नितेश राणेंचा भुजबळांना सल्ला; ओबीसींच्या २७ टक्के आरक्षणातील एकाही टक्क्याला...
By ऑनलाइन लोकमत | Published: December 13, 2023 10:16 AM2023-12-13T10:16:32+5:302023-12-13T10:17:10+5:30
सगळ्यांना मराठा आरक्षण हवे पण कुठल्याही इतर समाजाच्या आरक्षणाला धक्का न लावता आरक्षण हवे असं नितेश राणेंनी म्हटलं.
नागपूर - एक व्यक्ती म्हणजे मराठा समाज नाही. आम्हीदेखील मराठा आहोत. आम्ही ओबीसींच्या विरोधात नाही. आम्ही सगळे समाज एकत्र मिळून गुण्यागोविंदाने महाराष्ट्रात राहतो. त्यामुळे एकमेकांना आव्हान देण्याचं समाजालाही मान्य नाही. एकमेकांना आव्हान देण्याची गरज नाही असा सल्ला आमदार नितेश राणे यांनी छगन भुजबळांना दिला आहे.
नितेश राणे म्हणाले की,उद्या जर समाजात तेढ झाले तर नेतेमंडळी घरी राहतील पण गरीब मुलांवर गुन्हे दाखल होतील. आपल्याला हवे असेल तर एकत्र व्यासपीठ तयार करू. सगळ्यांना मराठा आरक्षण हवे पण कुठल्याही इतर समाजाच्या आरक्षणाला धक्का न लावता आरक्षण हवे. ओबीसींच्या २७ टक्क्यांपैकी एकाही टक्क्याला हात लावायचा नाही. मराठा समाजाचे मागासलेले पण सिद्ध झाल्यावर राज्य सरकार आरक्षण देऊ शकते. एकमेकांना आव्हान देण्याची गरज नाही. सरकार सकारात्मक आहे. मग धमक्या कशाला दिल्या जातायेत असं त्यांनी म्हटलं.
त्याचसोबतच आरक्षणाच्या नावाखाली घाणेरडे राजकारण होत असेल तर हे मान्य नाही. मराठा आरक्षणासाठी सगळेच प्रयत्न करतायेत, एकटा नाही. वर्षोनुवर्ष आंदोलने सुरू आहेत. आम्हीही राज्यात फिरून सभा घेतल्यात. सकारात्मकपणे मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी अनेक समित्यांनी अहवाल दिलेत. पण आता जी काही परिस्थिती खराब होतेय त्याचीही चौकशी झाली पाहिजे. मविआ सरकारने चुका केल्या नसत्या तर आज महाराष्ट्रात ही परिस्थिती आली नसती. एकाबाजूला जरांगे पाटील शांततेत आंदोलन करण्याचे आवाहन करतात दुसऱ्या बाजूला ही दगडफेक, जाळपोळ कोण करतेय? जालनात एकाला अटक केली त्याच्याकडे पिस्तुल सापडली याची चर्चा व्हायला नको. त्यादिवशी दगड मारण्याची सुरुवात कुणी केली. जर दगड मारला तर लाठीचार्ज करणार नाही का? फक्त एका पक्षावर टीका होत नाही, त्यांचीच संघर्ष यात्रा सुरू आहे. एका नेत्यावरच टीका केली जातेय याला राजकारण म्हणतात असा आरोप त्यांनी केला.
दरम्यान, सरसकट कुणबी प्रमाणपत्रे देण्याला आमचा पाठिंबा नाही.कुणालाही देता कामा नये. ज्याला मराठा समाजाचं प्रमाणपत्र हवे त्यांनी ते घ्यावे, कुणबी ज्यांना हवे त्यांनी कुणबी द्यावे पण सरसकट प्रमाणपत्रे देऊ नका. असे काही करू नका. मराठा हा शब्द इतिहासात मिटवून टाकायचा प्रयत्न आहे का? मनोज जरांगे पाटील कायदेतज्ज्ञ नाही. तोदेखील हाडामासाचा माणूस आहे आरक्षणासाठी लढतोय. त्याला समजावू, चर्चा करू नाही ऐकले तरी बसवून समजूत काढू. पण चुकीच्या मागण्या सरकारने मान्य करू नये. मराठा समाजाला त्यांचे हक्क मिळणार. उगाच महाराष्ट्रात वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न करू नका असं नितेश राणेंनी म्हटलं आहे.