नितीन गडकरी यांच्याकडे गोवा भाजपची सुत्रे
By Admin | Published: August 24, 2016 09:41 PM2016-08-24T21:41:39+5:302016-08-24T21:41:39+5:30
त्या काही महिन्यांत होणार असलेल्या गोवा विधानसभा निवडणुकीसाठी गोवा भाजपची सुत्रे पक्षाध्यक्ष अमित शहा यांनी केंद्रीय भू-पृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे सोपवली
ऑनलाइन लोकमत
पणजी, दि. 24 : येत्या काही महिन्यांत होणार असलेल्या गोवा विधानसभा निवडणुकीसाठी गोवा भाजपची सुत्रे पक्षाध्यक्ष अमित शहा यांनी केंद्रीय भू-पृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे सोपवली असल्याची माहिती पक्ष सुत्रंकडून मिळाली.
गडकरी यांच्याकडेच यापूर्वी भाजपने दिल्लीच्या निवडणुकीवेळी पक्षाची सुत्रे सोपवली होती.
गडकरी यांचे गोव्यातील म.गो. पक्षाशी संबंध चांगले आहेत. येत्या निवडणुकीवेळी भाजप-म.गो. युती कायम ठेवण्याबाबतही हे संबंध उपयुक्त ठरतील, असे भाजपमधील काहीजणांना वाटते. गडकरी यांच्याकडे गोवा भाजपची सुत्रे सोपविल्याचे संकेत अमित शहा यांनी पक्षाच्या अन्य नेत्यांना दिले आहेत पण अधिकृत घोषणा यापुढे लवकरच होईल, असे काही पदाधिका:यांनी सांगितले.
मुख्यमंत्री दिल्लीस
दरम्यान, दिल्लीत झालेल्या भाजपच्या राष्ट्रीय कोअर टीमच्या बैठकीसाठी उपमुख्यमंत्री फ्रान्सिस डिसोझा, पंचायत मंत्री राजेंद्र आर्लेकर, जलसंसाधन मंत्री दयानंद मांद्रेकर, प्रदेशाध्यक्ष विनय तेंडुलकर, सरचिटणीस सदानंद शेट तानावडे, खजिनदार संजीव देसाई आदी गेले होते. हे सगळे बुधवारी गोव्यात परतले. आज गुरुवारी मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर दिल्लीस निघणार आहेत. त्यानंतर शुक्रवारी पुन्हा उपमुख्यमंत्री डिसोझा व प्रदेशाध्यक्ष तेंडुलकर हे दिल्लीत मुख्यमंत्री पार्सेकर यांना जाऊन भेटतील. तिथे तिघेही भाजपच्या अन्य एका बैठकीत सहभागी होणार आहेत.