नितीन गडकरींना भोवळ; आता प्रकृती उत्तम, शिर्डीतील दर्शनानंतर नागपूरला रवाना
By ऑनलाइन लोकमत | Published: December 8, 2018 06:09 AM2018-12-08T06:09:55+5:302018-12-08T06:10:09+5:30
राहुरी येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या दीक्षान्त समारंभावेळी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हे भोवळ येऊन खुर्चीवर कोसळले.
अहमदनगर/नागपूर : राहुरी येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या दीक्षान्त समारंभावेळी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हे भोवळ येऊन खुर्चीवर कोसळले. मात्र, राज्यपाल व डॉक्टरांनी त्यांना लगेच सावरले. त्यांची प्रकृती आता उत्तम असून, या घटनेनंतर शिर्डी येथे साईसमाधीचे दर्शन घेऊन ते विश्रांतीसाठी विशेष विमानाने नागपूरला रवाना झाले.
कृषी विद्यापीठाच्या ३३व्या पदवीप्रदान समारंभात राज्यपाल सी. विद्यासागर राव व गडकरी प्रमुख पाहुणे होते. तिथे व्यासपीठावर पालकमंत्री राम शिंदे, राज्यमंत्री सदाशिव खोत व कुलगुरू डॉ़ के़ विश्वनाथ हेही हजर होते. गडकरी यांचे दीक्षान्त भाषण संपल्यावर सांगतेप्रसंगी राष्ट्रगीत सुरू असताना गडकरी यांना भोवळ आल्याने ते खुर्चीतच कोसळले. राज्यपालांनी प्रसंगावधान दाखवून त्यांना लगेच सावरले. पण आकस्मिक घटनेमुळे क्षणभर सर्वच घाबरले. डॉक्टरांचे पथक तातडीने बोलविण्यात आले. मात्र थोड्याच वेळात गडकरी सावरले. त्यानंतर ते स्वत: विद्यापीठाच्या प्रशासकीय इमारतीपर्यंत चालत गेले. तेथे थोडा आराम करून ते हेलिकॉप्टरने शिर्डीला रवाना झाले. शिर्डी येथे साईसमाधीचे दर्शन घेऊन त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. ‘थोडीशी भोवळ आली होती. आता आपली प्रकृती उत्तम आहे. कोणीही काळजी करु नये’ असे आवाहन त्यांनी केले. त्यानंतर ते नागपूरला रवाना झाले. गडकरी यांनी गोवा दौरा रद्द केला आहे. ते १० डिसेंबर रोजी गोव्यात येणार होते, अशी माहिती गोव्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री सुदिन ढवळीकर यांनी दिली.
गुदमरल्यामुळे भोवळ
गडकरी यांनी दीक्षान्त समारंभासाठी ‘कॉन्व्हकेशन गाऊन’ परिधान केला होता. या पोषाखामुळे त्यांना अस्वस्थ व्हायला होते हा त्यांचा पूर्वीचा अनुभव आहे. शुक्रवारीही हा पोषाख व समारंभस्थळी असलेले बंदिस्त वातावरण त्यांना श्वास घेताना त्रास झाला. त्यामुळे आपणाला भोवळ आल्याचे गडकरी यांनी ‘लोकमत’ला सांगितले. या घटनेवेळी आपली साखर व रक्तदाब सामान्य होता, असेही ते म्हणाले.
>विजय दर्डा यांच्याकडून प्रकृतीची विचारपूस
या घटनेनंतर ‘लोकमत’वृत्तपत्र समूहाचे चेअरमन विजय दर्डा यांनी तातडीने गडकरी यांचेशी संपर्क करुन त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. त्यावेळी गडकरी यांनी भोवळ का आली, याचे कारण सांगितले. आपली प्रकृती उत्तम असल्याची माहितीही त्यांनी दिली. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खा. शरद पवार यांनीही गडकरी यांच्या प्रकृतीची विचारपूस करून तब्येत सांभाळण्याचा सल्ला दिला. कामात व्यग्र असताना अनेकदा तब्येतीकडे दुर्लक्ष होते, असे त्यांनी सांगितले.