Nirbhaya Case: ‘माझ्या देशात महिलांना न्याय मिळतोच याचा मला अभिमान, पण...'
By ऑनलाइन लोकमत | Published: March 20, 2020 09:51 AM2020-03-20T09:51:13+5:302020-03-20T09:52:52+5:30
देशभरात अशाप्रकारची जी प्रकरणं आहेत ती सगळी जलदगतीने ३ महिन्यात सोडवून महिलांना न्याय देण्याचा प्रयत्न करावा.
नवी दिल्ली – निर्भया प्रकरणातील दोषींना अखेर तिहार जेलमध्ये पहाटे साडेपाचच्या सुमारास फासावर लटकवले. या शिक्षेमुळे संपूर्ण देशभरात न्यायालयाचे आभार मानले जात आहेत. रात्री उशिरापर्यंत न्यायालयात याबाबतच्या याचिकांवर सुनावणी सुरु होती. मात्र न्यायालयाने सर्व याचिका फेटाळत अखेर निर्भयाला न्याय देण्याचं काम केलं त्याच कौतुक सगळेच करत आहेत.
याबाबत खासदार नवनीत कौर राणा म्हणाल्या की, रात्री १२ वाजता न्यायालयाने निर्भया प्रकरणात जो निर्णय घेतला त्याबद्दल एक भारतीय महिला म्हणून मी आभार मानते, गेल्या साडेसात वर्षापासून निर्भयाचे आई-वडील हिंमतीने ही लढाई लढले, संपूर्ण देश या निर्णयाची वाट पाहत होता. अखेर न्याय मिळाला, माझ्या देशात महिलांना न्याय मिळतो याचा मला अभिमान आहे असं त्यांनी सांगितले
तसेच देशभरात अशाप्रकारची जी प्रकरणं आहेत ती सगळी जलदगतीने ३ महिन्यात सोडवून महिलांना न्याय देण्याचा प्रयत्न करावा. यातील आरोपींना फाशी देण्यात यावी ही अपेक्षा आहे. चारही आरोपींना एकत्र फाशी दिली ही पहिलीच घटना आहे, यापुढेही महिलांना असाच न्याय मिळेल अशी खात्री आहे असं मत खासदार नवनीत कौर राणा यांनी व्यक्त केलं.
दरम्यान, गुन्हेगारांना वाचविण्यासाठी ज्या पद्धतीने एक याचिका ठेवण्यात आली होती, त्यानुसार कोर्टाने सर्व याचिका एक-एक करून फेटाळून लावल्या, पण शेवटी मला न्याय मिळाला. अगदी उशीरा, पण आमच्या न्यायव्यवस्थेने हे सिद्ध केले की जे देशातील मुलींना लक्ष्य करतात त्यांना सोडलं जाणार नाही. राज्यघटनेवर प्रश्नचिन्ह निर्माण केलं जात होते. पण, या कारवाईमुळे देशाच्या न्यायालयीन व्यवस्थेवर आमचा विश्वास कायम राहील हे सिद्ध झालं. आम्ही निर्भयाला न्याय मिळावा म्हणून लढा देत होतो पण देशातील मुलींसाठी हा लढा सुरूच राहील अशी प्रतिक्रिया निर्भयाची आई आशादेवी यांनी शिक्षेनंतर दिली.
काय आहे प्रकरण?
16 डिसेंबर 2012 रोजी दिल्लीत एका तरुणीवर सहा जणांनी सामुहिक बलात्कार करून तिला गंभीर जखमी केले होते. त्यानंतर या तरुणीचा उपचारांदरम्यान मृत्यू झाला होता. देशाच्या राजधानीत झालेल्या या क्रूर प्रकारामुळे संपूर्ण देश हादरला होता. तसेच सर्वत्र संतापाची लाट उसळली होती. त्यानंतर या प्रकरणातील सहा आरोपींविरोधात न्यायालयीन लढा सुरू झाला होता. त्यात एक आरोपी अल्पवयीन निघाल्याने त्याची सुटका झाली होती. उर्वरित आरोपींना न्यायालयाने दोषी ठरवून फाशीची शिक्षा सुनावली होती. दरम्यान, एका आरोपीने कारागृहातच आत्महत्या केली होती.