Video: मुंबईच्या हुक्का पार्लरमध्ये 'स्वाभिमान' कार्यकर्त्यांची तोडफोड
By ऑनलाइन लोकमत | Published: January 11, 2018 01:49 PM2018-01-11T13:49:40+5:302018-01-11T13:51:23+5:30
मुंबईच्या वर्सोवा परिसरातील एका हुक्का पार्लरमध्ये स्वाभिमान संघटनेच्या कार्यकर्त्यांनी तोडफोड केली आहे. यारी रोडवरील सिरोको कॅफेमध्ये रात्री दोन वाजेच्या सुमारास मोठ्या प्रमाणात तोडफोड करण्यात आली.
मुंबई: मुंबईच्या वर्सोवा परिसरातील एका हुक्का पार्लरमध्ये स्वाभिमान संघटनेच्या कार्यकर्त्यांनी तोडफोड केली आहे. यारी रोडवरील सिरोको कॅफेमध्ये रात्री दोन वाजेच्या सुमारास मोठ्या प्रमाणात तोडफोड करण्यात आली. हुक्क्याचा विरोध करत स्वाभिमानचे कार्यकर्ते हुक्का पार्लरमध्ये घुसले आणि तेथे हुक्का पित असलेल्यांना पळवून लावलं. यावेळी कार्यकर्त्यांनी हॉटेलमधील फर्नीचरची तोडफोड केली. घटनेनंतर पोलीस घटनास्थळी दाखल झाले पण तोपर्यंत कार्यकर्त्यांनी पळ काढला होता. याप्रकरणी वर्सोवा पोलीस स्थानकात अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
#WATCH Protesting against sale of hookah, Swabhiman Sanghathana workers vandalized a restaurant in Mumbai's Versova last night (amateur video) pic.twitter.com/HodSyHU7Js
— ANI (@ANI) January 11, 2018
मुंबईतील कमला मिल येथील पबमध्ये आग लागून 14 जणांचा बळी गेल्याने सर्वत्र खळबळ उडाली होती. आगीचा भडका उडण्यास मोजो बिस्ट्रो रेस्टो पबमधील हुक्का कारणीभूत ठरल्याचं समोर आल्यानंतर नितेश राणेंच्या स्वाभिमान संघटनेने हुक्का पार्लरविरोधात एल्गार पुकारला आहे. 10 ते 12 जानेवारी दरम्यान महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाच्या वतीने संपूर्ण मोहीम सुरू करण्यात आली आहे. या मोहीमेत सर्व तरुणांनी सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
कमला मिल कंपाऊंडमधील मोजो पबमधील हुक्क्यामुळे भडकली आग, अग्निशमन दलाचा अहवाल
कमला मिल कंपाऊंडमध्ये आगीचा भडका उडण्यास मोजो बिस्ट्रो रेस्टो पबमधील हुक्का कारणीभूत ठरला आहे. धगधगत्या कोळशाची ठिणगी उडून या पबमधील पडद्यांनी पेट घेतला असण्याची दाट शक्यता अग्निशमन दलाने चौकशी अहवालातून व्यक्त केली आहे. मोजो रेस्टॉ पबच्या मालकाला पालिकेचा एकही परवाना चौकशीदरम्यान सादर करता आला नाही, असे अहवालातून स्पष्ट करण्यात आले आहे.
कमला मिल कंपाऊंड मध्ये लागलेल्या आगीत 14 जणांचा मृत्यू झाला. या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी सुरू आहे. तसेच अग्निशमन दलानेही आज आपला अहवाल आयुक्त अजोय मेहता यांना सादर केला. यामध्ये आग मोजोमध्येच लागल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. मोजो मध्ये पेटत्या कोळश्यातून आगीची ठिणगी पडद्यावर पडली, उपहारगृहातील बेकायदा जळाऊ वस्तू आणि वेगाने वाहणाऱ्या वाऱ्यामुळे ही आग पसरत वन अबव्ह रेस्टो पबपर्यंत पोहचून त्याचे बेकायदा बांबूचे छत पेटले असे या अहवालात नमूद करण्यात आले आहे.
या चौकशीत वन अबव्ह रेस्टॉरंटकडे गच्चीवर उपहारगृह सुरु करण्याची परवानगी नव्हती. तर मोजो बिस्ट्रा रेस्टॉरेंटकडून पालिकेचे कोणतीही परवाने नसल्याचे या अहवालात स्पष्ट करण्यात आले आहे. या दोन्ही रेस्टो पबमध्ये मोठ्या प्रमाणात हुक्क्याचे पाईप व साहित्य, कोळश्यांचा साठा सापडला आहे. दोन्ही पब गच्चीवर असल्याने वा-यामुळे कोळश्याने पेट घेत आग भडकविली असे या अहवालात नमूद करण्यात आले आहे.
पबमध्ये आगीचा खेळ
अग्निशमन दलाने हा अहवाल तयार करण्यासाठी 12 प्रत्यक्षदर्शींची जबानी घेतली आहे. छायाचित्र, व्हिडीओचा आढावा घेऊन हा अहवाल तयार करण्यात आला. मोजोच्या बार टेंडर टेबलवर आगीचा खेळ सुरू असल्याचे आढळून आले आहे. मात्र आग हुक्क्यामुळे लागली असा निष्कर्ष काढण्यात आला. कारपेट, पडदे, उघड्यावर ठेवलेल्या मद्याच्या बाटल्या इतर जळाऊ साहित्यामुळे ही आग वेगाने पसरत गेली.
अशी होणार कारवाई
- मोजो आणि वन अबाव्हचा वीज आणि पाणी पुरवठा खंडित होणार.
- दोन्ही रेस्टो पबमध्ये अग्निशमन दलाने दिलेले ना हरकत प्रमाणपत्र रद्द करून कायदेशीर कारवाई होणार आहे.
- हे दोन्ही पब असलेल्या ट्रेड हाऊस या इमारतीची तपासणी करुन बेकायदा बाबींवर कारवाई होणार
आगीच्या कारणात बदल अपेक्षित
न्यायवैद्यक विभागाच्या तपासणीतून काही पुरावे उघड झाल्यास या आगीच्या कारणात बदल होण्याची शक्यता अग्निशमन दलाने वर्तविली आहे.
मोजोमध्येच आगीचे उगम
या दुर्घटनेप्रकरणी पोलिसांनी वन अबाव्ह या पबच्या मालकांविरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला होता. मात्र अग्निशमन दलाने सादर केलेल्या अहवालात मोजोमध्येच आग लागली असल्याचा ठपका ठेवला आहे. निवृत्त पोलीस अधिकारी के. के. फाटक यांचा पुत्र युग फाटक आणि गायक शंकर महादेवन यांचा पुत्र सिद्धार्थ महादेवन यांच्या मालकीचे हे उपाहारगृह आहे.