दिवस उलटला तरीही 'वादळ' नाहीच, नितेश राणेंचं 'ते' ट्विट फोल ठरलं
By ऑनलाइन लोकमत | Published: October 2, 2019 09:50 PM2019-10-02T21:50:29+5:302019-10-02T21:50:53+5:30
भाजपमध्ये प्रवेश न करताच नितेश राणेंना एबी फॉर्म देण्यात येणार असल्याचं सांगण्यात येत होतं.
महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे संस्थापक नारायण राणेंचा भाजपा प्रवेश अद्यापही अनिश्चितच मानण्यात येत आहे. 2 ऑक्टोबरला राणेंचा भाजपा प्रवेश होईल आणि ते स्वाभिमान पक्षाचे भाजपाता विलनीकरण करतील, अशा बातम्या होत्या. मात्र, 2 ऑक्टोबरचा दिवस संपला, तरीही राणेंचा भाजपा प्रवेश नाही. तर, दुसरीकडे नारायणे राणेंचे सुपुत्र नितेश राणे यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन ''फक्त काही तास बाकी'' (वादळापूर्वीची शांतता) असे ट्विट केले होते. मात्र, या ट्विटलाही 23 तास उलटून गेले आहेत.
भाजपमध्ये प्रवेश न करताच नितेश राणेंना एबी फॉर्म देण्यात येणार असल्याचं सांगण्यात येत होतं. 4 ऑक्टोबरला मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये नितेश राणे एबी फॉर्म भरणार असल्याचं सांगण्यात येत आहे. भाजपमध्ये प्रवेश न करताच नितेश राणे यांचं नाव थेट उमेदवारी यादीत दिसणार असल्याने राजकीय चर्चांना उधाण आलं आहे. ‘फक्त काही तास बाकी, वादळा पूर्वीची शांतता’ असं सूचक ट्वीट नितेश राणे यांच्याकडून करण्यात आलं आहे. मात्र, या ट्विटला आता 23 तास उलटले असून एक दिवस पूर्ण होत आहे. पण, अद्यापही कुठलंही राजकीय वादळ आल्याचं दिसून येत नाही. त्यामुळे राणेंच्या भाजपा प्रवेशावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहेत.
— nitesh rane (@NiteshNRane) October 1, 2019
नितेश राणे हे कणकवलीमधून उमेदवारी अर्ज भरणार आहे. गेल्या दोन दिवसांआधी काँग्रेसमध्ये असलेल्या नितेश यांनी त्यांच्या आमदारकीचा राजीनामा दिला आणि आता ते थेट भाजपमधून विधानसभा निवडणूक लढणार असल्याचं सांगण्यात येत आहे. मात्र, राज्यमंत्री आणि राणेंचे कट्टर विरोधक दिपक केसरकर यांनी राणेंना भाजपात प्रवेश मिळणार नसल्याचा दावा केला आहे. त्यामुळे राणेंच्या भाजपा प्रवेशावर चर्चा सुरू झाली आहे. तसेच, नितेश राणेंच्या काही तासांचा अवधीवाल्या ट्विटलाही आता 1 दिवस पूर्ण होत आहे. मात्र, राणेंसंदर्भात कुठलीही अधिकृत घोषणा नाही.
दरम्यान, “मी लवकरच भाजपमध्ये प्रवेश करणार…पक्षही विलीन करणार…” स्वत:हून ही घोषणा करणाऱ्या नारायण राणेंच्या भाजप प्रवेशाला काही केल्या मुहूर्त सापडत नाही आहे. 2 ऑक्टोबरला राणे पक्षात प्रवेश करणार असल्याचीही चर्चा होती. पण, या दिवशीही भाजप प्रवेश झालाच नाही.