निशांतच्या अवयवदानातून तिघांना नवे आयुष्य!

By admin | Published: February 28, 2017 01:50 AM2017-02-28T01:50:40+5:302017-02-28T01:50:40+5:30

समाजासमोर ठेवला आदर्श!

Nishant's body is new to life! | निशांतच्या अवयवदानातून तिघांना नवे आयुष्य!

निशांतच्या अवयवदानातून तिघांना नवे आयुष्य!

Next

खामगाव, दि. २७- एकुलत्या एक मुलाच्या अवयव दानातून आई-वडिलांच्या पुढाकारातून चौघांच्या आयुष्याला संजीवनी देण्यात आली. खामगावातील निशांत बोबडे याचा पुण्यात अपघाती मृत्यू झाला. या दुर्दैवी घटनेतून सावरत कुटुंबीयांनी निशांतचे देहदान केले.
२१ फेब्रुवारी रोजी खामगाव येथील निशांत नितीन बोबडे याच्या दुचाकीला अपघात होऊन डोक्याला गंभीर मार लागला होता. त्यामुळे त्याला उपचारार्थ प्रथम मेडिपॉईंट हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. त्यानंतर त्याला डेक्कन जिमखाना भागातील सह्याद्री स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये हलविण्यात आले; परंतु त्याने उपचाराला प्रतिसाद दिला नाही. हॉस्पिटलकडून त्याला ब्रेनडेड घोषित करण्यात आले. यावेळी निशांतच्या कुटुंबीयांनी धैर्याने प्रसंगाला सामोरे जात त्याच्या देहदानाची तयारी दर्शविली. त्यामुळे ताबडतोब विविध अवयव काढून त्याचे यशस्वी प्रत्यारोपण गरजुंना करण्यात आले. निशांतचे हार्ट, किडनी, लिव्हर, डोळे व त्वचा दान करण्यात आली असून, त्याच्या हार्टचे प्रत्यारोपण गंभीर हृदयविकाराने पीडित २९ वर्षीय रुग्णाच्या शरीरात करण्यात आले. मुंबई येथील कोकीळाबेन अंबानी हॉस्पिटलमध्ये हा रुग्ण भरती होता. सह्याद्री हॉस्पिटल ते पुणे एअरपोर्ट दरम्यानची संपूर्ण वाहतूक थांबवून ठेवत अँम्बुलन्सद्वारे तातडीने निशांतचे हृदय मेडिकल प्रिझर्व्हेशन सोल्यूशन बॉक्समधून २0 मिनिटात लोहेगाव एअरपोर्टवर पोहोचविण्यात आले. तेथून चार्टर्ड विमानाने ते मुंबईला कोकीळाबेन हॉस्पिटलमध्ये नेऊन तातडीने प्रत्यारोपण शस्त्रक्रिया करण्यात आली. त्यामुळे २९ वर्षीय तरुणास जीवनदान मिळाले. तर लिव्हरचे प्रत्यारोपण ४६ वर्षीय इसमाच्या शरीरात करण्यात आले असून, किडन्यांमुळे ६१ वर्षीय इसमास जीवनदान मिळाले आहे. हे दोघेही पुण्यातील सहृयाद्री हॉस्पिटलमध्ये उपचार घेत होते.
निशांतच्या आई संगीता ऊर्फ नेहा बोबडे यांचेही निशांतच्या देहदानात महत्त्वपूर्ण योगदान राहिले आहे. त्यांनी अतिशय संयम राखीत या धाडसी निर्णयावर होकार दर्शविला.

समाजासमोर ठेवला आदर्श!
निशांतच्या कुटुंबीयांनी उदार भावनेतून घेतलेल्या या निर्णयामुळे तिघांना जीवनदान मिळाल्याचेही सहृयाद्रीचे विभाग प्रमुख केतन आपटे यांनी सांगितले. बोबडे कुटुंबीयांनी दु:खद प्रसंगातही मनावर दगड ठेवून घेतलेला हा निर्णय समाजासमोर आदर्श प्रस्थापित करणारा ठरला आहे.

Web Title: Nishant's body is new to life!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.