Nitesh Rane Exclusive: ‘तो’ राणे कुटुंबासाठी भावनिक क्षण; आई-वडिलांबाबत बोलताना आमदार नितेश राणे भावूक
By ऑनलाइन लोकमत | Published: August 31, 2021 05:32 PM2021-08-31T17:32:20+5:302021-08-31T17:34:00+5:30
आमच्या वडिलांना शिव्या घालताना आम्ही विरोध करायचा नाही का? मग तुम्ही जी भाषा वापरता ती आम्ही वापरली तर ते चालत नाही. सुरुवात त्यांनी केली पण आता व्याजासह प्रत्युत्तर आम्ही देऊ असा इशाराही नितेश राणेंनी दिला.
मुंबई – राज्यातील राजकारणात राणेविरुद्ध शिवसेना हा संघर्ष गेल्या काही दिवसांपासून पाहायला मिळत आहे. नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केल्यानंतर शिवसैनिकांमध्ये संतापाची लाट पसरली. राज्यभरात राणेंविरोधात शिवसैनिकांनी आंदोलन केले. इतकेच नव्हे तर नारायण राणे(Narayan Rane) यांच्या जुहू येथील बंगल्याबाहेर शिवसैनिकांनी आंदोलन केले. त्यावरुन भाजपा आमदार नितेश राणे यांनी भाष्य करत शिवसेनेवर टीका केली आहे.
आमदार नितेश राणे(Nitesh Rane) म्हणाले की, नारायण राणेंसोबत जो प्रवास आईनं बघितला आहे. चढउतार बघितले आहेत त्यामुळे आईकडून खूप काही शिकायला मिळतं. काही विषय आई इतक्या सहजपणे आम्हाला सांगते, आईला ज्या गोष्टी राजकारणाबद्दल कळतात आम्हाला आश्चर्य वाटतं. आमच्या घरावर जो हल्ला करण्यात आला तो राणे कुटुंबासाठी भावनिक क्षण होता. जर तुम्हाला यायचं होतं तर तारीख सांगून यायचं होतं. आम्ही नसताना तिथे आला. परंतु आमचे कार्यकर्ते आमच्या घराचं संरक्षण करण्यात समर्थ होते. आमच्या घरात लहान मुलं होतं. जो काही धिंगाणा घातला ही मानसिकता ठाकरे कुटुंबाने दाखवली त्याचा आईला त्रास झाला असं त्यांनी सांगितले.
तसेच आपल्या देशाचा अपमान होत असताना भारतीय नागरिक गप्प बसतील का? एका मुख्यमंत्र्यांना अमृत महोत्सव की हिरक महोत्सव विचारावं याविरोधात तो संताप आहे. आमच्या घरावर जी मुलं पाठवली. आम्ही कुणीही नव्हतो तेव्हा ते सगळे घरावर आहे. पण आता ती वैयक्तिक लढाई त्यांनी केली. आमच्या घरात मुलं होतं. उद्या जर काही झालं असतं तर त्याला जबाबदार कोण असतं? आमच्या वडिलांना शिव्या घालताना आम्ही विरोध करायचा नाही का? मग तुम्ही जी भाषा वापरता ती आम्ही वापरली तर ते चालत नाही. सुरुवात त्यांनी केली पण आता व्याजासह प्रत्युत्तर आम्ही देऊ असा इशाराही नितेश राणेंनी दिला.
"राणे-राज-उद्धव हे एकत्र आले असते तर...; परंतु ‘त्या’ लोकांना हे नकोय", नितेश राणेंचा गौप्यस्फोट
इतकचं नाही तर राजकीय टीका करायची तर ती जरुर करावी. परंतु आमच्या घरावर हल्ला करणं तेदेखील आम्ही तिथे नसताना ही वैयक्तिक घटना आम्ही कधी विसरणार नाही. वडिलांना जेवताना ज्यापद्धतीने त्यांना उठवलं एक मुलगा म्हणून राजकारणाची पातळी बघितल्यावर दु:खं वाटलं. शिवसेना ज्याप्रकारे राणे कुटुंबाशी वागली ते आम्ही कधीच विसरणार नाही असं आमदार नितेश राणे यांनी सांगितले.
कुठलेही राजशिष्टाचार पाळले नाहीत
नारायण राणे यांना अटक करताना राजशिष्टाचाराचे कुठलेही नियम पाळले नाही. केंद्रीय मंत्र्यांना अटक करताना एक नोटीसही पोलिसांकडे नव्हती. आम्ही कायद्यापेक्षा मोठे नाही. परंतु ज्या पद्धतीने हा प्रकार झाला तो चुकीचा होता. नोटीस नसताना पोलिसांवर वरिष्ठांचा दबाव होता. रत्नागिरी पोलीस अधीक्षकांशी अनिल परब नेमकं काय बोलले? केंद्रीय मंत्र्याला अशाप्रकारे नोटीस न देता अटक करण्यामागे काहीतरी गौडबंगाल होतं त्याला आमचा आक्षेप होता असं नितेश राणेंनी म्हटलं.
तसेच नोटीस न दाखवता ताब्यात घ्या हा सत्तेचा गैरवापर नाही का? आमचेही राज्यात दिवस येतील. अनिल परब यांचा व्हिडीओ कोर्टात सादर करणार आहोत. या व्हिडीओमुळे सरळ बेकायदेशीर पद्धतीने अटक करण्याचा प्रयत्न करत आहे हे स्पष्ट आहे. अनिल परब यांना सत्तेचा गैरवापर केल्याप्रकरणी जी शिक्षा व्हायला पाहिजे ती होण्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत असंही नितेश राणेंनी सांगितले.