सरकार विषकन्येसारखे, सरकारच्या हस्तक्षेपामुळे प्रकल्प उद्धवस्त होऊ शकतात- नितीन गडकरी
By ऑनलाइन लोकमत | Published: July 16, 2023 05:52 PM2023-07-16T17:52:58+5:302023-07-16T17:54:23+5:30
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आपल्या वक्तव्यामुळे नेहमी चर्चेत असतात. आता पुन्हा एकदा ते चर्चेत आले आहेत.
Nitin Gadkari Statement: केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आपल्या स्पष्टवक्तेपणासाठी ओळखले जातात. अनेकदा ते सार्वजनिक मंचावरुन विरोधकांना टीका करण्यासोबतच सरकारवरही भाष्य करतात. आता नागपुरातील एका कार्यक्रमाला संबोधित करताना गडकरींनी सरकारला 'विषकन्या' म्हटले आहे. त्यांच्या या वक्तव्याने चर्चेला उधाण आले आहे.
Addressing Dr. C D Mayee Krishi Puraskar program organised by Krushi Vikas Pratishthan, Nagpur https://t.co/ip6xtRiHyR
— Nitin Gadkari (@nitin_gadkari) July 15, 2023
गडकरी म्हणाले की, 'आजच नाही, तर मी विरोधी पक्षनेता असतानाही एक गोष्ट ठामपणे सांगायचो. लोकांचा देवावर आणि सरकारवर विश्वास आहे. पण सरकारी हस्तक्षेपामुळे प्रकल्प उद्ध्वस्त होऊ शकतात. सरकारचा हस्तक्षेप किंवा सरकारची सावलीही प्रकल्पाला उद्ध्वस्त करू शकते. सरकार विषकन्येसारखे आहे. जे सरकारपासून दूर राहतात त्याची प्रगती होते,' असे वक्तव्य त्यांनी केले. त्यांचे हे वक्तव्य चर्चेचा विषय ठरत आहे.
आणखी काय म्हणाले गडकरी?
कृषी विकास प्रतिष्ठानच्या वतीने नागपुरात आयोजित कार्यक्रमात नितीन गडकरी म्हणाले की, 'सरकारच्याही अनेक अडचणी आहेत. देशाचे कृषी उत्पन्न 22 टक्क्यांनी वाढवायचे आहे आणि ज्या दिवशी आपण हे करू, त्या दिवशी शेतकऱ्यांची मजुरी 1500 होईल. आज हे सर्वात मोठे ध्येय आपल्यासमोर आहे. सरकारमधील अडचणी वेगळ्या आहेत. या वर्षी एमएसपी देताना अडचणी आल्यात. बाजारभाव आणि एमएसपी यांच्यात समतोल साधण्यासाठी बाजारभाव कमी आणि एमएसपी जास्त आहे. सरकारला दीड लाख कोटी रुपये द्यावे लागतील आणि घेतलेले धान्य ठेवण्यासाठी गोदाम नाहीत. किती गडबड झाली देव जाणे, मंत्री असल्याने मलाही बोलण्याच्या मर्यादा आहेत,' असंही गडकरी म्हणाले.