, पिसाळलेले कुत्रं, स्वयंघोषित छत्रपती म्हणाले,
- मी कुठे म्हटलंय...शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज हे छत्रपती आहेत.
- माझं भाग्य की गेल्या जन्मी माझ्याकडून पुण्य घडलं असावं एवढ्या मोठ्या घराण्यात जन्माला आलो. या योगायोगाच्या गोष्टी असतात.
- आज आणि भविष्यातही वाईट कधी कुणाचं व्हावं, असं राजकारण केलं नाही, फक्त समाजकारण केलं.
- वैयक्तिक स्वार्थासाठी कधीही फायदा केला नाही.
- मी सर्वसामान्य माणूस म्हणून सेवा केली.
- लोकांनी मनात स्थान दिले, हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. यापेक्षा अजून काय पाहिजे.
- दुसरे काय बोलले, याला मी जबाबदार नाही. दुसरे कुठल्या हेतूने बोलले. माझ्यावर खापर फोडायला मी बांगड्या घातल्यात का?
- लोकांवर अन्याय होत असेल तर डोकं फिरतं चक्रम आहे मी, लोकांचे कामाचे विषय मार्गी लावायचे असतील तर मी चक्रम?
- उचलला जीभ आणि लावली टाळ्याला हे आम्ही सहन करणार का?
- सुसंस्कृत आहात मग असं का वागता?
- आम्ही खालच्या पातळीवर जाणार नाही, असले संस्कार नाहीत.
- वयाने मोठे, ज्ञान जास्त, जास्त पावसाळे बघितलेत. वेळेत बाजूला झालो
- नशीब हे पिसाळलेलं कुत्र मला चावलं नाही.
- माणूस म्हणून जगतोय. हे कुत्रं मला चावलं पिसाळलेलं रेबीज वगैरे झाला तर काय करायचं? मला नाही भुंकायचं.
- पळवाट काढायची तर माझ्यावर खापर का फोडता?
- मी काय बोललो... लोकांनी मला प्रश्न विचारले त्याला उत्तर देणं माझं काम आहे.
- नीरा-देवघरबाबत आकडे त्यांनीच दिलेत, यांना अध्यादेश काढायला पैसे लागत नाहीत. हे मंत्री काम करू शकतात, तर तुम्ही का नाही?
- उदयनराजे कुणाला घाबरून राहात नसतो. केलंय काय घाबरण्यासारखं?
- पवार साहेबांचे दुसऱ्या पक्षात मित्र नाहीत? रामराजेंचे नाहीत? अजितदादांचे नाहीत?
- माझ्या वयाचे असते तर जीभ हासडून हातात ठेवली असती, अपमान केला असता.
(स्वयंघोषित भगिरथाने जनतेला हक्काच्या पाण्यापासून वंचित ठेवलं; नीरेच्या पाण्यावरून उदयनराजे बरसले)
दरम्यान, नीरा डाव्या कालव्याच्या वादात राज्य सरकारने थेट कृती करत बारामतीला जाणारे ६० टक्के पाणी हे माढ्याला देण्याचे आदेश काढले आहेत. जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी काही दिवसांपूर्वी माढ्याला हक्काचे पाणी मिळणार असे वक्तव्य केले होते. अखेर नवनिर्वाचित खासदार रणजीतसिंह नाईक निंबाळकर आणि माजी खा. रणजितसिंह मोहिते-पाटील यांनी महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांच्यासोबत वारंवार केलेल्या पाठपुराव्यामुळे महाजन यांनी आदेश काढले आहेत. या पाणीवाटपावरुन राष्ट्रवादी काँग्रेसचे सातारा येथील खासदार उदयनराजे भोसले यांनी विधानपरिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांच्यावर निशाणा साधला आहे. स्वयंघोषित भगिरथाने जाणीवपूर्वक या भागातील कालव्यांची कामे रखडवल्याने हे तालुके हक्काच्या पाण्यापासून वंचित राहिले, असे सांगत उदयनराजे भोसले यांनी रामराजे नाईक निंबाळकर यांच्यावर टीका केली.
