मोठी बातमी! नितेश राणे प्रकरण; केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना पोलीस ठाण्यात हजर राहण्याची नोटीस
By ऑनलाइन लोकमत | Published: December 29, 2021 03:18 PM2021-12-29T15:18:18+5:302021-12-29T15:19:21+5:30
सिंधुदुर्ग जिल्हा बँकेची निवडणूक आणि शिवसैनिकाला मारहाण यासंदर्भात भाजपाचे आमदार नितेश राणे यांना अटक करण्याची मागणी होत आहे. यामुळे राज्यातील राजकीय वातावरणही चांगलेच तापलेले आहे. गेल्या तीन दिवसांपासून नितेश राणे नॉटरिचएबल आहेत. ते नेमके कुठे आहेत? हे कुणालाही माहीत नाही.
सिंधुदुर्ग - केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना पोलीस ठाण्यात हजर राहण्यासंदर्भात महाराष्ट्र पोलिसांनी नोटीस बजावली आहे. महत्वाचे म्हणजे, नारायण राणे यांचे पुत्र आमदार नितेश राणे यांच्या जामीन अर्जावर सिंधुदुर्ग न्यायालयात सुनावणी सुरू असतानाच कणकवली पोलिसांनी ही नोटीस बजावली आहे.
सिंधुदुर्ग जिल्हा बँकेची निवडणूक आणि शिवसैनिकाला मारहाण यासंदर्भात भाजपाचे आमदार नितेश राणे यांना अटक करण्याची मागणी होत आहे. यामुळे राज्यातील राजकीय वातावरणही चांगलेच तापलेले आहे. गेल्या तीन दिवसांपासून नितेश राणे नॉट रिचेबल आहेत. ते नेमके कुठे आहेत? हे कुणालाही माहीत नाही.
यासंदर्भात, काल केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना पत्रकार परिषदेत प्रश्न विचारण्यात आला होता. यावर, नितेश राणे कुठे आहेत हे मला माहित नाही आणि मी ते तुम्हाला का सांगू? असा प्रतिप्रश्नही नारायण राणे यांनी केला होता. याचा अप्रत्यक्ष अर्थ नारायण राणे यांना नितेश राणे यांच्यासंदर्भात माहिती तर नाही ना, असाही होत होता. या पार्श्वभूमीवर पोलिसांनी नारायण राणे यांना नितेश राणे यांच्या संदर्भात विचारणा करत ही नोटीस बजावली असल्याचे समजते.
नितेश राणेंसंदर्भातील प्रश्नावर नेमकं काय म्हणाले होते राणे? -
संतोष परब हल्ल्याप्रकरणी नितेश राणेंचा हात असल्याचा आरोप शिवसेना करत आहे. यासंदर्भात, एका पत्रकाराणे नारायण राणे यांना नितेश राणे कुठे आहेत, असा प्रश्न केला असता ते भडकले आणि म्हणाले, असा प्रश्न असतो? ते कुठे आहेत हे सांगायला काय मूर्ख माणून समजलात का तुम्ही मला? कुठे आहेत काय आहेत, जरी मला माहीत असेल तरी मी सांगणार नाही. का सांगावं? तुम्हाला का सांगावं? असा प्रतिप्रश्न त्यांनी केला होता.