नितेश राणे यांची याचिका कामगारविरोधी
By admin | Published: January 10, 2017 04:42 AM2017-01-10T04:42:36+5:302017-01-10T04:42:36+5:30
कंबाटा अॅव्हिएशनची मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर असलेल्या मालमत्ता जप्ती प्रक्रिया स्थगिती करण्याची मागणी करणारी काँग्रेस आमदार
मुंबई : कंबाटा अॅव्हिएशनची मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर असलेल्या मालमत्ता जप्ती प्रक्रिया स्थगिती करण्याची मागणी करणारी काँग्रेस आमदार नितेश राणे यांची याचिका कामगारविरोधी असल्याची टीका सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी केली.
कंबाटा अॅव्हिएशनमधील देणी मिळावीत यामागणीसाठी बाबत आझाद मैदान येथे कामगारांनी निदर्शने केली. यावेळी अंजली दमानिया आणि शिवसेना उपनेत्या आणि आमदार नीलम गो-हे उपस्थित होत्या. कंबाटाच्या २४०० कामगारांचे आॅगस्ट २०१६ पासूनचे थकलेले वेतन आणि इतर देणी देण्यासाठी जवळपास ११० कोटींची आवश्यकता असून ही रक्कम उभी करण्यासाठी कंबाटा अॅव्हिएशन कंपनीची मुंबई विमानतळावर असलेली मालमत्ता गोठवण्याचे आदेश कामगार न्यायालयाने दिले आहेत. या आदेशानुसार राज्य सरकारने कंपनीच्या मालकीच्या विमानतळावरील साधनसामग्रीमधील ३१६ वस्तु शनिवारी जप्त केल्या. या वस्तुंची किंमत चाळीस ते पन्नास कोटींच्या आसपास आहे. मात्र मालमतता जप्तीचा कामगार न्यायालयाचा आदेश हा फक्त १३० कामगारांपुरता मर्यादीत असून इतर कामगारांनाही त्यांच्या हक्काची देणी मिळणे गरजेचे असल्याची भुमिका घेत महाराष्ट्र समर्थ कामगार संघटनेचे नितेश राणे यांनी जप्तीच्या आदेशाला स्थगिती देण्याबाबत याचिका दाखल केली आहे. कामगारांना जानेवारी २०१६ पासून त्यांचे थकीत वेतन मिळवून देण्यासाठी आमचा लढा असल्याचा राणे यांचा दावा आहे. (प्रतिनिधी)
इरॉस विकून कामगारांची देणी द्या : नीलम गोऱ्हे
नितेश राणे यांच्या याचिकेला विरोध केलाच पाहिजे पण त्याचबरोबर कंबाटाच्या मालकीचे चर्चगेट स्टेशन बाहेर असलेले इरॉस थिएटर जप्त करून त्या पैशातून कामगारांची देणी द्यावीत, अशी मागणी नीलम गोऱ्हे यांनी केली.