उदयनराजेंना सांभाळा नाहीतर आम्ही बाहेर पडतो, रामराजेंचा पवारांना इशारा
‘आमच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप करणाऱ्यांनी जावळी तालुक्यातील जमिनी कोणी लाटल्या? याचे उत्तर द्यावे, तुम्हाला मताधिक्क्य कमी भेटले म्हणून आमच्यावर राग काढू नका आणि अशा खासदार उदयनराजेंना पक्ष सांभाळणार असेल तर पक्षातून बाहेर पडण्याची परवानगी खासदार शरद पवार यांनी आम्हाला द्यावी,’ असा इशारा विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर यांनी दिला आहे. यावेळी रामराजे म्हणाले, ‘पुनर्वसनाच्या जमिनींबाबत आपल्यावर केलेले आरोप बिनबुडाचे असून, ते आरोप उदयनराजेंनी सिद्ध करावेत. उदयनराजेंनी महसूल राज्यमंत्री असताना काय उद्योग केलेत, हे बाहेर काढणार आहे. माझ्यावर बोलणारे दोन खासदार आणि एक आमदार तिघेही यापूर्वी एकत्र होतेच, पूर्वी टेबलाखालून होते, आत्ता टेबलावर आले आहेत, मी त्यांना भीत नाही. असले बरेच आमदार-खासदार उरावर घेतले असून, दोन्ही खासदारांना मी काखेत घेऊन फिरणारा आहे. माझ्यावर पुनर्वसनाच्या जमिनी लाटल्याचा आरोप करणाऱ्या गोरेंनी पनवेलजवळील जमिनीचे काय केले, हे पाहावे.’
काय आहे करार आणि वादंग ?
- वीर-भाटघर धरणाच्या उजव्या कालव्याद्वारे 57 टक्के व डाव्या कालव्याद्वारे 43 टक्के पाणी वाटपाचे धोरण 1954 च्या पाणी वाटप कायद्यानुसार ठरले होते. त्यानुसार उजव्या कालव्यातून सातारा जिल्ह्यातील फलटण तर सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस, सांगोला व पंढरपूर या तालुक्यांना पाणी मिळत होते. डाव्या कालव्यातून बारामती व इंदापूर तालुक्याला पाणी मिळत होते.
- 4 एप्रिल 2007 रोजी राज्याच्या मंत्रिमंडळात स्वत:ची राजकीय ताकद वापरून राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार व तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सन 2009 मध्ये पाणी वाटपाचा करार बदलला. त्यामध्ये नीरा देवधर धरणातून 60 टक्के पाणी डाव्या कालव्यातून बारामती व इंदापूर तालुक्याला व 40 टक्के पाणी फलटण, माळशिरस, सांगोला, पंढरपूर तालुक्याला देण्याचा निर्णय घेतला. हा करार 3 एप्रिल 2017 पर्यंतचा करण्यात आला होता.
- विधान परिषदेचे सभापतीपद मिळाल्याने आ. रामराजे नाईक-निंबाळकर यांनी या कराराला विरोध न करता संमती दिली होती. 3 एप्रिल 2017 रोजी करार संपल्यावरही बेकायदेशीरपणे हे पाणी बारामती तालुक्याला दिले जात होते.
- हे बेकायदा जाणारे पाणी बंद करून ते पुन्हा फलटण, माळशिरस, सांगोला व पंढरपूर तालुक्यास मिळावे, अशी मागणी खा. रणजितसिंह नाईक-निंबाळकर व माजी खा. रणजितसिंह मोहिते-पाटील यांनी जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्याकडे केली होती.
- याबाबत त्यांनी सोमवारी पुन्हा जलसंपदा मंत्री महाजन यांची भेट घेतली. महाजन यांनी डाव्या कालव्यातून बारामतीला नियमबाह्य जाणारे पाणी कायमचे बंद करण्याचा निर्णय जाहीर केला.याबाबत आदेश येत्या दोन दिवसांत काढावा, असेही त्यांनी अधिकाऱ्यांना सांगितले.त्यानुसार हा आदेश निघाला आहे.