“घाम पुसत भाषण करणाऱ्या संजय राऊतांमध्ये हिंमत होती तर...”; राणेंचा खोचक टोला
By ऑनलाइन लोकमत | Published: February 18, 2022 08:03 PM2022-02-18T20:03:15+5:302022-02-18T20:04:29+5:30
पत्रकारांवर अन्याय करणाऱ्या संजय राऊतांची स्वत:च्या पेशाशी निष्ठा आहे का, असा सवाल करण्यात आला.
सिंधुदुर्ग: सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या स्वीकृत संचालकपदी भाजपा आमदार नितेश राणे (Nitesh Rane) यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांच्या निर्देशानुसार ही निवड करण्यात आली आहे. यावेळी दुसरे स्वीकृत संचालक म्हणून कुडळाचे प्रकाश मोरे यांची निवड करण्यात आली. यानंतर बोलताना नितेश राणे यांनी संजय राऊत (Sanjay Raut) यांनी मुंबईतील शिवसेना भवनात घेतलेल्या पत्रकार परिषदेवर प्रतिक्रिया दिली. संजय राऊतांच्या पत्रकार परिषदेला मी पत्रकार परिषद म्हणणार नाही. ते एकतर्फी बोलले, अशी टीका नितेश राणे यांनी केली.
नितेश राणे यांनी संजय राऊत यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेचा समाचार घेतला. योग्य माहिती आणि भूमिका समजते म्हणून पत्रकार परिषद महत्त्वाची असते. नुसते तुम्ही बोलता आणि पत्रकारांना प्रश्न-उत्तर करायला देत नाही. याला पत्रकार परिषद म्हणत नाही, याला नुसते भाषण म्हणतात. नारायण राणे यांनी खरी पत्रकार परिषद घेतली आणि सेना भवनमध्ये फक्त भाषण झाले. संजय राऊतांमध्ये हिंमत असती तर प्रश्न उत्तर घेतली असती, असा खोचक टोला नितेश राणे यांनी लगावला.
स्वतःच्या पेशाशी तुमची निष्ठा आहे का?
संजय राऊत स्वतः पत्रकार असून, पत्रकारांवर अन्याय करत असाल तर स्वतःच्या पेशाशी तुमची निष्ठा आहे का? असा सवालही नितेश राणेंनी केला. तसेच पोलीस आणि प्रशासन हे आदेशावर चालते. राज्यकर्ते आदेश देतात तसे ते चालतात. सत्ताधारी लोकांची मानसिकता काय याचे प्रतिबिंब पोलीस आणि प्रशासन यामध्ये दिसते. पोलीस आणि प्रशासनाला दोष देऊन फायदा नाही. याला जबाबदार सत्ताधारी आहेत, अशी टीकाही नितेश राणे यांनी केली.
विलासराव आणि राणेसाहेब एका डब्यात जेवायचे
विधानसभा सभागृहात भांडूनही नंतर विलासराव आणि राणेसाहेब एका डब्यात जेवायचे. ही महाराष्ट्राची संस्कृती आहे. राजकारणाची पतळी घसरली आहे. ती चुकीची आहे, असे सांगत किरीट सोमय्या खरे किंवा खोटे बोलत असतील तर कागदपत्रांनुसार तुम्ही लढा ना. तुम्ही थांबवायचा का प्रयत्न करताय? तिथेच चोरी दिसते. काही दिवसांपूर्वी वरळीला मच्छीमार बांधवांना भेटायला जात होतो. तिथेही शिवसैनिक जमा झाले होते, असे नितेश राणे यांनी म्हटले आहे.