बारामतीत मुलींच्या सुरक्षिततेसाठी निर्माण केलेले ‘निर्भय’ पथकच असुरक्षित
By ऑनलाइन लोकमत | Published: September 22, 2018 06:03 PM2018-09-22T18:03:04+5:302018-09-22T19:15:03+5:30
बारामतीच्या विद्या प्रतिष्ठान महाविद्यालयात पेट्रोलियमसाठी गेलेल्या निर्भया पथकाच्या महिला पोलीस व पोलिसाला मारहाण करण्यात आल्याने खळबळ उडाली आहे.
बारामती : बारामती एमआयडीसी परिसरात निर्भय पथकातील महिलापोलिसालाच एकाने मारहाण करुन दमदाटी केल्याचा प्रकार शनिवारी (दि २२) सकाळी घडला. बारामतीच्या विद्या प्रतिष्ठान महाविद्यालयात पेट्रोलियमसाठी गेलेल्या निर्भया पथकाच्या महिला पोलीस व सोबतच्या सहकाऱ्याला मारहाण करण्यात आल्याने खळबळ उडाली आहे. याप्रकरणी आरोपी विजय गोफणे (रा. वंजारवाडी ता. बारामती) याच्यावर विनयभंग, सरकारी कामात अडथळा आणून दमदाटी करून मारहाण केल्याप्रकरणी तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यामुळे मुलींच्या सुरक्षिततेसाठी निर्माण केलेल्या या पथकाच्याच सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. हे पथकच असुरक्षित असल्याचे वास्तव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवार (दि.२२ ) सकाळी ११ वाजता विद्या प्रतिष्ठान महाविद्यालयाच्या आरोपी गोफणे याने रस्त्यातच मुलांना सोबत घेऊन रस्ता अडवला होता.यामुळे निर्भया पथकाच्या महिला पोलिसांनी रस्त्यात असे थांबू नका असे सांगितले. त्यावर त्याने महिला पोलिसांनाच उलट सुलट भाषा वापरून, शिवीगाळ,दमदाटी केली. तसेच महिला पोलिसाचा हात पिरगळत व कानाखाली मारण्याचा प्रयत्न केला असतानाच पथकातील इतर पोलीस सहकारी त्यांना सोडविण्यासाठी धावले.यावेळी आरोपीने त्यांनाही जबर मारहाण केली.यावेळी पोलीस पाठलाग करत असताना आरोपी गोफणे हा तेथून फरार झाला. एवढा गंभीर प्रकार घडत असताना देखील इतरांनी बघ्याची भुमिका घेतली.
शुक्रवारी इंदापूरच्या महाविद्यालयाच्या समोर रिक्षात गॉगल घालून मुलींच्या मागे टोमणे मारणाऱ्या एकाला जाब विचारण्यासाठी गेलेल्या पथकाच्या महिला पोलिसालाच मारहाण करण्याची धमकी देण्यात आली होती.
...................
गेल्या दोन वर्षात बारामती विभागाच्या निर्भया पथकाने बारामती व इंदापूर तालुक्यात १४०० हून अधिक रोडरोमिओंवर धडक कारवाई केली आहे. पथकाच्या कारवाईच्या धडाक्यामुळे रोडरोमिंओंवर चांगला जरब बसला आहे. त्याची दखल घेत पथकाला पुणे जिल्हयात सर्वोतम कामगिरीबाबत प्रथम क्रमांक देण्यात आला होता. मात्र ,आज घडलेल्या घटनेमुळे मुलींच्या सुरक्षेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
———————————————————
विशेष पथक कधी नेमणार
निर्भया पथकाबरोबरच विशेष पथक नेमणार असल्याचे झारगडवाडीच्या प्रकरणानंतर उपविभागीय पोलीस अधिकारी नारायण शिरगावकर यांनी पत्रकार परिषदेत जाहीर केले होते.मात्र, अद्यापही या विशेष पथकाची अंमलबजावणी होतांना दिसत नाही. तसेच दामिनी पथक नक्की अस्तित्वात आहे का? याची माहिती मिळणे आवश्यक आहे. मार्शलबिटच्या दिलेल्या दुचाकीचा कुठेही वापर होतांना दिसत नाही.त्यामुळे दामिनी पथक,मार्शल बीट पथक प्रभावीपणे कार्यान्वित होण्याची गरज आहे.
——————————————
निर्भया पथकात महिला पोलिसांचे बळ वाढविण्याची गरज
निर्भया पथकात महिला पोलीसांचे संख्या बळ वाढवून पुरुषांची संख्याही वाढवणे गरजेचे आहे.सध्या बारामती व इंदापूर तालुक्यात एक महिला अधिकारी एक पुरुष अधिकारी तर तीन महिला पोलीस कार्यरत आहेत. यामुळे घडलेल्या प्रकरणाबाबत जिल्हा अधीक्षक संदीप पाटील यांनी दखल घेऊन निर्भया पथकात संख्या बळ वाढवून विशेष पथक नेमण्याची गरज आहे.
——————————-