...तर मी 'सामना'त १ महिना नोकरी करेन; नितेश राणेंनी ठाकरेंना का दिले चॅलेंज?
By ऑनलाइन लोकमत | Published: January 15, 2024 06:01 PM2024-01-15T18:01:38+5:302024-01-15T18:03:05+5:30
राम मंदिर आंदोलन आणि संजय राऊत, उद्धव ठाकरेंचा काहीही संबंध नाही असं नितेश राणेंनी म्हटलं आहे.
मुंबई - राम मंदिराच्या लोकार्पण सोहळ्यावरुन ठाकरे गट आणि भाजपात श्रेयवादाची लढाई सुरू आहे. त्यात आता भाजपा आमदार नितेश राणेंनी थेट उद्धव ठाकरे आणि संजय राऊतांना चॅलेंज दिले आहे. जर राम मंदिर आंदोलनातील सहभागाचा एक तरी फोटो संजय राऊत, उद्धव ठाकरे यांनी दाखवला तर मी सामनात १ महिना नोकरीही करायला तयार आहे असं राणेंनी म्हटलं आहे.
मुंबईतील पत्रकार परिषदेत नितेश राणे म्हणाले की, राम मंदिर आंदोलनात लालकृष्ण अडवाणी, मुरली मनोहर जोशी, नरेंद्र मोदी, विश्व हिंदू परिषद, संघ परिवार यांचे पुराव्यासह फोटो आहेत. या आंदोलनात कोण कोण होते त्यांना सिद्ध करावे लागत नाही. परंतु खरेच संजय राऊत किंवा उद्धव ठाकरेंचा एक पुरावा राम मंदिर आंदोलनात तुमचा सहभाग होता तो द्यावा. बाळासाहेब ठाकरेंचा सहभाग हा प्रत्येक पिढीला माहिती आहे. परंतु संजय राऊत आणि उद्धव ठाकरेंनी त्यांच्या सहभागाचा एक पुरावा दाखवावा, जर दाखवला तर मी सामनात १ महिना नोकरी करायलाही तयार आहे. राम मंदिर आंदोलन आणि संजय राऊत, उद्धव ठाकरेंचा काहीही संबंध नाही. राम मंदिराचे आंदोलन आणि संजय राऊतांचा काहीही संबंध नव्हता. पुराव्यासह माझ्यासमोर बसावं असं त्यांनी सांगितले.
तसेच मातोश्रीत उद्धव ठाकरे आणि कुटुंब राहते. जिहाद्यांचा लाडका आहे. उद्धव ठाकरेंकडे वाकड्या नजरेने कोण बघणार आहे? बंटी आणि बबलीवर विश्वास पोलिसांनी ठेऊ नका. हा फोन त्यांच्यातल्या कुणीतरी केला असेल. मातोश्रीवर धमकीचा फोन आला यावर विश्वास नाही. स्वत:चे संरक्षण वाढवण्यासाठी राऊतांनीही मागेच ते केले होते. ठाकरेंकडे एकही निष्ठावंत शिवसैनिक राहिला नाही. त्यामुळे मुळात तो फोन कुणी केला होता त्याची चौकशी मुंबई पोलिसांनी केली पाहिजे असंही नितेश राणे यांनी सांगितले.
दरम्यान, काँग्रेस पक्ष गांधी प्रायव्हेट लिमिटेड कंपनी आहे. राहुल गांधींना पुढे आणणे हा एकमेव कलमी कार्यक्रम असल्याने काँग्रेस पक्षात एकही तरुण नेता आता राहिलेला नाही अशी प्रतिक्रिया भाजपा आमदार नितेश राणेंनी दिली आहे. मिलिंद देवरा यांच्या शिवसेना प्रवेशावर पत्रकारांनी नितेश राणेंना प्रश्न विचारला त्यावर ते बोलत होते.